काशिविश्वेश्वर आणि ज्ञानवापी

    21-May-2022
Total Views | 503

KVN

गेल्या जवळपास काही महिन्यांपासून ज्ञानवापीचे नाव चर्चेत आहे आणि नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे ते प्रामुख्याने पुढे आले. वाराणसीत असलेल्या मूळ काशिविश्वेश्वराची ही जागा, ती मुघल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली असे काहीसे हे प्रकरण. अर्थात, या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे, हे बर्‍याच मराठी लोकांना माहीत नसेल. म्हणूनच, एकंदरीतच ही ज्ञानवापीच्या वादाची गोष्ट काय आहे, ते थोडक्यात पाहू.



काशीचा विश्वेश्वर म्हणजे हिंदू धर्मीयांचे अतिशय मानाचे श्रद्धास्थान. काशीचा जुन्यातला जुना उल्लेख स्कंद पुराणाअंतर्गत असलेल्या १०० अध्यायाच्या काशीखंडात येतो. स्कंद पुराणाचा लेखनकाल निश्चित करता येत नसला, तरीही तो गुप्तांच्या कारकिर्दीच्या आधीच असल्याचे दिसून येते. गुप्त कालखंडात मात्र काशिविश्वेश्वराचे रूप अतिशय भव्य आणि उत्तुंग होते, असे तत्कालीन वर्णनावरून दिसून येते.


ह्युएन त्संग नावाचा एक चिनी प्रवासी याच कालखंडात भारताच्या दौर्‍यावर असताना त्याने वाराणसीबद्दल काही नोंदी केल्या आहेत. तो लिहितो, राजधानी (काशी) हे एक दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथील कुटुंबे खूप श्रीमंत आहेत. लोकांचा स्वभाव मृदू आणि माणुसकी असलेला आहे. इथल्या लोकांना ज्ञानार्जनासाठी खूप दान दिले जाते. ह्युएन त्संगने विश्वेश्वराचे मंदिर किती भव्य आहे, त्याबद्दलही काही नोंदी केल्या आहेत.


गुप्तकाल हा मध्ययुगीन भारतातला हिंदुत्वाचा एक सुवर्णकाळ मानला जातो. गुप्तांची राजवट संपली, तरी धर्माचा प्रभाव कळसाला पोहोचला असतानाच, पश्चिमेकडून, सिंध प्रांतावर बिन कासीमच्या निमित्ताने पहिले परकीय आक्रमण झाले आणि हळूहळू या सगळ्या धार्मिक परंपरेवर काळ्याकुट्ट ढगांचे सावट येऊ लागले. दरम्यानच्या काळात काशीच्या विश्वेश्वरावर दोनदा हल्ले झाले. पहिला हल्ला झाला, तो बारावे शतक संपत असताना. दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या मोहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने कनौजचा सर्व प्रांत जिंकून घेतला आणि याच गोंधळात विश्वेश्वराच्या मंदिराला तोशीस लागली.


जवळपास हजारेक मंदिरं फुटली, तिथे मशिदी उभ्या राहिल्या. वाराणसी हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने तिथे गाझी सैन्याने काय धुमाकूळ घातला, हे घोरीच्या दरबारातल्या हसन निझामी याने लिहिलेल्या ’ताज-उल-मासिर’मध्ये वाचायला मिळत. याचा अनुवाद एलियट आणि डॉसनच्या दुसर्‍या खंडात वाचायला मिळेल. पुढे ५० वर्षांनंतर अल्तमशच्या कारकिर्दीत एका व्यापार्‍याने हे मंदिर पुन्हा पूर्ववत केले. या सगळ्याला २०० वर्षे उलटतात न उलटतात, तोच लोधीच्या कारकिर्दीत पुन्हा विश्वेश्वरावर धाड आली आणि मंदिर उद्ध्वस्त होऊन तिथे मशीद उभी राहिली व पुढची जवळपास १००-१२५ वर्षे ही मशीद अशीच उभी होती. इथून काशिविश्वेश्वराशी महाराष्ट्राचा थेट संबंध सुरू होतो.


