‘इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन’, ‘बोल्ड ब्रश फाईन आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ ‘रे-मार-आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ या अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्या संयोजकांनी ज्या भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय तरुण चित्रकाराच्या कलाशैलीचा सन्मान केला, त्या खोपोली जि. रायगड येथील प्रयोगशील चित्रकार प्रा. दीपक रमेश पाटील यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कला योगदानाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात आपण करीत आहोत.
कुठलीही बाब वा घटना, जर इतर कुणाला म्हणजे ज्यांनी ती बाब वा घटना प्रत्यक्ष पाहिलेली नाही, अशांना सांगायची वा दर्शवायची असेल, तर प्रत्येक ’सांगणार्याची’ पद्धती ही भिन्न असते. दृश्यकलाकाराची पद्धतीदेखील इतरांहून वेगळी असते. व्यंगचित्रकार त्याच्या व्यंगचित्राच्या शैलीतून रेखाटून सांगेल, तर एखादा रेखांकनकार हा त्याच्या ’स्टाईल’ने सांगण्याचा प्रयत्न करेल. दृश्यचित्रकलाकार म्हणजे ‘पेंटर’ वा ’आार्टिस्ट’ हा त्याच्या शैलीत चित्र ‘पेंट’ करून वा चित्र ‘रेंडर’ करून पाहिलेले वर्णन दाखविण्याचा प्रयत्न करेल. माझा अनुभव, माझे निरीक्षण किंवा माझे विचार जर मी वाचकांच्या आवडीनुसार प्रभावी शब्दांत मांडू शकलो, तर मी ‘वाचकप्रिय लेखक’ म्हणून मान्यता पावतो. तसेच जर माझे विचार वा कल्पना, निरीक्षण वा अनुभव जर मी शब्दांशिवाय चित्रांकनाच्या माध्यमातून मांडू शकलो, तर मी सर्वसामान्यांपेक्षा जरा वेगळ्या स्तरांत गणला जातो. मी चित्रकार, पेंटर, कलाकार वा दृश्यकलाकार म्हणून ओळखला जातो. अशी ओळख प्राप्त करण्यास एक नव्हे, अनेक वर्षे ‘रियाज्’ अर्थात नियमित सराव करावा लागतो, जगाच्या नजरेपेक्षा आपली नजर आपली निरीक्षण क्षमता ही कल्पनाशक्तींच्या कोंदणात बसवून व्यक्त करता यावी, एवढी प्रगल्भ व्हावी लागते. हे सारं केवळ ध्यास आणि ध्यास घेऊनच शक्य होतं. कधीतरी कामं करणारी मंडळी आणि नियमित कामं करणारी मंडळी यांच्यात एक फरक असतो, तो प्रत्यक्ष पाहायला मिळतो.
दृश्यकलेतील सर्वमान्य कलाशैली प्रकार म्हणजे ‘रिअॅलिस्टिक स्टाईल’ किंवा ‘वास्तववादी शैली’ होय. या कलाशैलींमध्ये अनेक कलाकार त्यांच्या शैलीतून व्यक्त होता. ज्याला त्याचं निरीक्षण, कल्पनाशक्तीच्या जोरावर फार प्रभावीपणे आणि अद्भुतपणे दृश्यस्वरुपात मांडता येतं, तो कलारसिकमान्य चित्रकार ठरतो. उत्कृष्ट काम करणार्याला कुठल्याच क्षेत्रात कुणाच्याच शिफारशीची वा वशिल्याची आवश्यकता भासत नाही. त्याचं काम हीच त्याची ओळख निर्माण करतो. ‘दृश्यकला’ हे क्षेत्र व्यक्तीची ज्येष्ठता सिद्ध करण्यापेक्षा व्यक्तीच्या प्रगल्भ साधनेद्वारा त्या व्यक्तीचं योगदान सिद्ध करते. म्हणून आपणांस ध्यानी येईल की, एखादा दृश्य कलाकार हा वयाने जरी लहान असला, तरी त्याच्या कलाकृतींच्या माध्यमाने तो रसिकप्रिय, लोकप्रिय तर ठरतोच. परंतु, त्याला त्याच्या कलेमुळे-साधनेमुळे अनेक सन्मान- पुरस्कार वा बक्षिसे प्राप्त होतात. क्रिकेटपटू सम्राट सचिन तेंडुलकर यांच्या वयाचे अनेकजणं असतील. मात्र, त्यांनी जे कर्तृत्व गाजवले, ते इतर कुणीही गाजवू शकले नाहीत, म्हणून ते ‘भारतरत्न’ झाले. आमच्या दृश्यकलेतही असाच प्रकार आहे. ज्यांच्या कलेला जगमान्यता लाभते, ते कलाकार ‘कलारत्न’ या उपाधीने ‘लोकमान्य’ ठरतात. या लेखातील एक कलाकार अशाच लोकमान्य-रसिकमान्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कला पुरस्कारांनी गौरविलेला आहे.
