मुंबई (विशेष प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील साई बांगोडा परिसरात शुक्रवार दि. २० रोजी वन विभागाच्या राखीव वनातील २५.50 हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस बल यांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. अवैध रित्या अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भूमिगत दारूसाठा देखील सापडला आहे. दारू साठ्याच्या चार भूमिगत टाक्या नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अनेक अतिक्रमण कर्त्यांकडून संघटीतरित्या या भागात जागा काबीज केल्याची बाब समोर आली होती. या अतिक्रमणाबाबत वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात 'स्पेशल लिव्ह पिटीशन' (सिव्हील) दाखल करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी काल दि. २० रोजी वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस दलाचे ७०० कर्मचारी उपस्थित होते. या आधीच्या कारवाई दरम्यान अतिक्रमण कर्त्या महिला ढाल म्हणून पुढे उभ्या राहिल्या होत्या मात्र, या कारवाई दरम्यान महिला आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जंगलातील लाकूड तोडून ते अवैध दारू भट्टी साठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. या संयुक्त कारवाईमध्ये उलटनपाडा, साई बांगोडा, मोरोशीपाडा येथील सुमारे २५.५० हे. क्षेत्रावरील शेतीसाठीचे आणि इतर अतिक्रमण पुर्णपणे काढून टाकण्यात आले आहे.
अतिक्रमण काढून टाकण्याच्या यशस्वी कारवाईनंतर साई बांगोडा परिसरातील मोकळ्या जागेवर पुन्हा नैसर्गिक वन्यजीव अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. या साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येतील असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.