लोधी राजवटीत नष्ट झालेले मंदिर पुन्हा उभारण्याचा निश्चय केला तो एका प्रकांड पंडिताने, एका मराठी धर्मपंडिताने. नारायण भट्ट हे त्यांचे नाव. भट्ट ऐकून चकीत झालात ना? हो, तुमचा अंदाज बरोबर आहे. हे नारायण भट्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणार्‍या गंगा भट्टांचे पणजोबा. मूळचे पैठणचे असलेले हे भट्ट काशीत तेव्हापासून स्थायिक झाले आणि पुढे गागाभट्ट काशीहून महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रात आले. ती कथा पुढे येईलच. नारायण भट्टांनी उभे केलेले हे मंदिर कसे होते, याबद्दल आपल्याकडे उल्लेख आहेत. पीटर मंडी नावाचा एक ब्रिटिश फॅक्टर सतराव्या शतकात भारतात आला असताना त्याने आपल्या फिरस्तीत काशीविषयी नोंद केली आहे.



दि. ४ सप्टेंबर, १६३२ रोजी मंडी वाराणसीत पोहोचला. त्याने वाराणसीविषयीसुद्धा लिहिले आहे, पण खासकरून तो काशिविश्वेश्वराच्या मंदिराबद्दल लिहितो, वाराणसीत अनेक मंदिरे आहेत, पण त्यातला मुख्य मंदिराला ‘काशिविश्व’ म्हणतात, जे महादेवाचे मंदिर आहे. मी त्या मंदिरात गेलो. त्याच्या मध्यभागी एक दगड असून त्याचा आकार काहीसा (मध्यभागी फुगीर असलेल्या आणि बाजूंनी गोलाकार पसरलेल्या) ‘हॅट’सारखा होता.


हा दगड खडबडीत, काहीसा धातूंनी वेष्टित असून त्यावर लोक गंगेच्या पाण्याची, फुलांची, तांदळाची आणि लोण्याची वगैरे वृष्टी करत होते. या सगळ्याच एक जणू काही मिश्रण होऊन ते (दगडावरून) ओघळत होते. यासोबतच असलेले ब्राह्मण काहीतरी अगम्य भाषेत वाचत आणि बोलत होते. या सार्‍याच्या वर एक किनखापीचा तंबू उभारलेला असून तिथेच अनेक दिवे लावलेले होते. हे वर्णन वाचताना मंडीने काढलेले तत्कालीन काशिविश्वेश्वराचे रेखाचित्रसुद्धा पाहिल्यास अंदाज येईल.


नारायण भट्टांनी उभारलेले हे काशिविश्वेश्वराचे मंदिरही जेमतेम १२५ वर्षे उभे होते. कारण, मुघल सत्ता कळसाला पोहोचली असतानाच सम्राट औरंगजेबाचे धर्मवेड अचानक उफाळून आले आणि त्याने जणू काही हिंदुस्थानातील मंदिरे जमीनदोस्त करण्याचा सपाटाच लावला. औरंगजेबाची ही धर्मांधता काही नव्याने ोमध्ये गुजरातचा सुभेदार असताना औरंगजेबाने अहमदाबादमधील चिंतामणीचे देवालयात गाईची कत्तल करून बाटवलं आणि त्या मंदिराचं रूपांतर एका मशिदीत केलं. नंतर त्याने त्या प्रांतातली सारी मंदिरं पाडून टाकली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने ओडिशा प्रांतात गेल्या दहा-बारा वर्षांत बांधलेली एकूण एक मंदिरे पाडून टाकण्याचा हुकूम सोडला होता.


‘मासिर-ए-अलामगिरी’त स्पष्ट नमूद केले आहे की, (दि. ९ एप्रिल, १६६९ रोजी) औरंगजेबाने एक फतवा काढला की, काफरांची सर्व देवालये पाडून टाकण्यात यावी आणि काफरांच्या धार्मिक चालीरीती आणि शिकवणूक यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यात यावा. या हुकमांची अंमलबजावणी करायला तत्परतेने सुरुवात झाली. पुढच्या चार महिन्यांतच काशिविश्वेश्वरावर गाझी चालून गेले आणि ऑगस्ट १६६९ मध्ये काशिविश्वेश्वर भंगले. नेमकी मंदिराच्या मुख्य पुजार्‍याला ही कुणकुण आधीच लागल्याने त्याने विश्वेश्वराचे शिवलिंग मंदिरातून आधीच बाहेर काढून शेजारीच असलेल्या विहिरीत सोडले.


याच सुमारास काशीतील बिंदुमाधव, मथुरेतील केशवराय वगैरे इतर मंदिरेही धर्मवेड्या गाझींच्या आक्रमणाला बळी पडली. औरंगजेबाची ही सगळी फर्माने आणि फतवे ’द रिलिजिअस पॉलिसी ऑफ द मुघल एम्पेरर्स’ या श्रीराम शर्मा यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहेत, अभ्यासूंनी ती नक्की पाहावीत. आपल्याकडे जेधे शकावलीत उल्लेख आहे, ‘शके १५९१ सौम्यनाम संवत्सरे, भाद्रपदमासी औरंगजेबानी कासीस उपद्रव केला. देवालये पाडिली.’ एकंदरीत औरंगजेबाने काशिविश्वेश्वराचे मंदिर पाडले. पुढे हे मंदिर पूर्ण नष्ट करण्याऐवजी त्याच्या उरल्यासुरल्या भागाचा उपयोग करून तिथे मशीद उभारण्यात आली, ज्या मंदिराचे अवशेष आजही पाहायला मिळतात. विश्वेश्वराचे शिवलिंग हे शेजारच्याच विहिरीत होते. ही विहीर म्हणजे जणू काही गंगेचाच एक झरा होता. ज्ञानाची विहीर, ज्ञानवापी!


काशीचा विश्वेश्वर मुक्त करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा नक्कीच असणार, पण ती थेट कुठेही नमूद केलेली मला आढळली नाही. पण, शिवछत्रपती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य असलेल्या, पुढच्या काळात औरंगजेबाला त्राही करून सोडणार्‍या मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजांसाठी एक ग्रंथ निर्माण केला. सर्वसाधारणपणे त्याला ’आज्ञापत्र’ म्हटले जाते. या आज्ञापत्रात अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरून महाराजांची इच्छाही काशिविश्वेश्वर मुक्त करण्याची असावी, असे स्पष्ट दिसते.


उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी ‘यवनाक्रान्त राज्य आक्रमावे, अवनीमंडळ निर्यावनी करावे,’ हा निगूढ चित्ताप्राय प्रकट करून, ‘पूर्व, पश्चिम, दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावरी सेनासमुदाय प्रेरून मारून काढिले,’ असे म्हटले आहे. यापुढे अमात्यांनी एक कर्तव्य म्हणून श्री वाराणसीस जाऊन स्वामी (छत्रपती) विश्वेश्वर स्थापना करत, ‘तावत्काळपर्यंत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्रीमत्सकलतीर्थौकतीर्थ श्रीमन्मातुश्री राहिली आहेत,’ असे म्हटले आहे. ज्यावरून अगदी १७१५-१६ मध्येसुद्धा रामचंद्रपंत अमात्य जर हे म्हणत आहेत तर ज्यांच्या कारकिर्दीत काशिविश्वेश्वर भंगले त्या शिवाजी महाराजांना त्याची पुनर्स्थापना करायची नसल्यासच नवल!


थोरल्या बाजीराव पेशव्यांनादेखील काशिविश्वेश्वराची पुनर्स्थापना करायची असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. बाजीराव गेल्यावर चिमाजी अप्पांनी एका पत्रात म्हटले, “रायाचीही बुध रयत प्रतिपाळणास पूर्ण, देवब्राह्मणांची स्थापना करून, काश्यादिक महास्थळी विश्वेश्वराच्या जीर्णोद्धार करावयास निरत होऊन त्याच मार्गेकरून रयत नांदविली.” विश्वेश्वराचे स्थापना करावी, हे आर्त होतीच. हे पत्र हिंगणे दफ्तरात प्रसिद्ध झालं आहे. या पत्रात अप्पा पुढे म्हणतात की, रायांची अपूर्ण राहिलेली ही इच्छा पूर्ण करायला आता त्यांचा पुत्र गादीवर आला आहे. बाजीरावांचा पुत्र म्हणजेच थोरले नानासाहेब पेशवे. नानासाहेबांच्या इतर पत्रांमधून सतत काशी आपल्याकडे यावी, हेच राजकारण दिसून येते. नानासाहेबांची काव्येतिहास संग्रहात आणि पेशवे दप्तरात प्रसिद्ध झालेली पत्रे अभ्यासूंनी जरूर पाहावीत.


इ. स. १७४२ मध्ये नानासाहेबांनी काशी जिंकून घेण्यासाठी पावले उचलली होती. यासंबंधी पेशवे शकावलीत इत्यंभूत वर्णन केले आहे. दि. २७ जानेवारी, १७४३ रोजी पेशवे फौजेसह प्रयागला स्नानासाठी आले. तेथून पुढे दि. ९ फेब्रुवारी, १७४३ रोजी नानासाहेबांचा मुक्काम काशीच्या दक्षिण तीरावर रामपुरा इथे झाला. या शकावलीत स्पष्ट उल्लेख आहे, श्रीमंतांच्या मनात काशीक्षेत्र हस्तगत करावे म्हणून आल्यावर स्वारीच्या ढाला काशीकडे फिरविल्या. यावेळेस काशीचा अधिकारी सफदरजंग हा असून त्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याची बोबडी वळली. त्याने भरभर काशीतल्या नारायण दीक्षित पाटणकर आणि तर सार्‍या ब्राह्मणांना बोलावून सरळसरळ धमकी दिली की, “पेशवा काशी घ्यायला येतोय, त्याला माघारी फिरवा, नाहीतर तुम्हा सार्‍यांना मुसलमान करीन.” झालं!!!


हे दीक्षित आणि इतर ब्राह्मण घाबरून उघडेबोडके होऊन, जिथे नानासाहेबांचा मुक्काम होता तिथे, गंगेच्या दक्षिण तीरावर ऐन रात्री आले. श्रीमंतांना ही गोष्ट समजली तेव्हा ते डेर्‍याबाहेर येऊन विचारू लागले की, दीक्षित उघडेबोडके होऊन का आले? दीक्षितांनी सारा घडला प्रकार नानासाहेबांना सांगितला. यावेळेस काशी घेणे हा मुख्य हेतू नसून बंगालात जाऊन अलिवर्दीची भेट आणि तिथे व्यवस्था लावणे हा मुख्य हेतू होता. त्यामुळे नानासाहेबांनी आपला काशी घेण्याचा बेत तूर्त रहित केला. याचं कारण म्हणजे, केवळ काशी घेऊन चालणार नव्हतं.


आजूबाजूचा प्रदेशही निर्धोक करणं गरजेचं होतं. न जाणो जर नानासाहेबांची पाठ वळताच आजूबाजूच्या लोकांनी आणि सफदरजंगाने पुन्हा गडबड केली असती, तर काशीत पुन्हा कत्तली झाल्या असत्या. नानासाहेबांनी यातून वेगळीच तोड काढली, जी त्यांच्या पुढच्या आयुष्यातील पत्रांवरून दिसून येते. हाच सफदरजंग पुढे ‘वजिरी’ मिळाली तेव्हा नानासाहेबांचा अक्षरशः चाहता बनत चालला. बादशाहीचं रक्षण केवळ मराठेच करू शकतात, असे म्हणून यानेच प्रसिद्ध अहमदिया करार करून दिला.


मुख्य मुद्दा हा की, १७४३ मध्येही काशी आपल्याकडे येण्याचे आणि विश्वेश्वर स्थापन होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. आणखी एका उल्लेखानुसार, मल्हारराव होळकरांना नानासाहेबांनी काशी घ्यायला पाठवले होते. होळकरांच्या कागदांत यासंबंधी असलेला उल्लेख असा, “मल्हारजीने छावणी अंतर्वेदित केली. त्यांचे चित्तात की, मशीद, विश्वेश्वराचे ज्ञानवापीजवळील, ते पाडून देवालय करावे. परंतु, द्राविडी ब्राह्मण चिंता करतात की, हे मशीद प्रसिद्ध आहे. यवन प्रबळ या प्रांती विशेष आहे. यावर मशीद पाडू लागतील तेव्हा सर्व ब्राह्मण मिळतील आणि श्रीमंतांस विनंतीपत्र पाठवतील.”


माधवरावांनी मृत्यूसमयी नऊ कलमी यादी केली होती, ज्यात काशी व प्रयाग ही स्थळे सरकारात यावी, असा तीर्थरुपांचा हेतू होता, असं म्हटलं आहे. थोडक्यात, माधवरावांच्या आयुष्यातही त्यांचं हे स्वप्नं पूर्ण झालं नाही. नानासाहेब आणि मल्हारराव होळकर यांचं हे स्वप्न पुढे अहिल्याबाई होळकरांनी अंशतः पूर्ण केलं. काशी सुरुवातीला पूर्णतः अयोध्येच्या नवाबाकडे असल्याने तो काशीचा ताबा मराठ्यांना द्यायला कधीच तयार नव्हता. पानिपतनंतर बादशाहने काशी इंग्रजांना देऊन टाकल्याने पुढच्या काळात किमान ज्ञानवापी पाडता येत नसली, तरी काशीत विश्वेश्वर पुन्हा उभा राहावा, यासाठी अहिल्याबाईंनी प्रयत्न सुरू केले.


इ. स. १७८५च्या सुमारास काशिविश्वेश्वराचे मंदिर, ज्ञानवापी आणि मशिदीला लागून दक्षिणेला पुन्हा नव्याने बांधण्यात आले. इथे नव्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली, असे दिसते. महेश्वर दरबारची बातमीपत्रे मध्ये अहिल्याबाईंच्या या कामाचे त्रोटक उल्लेख सापडतात. इ.स. १७८९ मध्ये नाना फडणवीसांनी महादजी शिंद्यांना कळवले होते की, श्रीकाशीत विश्वेश्वराचे देवालय हजार वर्षांचे असल्याचे सर्वांस ठाऊक आहे. त्यास अलीकडे पातशाहीत कोणी काय समजावून मशीद केली. त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन, पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी, हे हिंदू धर्मास योग्य आहे. या काळी पातशहाजवळ उद्योग केल्यास होईल, असे आहे.


त्यास असम झाले पाहिजे की, पुन्हा कोणाचा त्यावर दावा राहता कामा नये. पूर्वापार असलेला मजकूर पातशाहाला समजावून पुढे कधीच कोणाकडूनही उपद्रव होणार नाही, असे पत्र त्याच्याकडून घ्यावे. सांप्रत काशीत इंग्रजांचा अंमल आहे, ते कोणाच्याही धर्माला अडथळा करत नाहीत. त्यांच्याशी आपल्याला सहज बोलता येईल. विश्वेश्वराच्या ठिकाणी वस्ती कोणाची असल्यास त्यांना त्याचा मोबदला दिला जाईल, पण पातशाहाची परवानगी निर्वेधपणे झाली पाहिजे. मथुरा, वृंदावन ही स्थळे देखील सरकारात असावीत. पण, दुर्दैवाने पुढे पाटीलबावांकडून यावर फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्या प्रदेशात अजूनही मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुस्लीम सरदारांच्या दबावामुळे महादजींना यावर तत्काळ काही हालचाली करता येत नव्हत्या. याही वेळेस ते काम अर्धवट राहिले.


अहिल्याबाईंनी काशीत अनेक धार्मिक कामे केली. ज्यात मणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट वगैरे घाटांचे पुनर्निर्माण, गंगामूर्ती व इतर लहानसहान मंदिरे, धर्मशाळा, चौथरे वगैरे बांधण्यात आले. थोरल्या बाजीरावांच्या काळात, १७३५ पासून काशीत घाट बांधण्याचा प्रारंभ झाला. बाबूजी नाईक बारामतीकरांचे वडील सदाशिव नाईक यांनी बाजीरावांना पाठवलेली पत्रे आज उपलब्ध झाली आहेत. तिथपासून सुरुवात होऊन अहिल्याबाईंच्या कारकिर्दीपर्यंत ही धार्मिक कार्ये मराठ्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. एकंदरीत अशी आहे, मूळ काशीतील मूळ विश्वेश्वर, त्याची एकदा नव्हे तर तीनदा झालेली मशीद आणि शेजारच्याच ’ज्ञानवापी’ची गोष्ट.


- कौस्तुभ कस्तुरे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121