‘इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन’, ‘बोल्ड ब्रश फाईन आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ ‘रे-मार-आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ या युएसए, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्या संयोजकांनी ज्या भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय तरुण चित्रकाराच्या कलाशैलीचा सन्मान केला, त्या खोपोली जि. रायगड येथील प्रयोगशील चित्रकार प्रा. दीपक रमेश पाटील यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कला योगदानाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात आपण करीत आहोत. केवळ पुरस्कार, सन्मान आणि बक्षिसे यांचीच माहिती घेतली, तर या लेखाची शब्दमर्यादा फारच वाढेल. तो मोह टाळून, यांच्या अनेक एकल आणि समूह प्रदर्शनाविषयीदेखील आपण या लेखात जाणून घेणार नाही. कारण, तो मोह आवरला नाही तर मुख्य विषय दूर जाण्याची भीती आहे. या दृश्यकलाकाराने स्वत:ची स्वतंत्र शैली तर निर्माण केलीच आहे. परंतु, ती शैली ज्या चित्रविषयांसाठी योजली आहे, ती अचूकता गुंफण्यात हा कलाकार यशस्वी झाला आहे, असं म्हणता येतं. आपली संस्कृती, आपले समाजजीवन आणि आपली सार्वजनिक दैनंदिनी अगदी बारकाव्यांसह तपशील मांडून निरीक्षणे नोंदवून, त्यांना चित्रविषयात बद्ध करणे, सौंदर्याभिरूचित सजविणे आणि चित्रविषय-चित्रकार व कलारसिक यांच्यात सुसंवाद घडवून एक सुप्त नातं निर्माण करणे, हे सर्व जुळवून आणण्यासाठी चित्रकाराची वैचारिक बैठक, रंगांची मेहनत आणि आकारांना व्यक्त करण्यासाठीची हातोटी फार महत्त्वाची ठरते. चित्रकार दीपक यांच्या प्रत्येक कलाकृतीतून हे सर्व प्रतीत होत असतं. म्हणून त्यांच्या कलाकृती या ‘दीपक’च असतात. त्यांच्या अव्याहत तेवण्यातून त्या भारतीय संस्कृतीला प्रकाशमान करीत असतात.

तसं पाहिलं तर दृश्यकलेतील चितारलेले चित्रविषय हे त्या त्या सांस्कृतिक जीवनावर, सामाजिक बांधिलकी जपणारे असतील, तर त्या चित्रविषयांना, त्या कलाकृतींना आणि त्या कलाकृती निर्मात्यांना, रसिकमनाचा ठाव घ्यायला कुणाच्या शिफारशीची गरज पडत नाही, याचं प्रभावी उदाहरण म्हणजे प्रयोगशील प्रामाणिक चित्रकार प्रा. दीपक पाटील आहेत. त्यांची निसर्गचित्रे ही ताज्या-टवटवीत रंगयोजनांनी सजलेली आहेत. कुठेतरी जरी पाश्चात्य चित्रकारांच्या निसर्गचित्रण लेखनाची आठवण येत असावी. पाटील यांची काही निसर्गचित्रणे पाहताना तरी त्यांचं वेगळेपण, वेगळे रंगलेपन हे त्यांची त्यांच्या शैलीतील रंगाकारांची ‘पाटीलकी’ जपते आहे, हेच दिसतं. त्यांच्या व्यक्तिचित्रणांसह, विशिष्ट विषय स्पष्ट करणारी काही ‘पेंटिग्ज’ अशी आहेत की, ती चक्क भडक-लाल-क्रिमझन रेड अशा रंगांच्या प्रभावाखालची आहेत. मात्र, उष:कालची आल्हाददायक कला किंवा संध्यासमयीची निरामयता जागविताना त्यांची कलाकृती डोळ्यांनाही शांततेची अनुभूती देते. मग, मंदिराच्या मुख्यद्वारातून आत प्रवेश करणारी एक लाल साडी नेसलेली भाविक महिला असो की, श्रीगणेशाला साकडं घालणारी महिला भाविक असो. पाण्याला पावित्र्य भावनेतून स्पर्श करून, तांब्याच्या भांड्यात पूजेसाठी उदक आणायला गेलेली, माफक परंतु सोज्वळ सौंदर्याने सजलेली, गजरा माळलेली आणि स्वत:च्याच आनंदात रमलेली, लाल साडीतील महाराष्ट्रीय सौंदर्यवती असो... या सर्व कलाकृती आपल्या देशाच्या समृद्ध-खानदानी-पारंपरिक आणि प्राचीन संस्कृतीचा पवित्र वारसा दर्शविणार्या आहेत. असा वारसा जपणारे, असा वारसा चित्रबद्ध करून जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करणारे आणि अशा वारशाचं पावित्र्य जपत आमची संस्कृती किती महान आहे, याचं महत्त्व सांगणारे चित्रकारसुद्धा तितक्याच मान-सन्मानाचे धनी आहेत. चित्रकार दीपक पाटील यांच्या रंगलेपनात त्यांनी त्यांची एक ‘पाटीलकी’ जपलेली आहे. त्यांच्या चित्रविषयांनी सांस्कृतिकतेचा पवित्र दीपक तेवत तर ठेवलाच आहे. परंतु, त्याचा प्रकाश अटकेपार पोहोचविण्याचं कार्य केलं आहे. म्हणूनच त्यांच्या कलोपासनेला आणि कलाप्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांतर्फे सदिच्छा आणि शुभेच्छा...!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