प्रभाग रचनेत पालिका प्रशासनाच्या चुका जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास

बदल करण्याची मागणी

    22-May-2022
Total Views | 52

ambarnath
 
 
 
 
  
अंबरनाथ : नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत ६४ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. हरकतीच्या सुनावणीदरम्यान पालिका प्रशासनाने प्रभाग रचना करताना केलेल्या चुका जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आल्या. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आणि अतिरिक्त मुख्याधिकारी धीरज चव्हाण उपस्थित होते.
 
 
 
प्रभाग रचनेसंदर्भात ६४ नागरिकांनी प्रारुप मतदार यादीवर हरकत नोंदवली असली तरी निम्म्याहून कमी हरकतदार प्रत्यक्षात उपस्थित होते. या हरकतीमध्ये पालिका प्रशासनाने आराखडा तयार करताना अनेक चुका केल्याचे हरकतदारांनी पुराव्यानिशी सादर केले. अनेक प्रभागात मोठे नाले, वालधुनी नदी, राज्य महामार्ग आणि विकास आराखड्यातील महत्त्वपूर्ण रस्ते ओलांडून दुसर्‍या ठिकाणचा परिसर परस्पर जोडून प्रभाग तयार केले होते. त्यातील अनेक महत्त्वाचे प्रभाग आणि त्यातील त्रुटी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
 
 
 
प्रभाग क्र. १४ मध्ये सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींनी वडोलगावचे विभाजन आणि गांधीनगर परिसर प्रभाग क्र. १४ मध्ये सामावण्यास आक्षेप नोंदविला. सिद्धार्थ नगर आणि भगतसिंग नगर भौगोलिकदृष्ट्या एकच असताना त्याचे दोन प्रभागांमध्ये विभाजन करण्यास विरोध दर्शविण्यात आला. प्रभाग क्र. ६ तयार करताना पालिका प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हा प्रभाग तयार करताना पूर्व आणि पश्चिम भाग एकत्रित जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग तयार करताना रेल्वे रूळ न ओलांडणे आणि राज्य महामार्ग न ओलांडण्याच्या अशा दोन्ही नियमांना बगल देण्यात आली. भौगोलिकदृष्ट्या भिन्न असतानादेखील हा प्रभाग एकत्रित केल्याने त्या प्रभागावर सर्वाधिक आक्षेप नोंदविण्यात आला.
 
 
 
प्रभाग क्र. ४ हा तीन सदस्यीय करण्यात आल्याने त्या ठिकाणी प्रभाग तयार करताना बहुसंख्य अनुसूचित जमातीच्या नागरिकांवर अन्याय करण्यात आल्याचे हरकतीत नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणी अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असूनही हा प्रभाग तीन सदस्य केल्याने लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये एसटी अर्थात अनुसूचित जमातीची टक्केवारी जाणून बुजून घसरवण्यात आली, असा आक्षेप नोंदविण्यात आला. त्यामुळे हा प्रभाग तीन सदस्य न करता त्या ठिकाणी दोन सदस्यीय प्रभाग तयार करून अनुसूचित जमातीच्या मतदारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. प्रभाग क्र. २२ साई सेक्शन आणि प्रभाग क्र. २३ कानसई सेक्शन हे दोन्ही प्रभाग एकमेकांना लागून असले तरी त्याची रचना करताना मुख्य रस्त्यावरील इमारती बाजूला ठेवत अंतर्गत रस्त्याद्वारे प्रभागाची रचना करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला, तर भौगोलिकदृष्ट्या प्रभाग २२ मधील काही भाग हा प्रभाग क्र. २३ मध्ये टाकण्यात आल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला. ही प्रशासकीय चूकदेखील जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121