नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे सरकार आता तरी व्हॅटमध्ये कपात करून राज्यातील नागरिकांना दिलासा देणार का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सायंकाळी ट्विटद्वारे या निर्णयाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलच्या दर प्रति लिटर साडेनऊ रुपये आणि डिझेलच्या दरात ७ रुपयांनी घट होईल. यामुळे केंद्र सरकारच्या महसुलावर वर्षाकाठी १ लाख कोटी रुपयांचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आता सर्व राज्यांनी, विशेषत: ज्या राज्यांनी नोव्हेंबर २०२१मध्ये इंधनावरी व्हॅटमध्ये कपात केली गेली नव्हती, त्यांनी आता कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या, यावर्षी केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये अनुदान देणार आहे. यामुळे देशातील माता – भगिनींनी लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे केंद्र सरकारच्या वर्षाकाठी सुमारे ६१०० कोटी रुपयांच्या महसुलावर परिणाम होणार आहे.
शेतकऱ्यांना खतांवरही अनुदान
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खतांवर १.०५ लाख कोटी रूपयांचे अनुदान जाहिर केले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त १.१० लाख कोटी रुपयांची रक्कम दिली जात असल्याचे सीताराम यांनी सांगितले. रशिया – युक्रेन संघर्षामुळे जागतिक स्तरावर खतांच्या किमती वाढत असताना भारतातील शेतकऱ्यांना त्याची झळ पोहोचू नये, यासाठी मोदी सरकार कार्यरत असल्याचेही सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले.