स्वतः ‘फायनान्स’ या क्षेत्रात व्यवस्थापनाची पदवी घेऊनसुद्धा घरच्या परंपरागत ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’च्या व्यवसायात उडी घेऊन त्यात कालसुसंगत बदल करून तो व्यवसाय पुढे नेण्याचे काम करणारे आणि सतत नावीन्याचा ध्यास घेऊन स्वतःला सिद्ध करत स्वतःची नवीन ओळख तयार करणार्या ‘टेलिऑस’ या कंपनीच्या राहुल आवटींचा हा उद्यमप्रवास...
"व्यवसायात कायम नावीन्य शोधत राहिले पाहिजे. बदल होत असतात आणि ते सातत्याने होताच राहणार आहेत. आपण त्यासाठी तयार असणे गरजेचे आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे, त्याचे आधी व्यवस्थित शिक्षण घेणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या आधी त्या क्षेत्राच्या अनुभवाचीसुद्धा जोड देणे महत्त्वाचे आहे. तो अनुभव घेण्यासाठी पहिले काही वर्षे कुठल्याही चांगल्या कंपनीत नोकरी करा. त्यानंतरच व्यवसाय करण्याचा विचार करा. कारण, अनुभवाने स्वतः संपन्न असल्याशिवाय व्यवसायात यशस्वी होता येत नाही. हे नवीन उद्योजकांनी कायम लक्षात ठेवावे,” असे राहुल आवटी म्हणतात.
घरातूनच व्यवसायाचे बाळकडू मिळाले असले तरी तो व्यवसाय पुढे वाढवायला, मोठा करायला अंगभूत कसब असावे लागते. असाच घरातला एक स्थिर व्यवसाय असताना त्यात आपला ठसा उमटवणारे आणि त्यात वाढ करणारे राहुल आवटी. वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुण्यातील नामांकित ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मधून ‘फायनान्स’ क्षेत्रात व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. 2006 साली ‘फायनान्स’सारख्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अनेक संधी मिळत असतानाही त्यांनी आपल्या ‘फॅमिली बिझनेस’मध्ये उतरायचे ठरवले. या व्यवसायात काही वर्षे काम केल्यावर 2013 साली त्यांनी ‘टेलिऑस मीडिया हाऊस’ या त्यांच्या कंपनीची स्थापना केली. फक्त ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ एवढ्यापुरतच मर्यादित न राहता ‘डिजिटल मार्केटिंग’, ‘फिल्म मेकिंग’, ‘ब्रॅण्डिंग’ यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्येही प्रवेश केला.
वडीलच व्यवसायात कार्यरत असल्याने खूप जवळून हे क्षेत्र राहुल यांना बघायला मिळाले, शिकायला मिळाले. लहानपणापासूनच या व्यवसायाची त्यांना गोडी असल्याने ‘एमबीए’ झाल्यावर या व्यवसायात उतरायचे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे 2006 साली राहुल यांनी व्यवसायाची सूत्रे हातात घेतली. तेव्हा त्यांची कंपनी फक्त मोठमोठी ‘एक्झिबिशन्स’, ‘इव्हेंट्स’ करत होती. काही वर्षे या व्यवसायात रुळल्यानंतर या क्षेत्रातले बदल जवळून बघता आले. त्यामुळेच त्यांनी नवीन ‘स्टार्टअप’ सुरू केला. राहुल म्हणतात की, “नवीन व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो, तेव्हा त्याच्यासमोर खूप अडचणी असतात. जसे की, नवीन गुंतवणूक कुठून आणायची? नवीन ग्राहक कसे मिळणार? बाजारात आपल्या कामावर कोणी विश्वास ठेवेल की नाही? या सर्व प्रश्नांचा सामना करावा लागतो. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते, ती तुमच्याबद्दलचा विश्वास. ग्राहकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला असला पाहिजे. पण, मी माझ्या व्यवसायात आधीच सात वर्षे काम केलेले असल्याने मला ही अडचण जाणवली नाही. आधीच माझा व्यवसाय होता. माझे नाव लोकांना ठाऊक होते म्हणून नवीन व्यवसाय सुरू केल्याबरोबर काही महिन्यांतच माझ्याकडे तीन कॉन्ट्रॅक्ट्स आली होती,” असे राहुल त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना सांगतात.
‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ क्षेत्रात काम करत असताना सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे ज्याचा ‘इव्हेन्ट’ करायचा आहे, त्याला त्यातून नक्की काय मांडायचे आहे. मग जेव्हा विषय ठरतो तेव्हा मग तो कसा सादर करायचा, याचे चित्र उभे राहते. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बजेट.’ आपल्या ‘इव्हेंट’चे ‘बजेट’ किती आणि कसे असणार आहे, त्यानंतर ते ‘बजेट’ ‘इव्हेन्ट’ करणार्यांकडून मान्य होणे गरजेचे आहे. त्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे, ‘टीम मॅनेजमेंट.’ ‘इव्हेंट’च्या अनुक्रमांनुसार आपली टीम ठरवावी. त्यानंतर कुठल्या माणसाकडून कुठले काम करून घ्यायचे आहे, त्याचे काटेकोर नियोजन करावे लागते. त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असणे महत्त्वाचे आहे. अगदी ‘स्टेज’ उभारणीपासून ते ‘लाईट्स मॅनेजमेंट’, ‘सीटिंग मॅनेजमेंट’ या सर्व गोष्टी ठरवता येतात. या सर्व गोष्टींसाठी आधी आपल्या टीमची तयारी करून घेतली पाहिजे. टीमला कल्पना देऊन काही ‘इव्हेंट’च्या काही नवीन संकल्पना सुचत आहेत का, हेही बघता येते. यातूनच ‘इव्हेंट’ची उभारणी केली जाते. “खडकवासल्याला केंद्र सरकारच्या एका ‘इन्स्टिट्यूट’च्या ‘इव्हेंट’साठी राष्ट्रपती येणार होते. हा ‘इव्हेंट’ आमच्याकडे होता. आता मुळात राष्ट्रपती येणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार होती. राष्ट्रपतींची तसेच यांच्या इतर मान्यवरांची विशेष व्यवस्था, त्यांच्या सुरक्षाव्यवस्था यांकडे लक्ष द्यावे लागणार होते. त्यासाठी आम्ही त्यांच्या टीमसोबत सातत्याने बैठका घेत होतो. त्यांच्याशी सातत्याने बोलत होतो. त्यामुळे त्यांच्या ‘इव्हेंट’चे वेगळ्या प्रकारे काम करावे लागले होते. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना वेगवेगळ्या ‘इव्हेंट’नुसार वेगळे नियोजन कसे करावे, हे लक्षात येईल. अर्थात, हे लगेच साध्य होऊ शकत नाही, अनुभवातूनच आपल्याला हे सर्व शिकता येते.”
‘कोविड’ काळाचा सर्वात जास्त फटका ज्या क्षेत्रांना बसला, त्या क्षेत्रांमध्ये ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ क्षेत्राचाही समावेश होतो. त्याकाळात या क्षेत्राला खूपच नुकसान सहन करावे लागले. यातून सावरायला अजून किमान दोन वर्षे तरी लागतील, असे राहुल सांगतात. “या काळाचा सामना नेमका करायचा कसा, हा सर्वांपुढे प्रश्नच होता. सुरुवातीला हे सर्व पाच ते सहा महिन्यांमध्ये संपेल, असे वाटत होते. त्यामुळे पहिले काही महिने कसेतरी ढकलले. पण, जसजसा हा काळ वाढायला लागला, तसे संकट गंभीर व्हायला लागले. काहीच काम सुरू नसल्याने कामगारांना पैसे द्यायचे कुठून, हा प्रश्न उभा राहत होता. याच काळात मी आणि माझी पत्नी मिळून आमच्या सगळ्या टीमशी सातत्याने संपर्कात होतो. त्यांच्याशी बोलायचो, काहीतरी नवीन नवीन कल्पना सुचत आहेत का, हे बघायचो. अशा पद्धतीने आम्ही पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात आमचे आणि आमच्या टीमचे मनोधैर्य टिकवून ठेवले. जेव्हा थोडीशी शिथिलता मिळायला सुरुवात झाली, तेव्हा मोठ्या ‘इव्हेंट्स’ना बंदीच असल्याने ते करता येणे शक्यच नव्हते, पण या काळात असे लक्षात आले की, लोक आता ऑनलाईन माध्यमांकडे जास्त वळत आहेत. मग आम्ही त्या गोष्टींकडे वळलो. ऑनलाईन माध्यमांचा वापर करून कंपनी मीटिंग्ज, छोट्या कॉन्फरन्स यांसारख्या गोष्टी आम्ही घेत होतो. अशा पद्धतीने वाट शोधायला सुरुवात केली,” असे राहुल सांगतात. याच काळात राहुल यांनी फिल्ममेकिंग, शॉर्ट फिल्म्स, वेबसीरिज यांसारख्या माध्यमांकडे वळायला सुरुवात केली. “त्यातून थोडाफार पैसा उभा राहत होता. त्यातून आम्ही पुढे निघालो. सगळ्यात जास्त धक्का दुसर्या लाटेचा होता. हळूहळू सगळे सुरळीत होईल, अशी अपेक्षा असतानाच परत सगळे बंद झाले. त्यामुळे काही कामगार कमीसुद्धा करावे लागले, पण या लाटेतून बाहेर पडल्यावर आता हळूहळू सगळे सुरळीत होत आहे आणि आता परत अजून एक लाट येईल असे जरी म्हणत असले तरी आम्ही आता तयार आहोत,” असे राहुल सांगतात.
“फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात या क्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत. हे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने येणार्यांना खूप संधी उपलब्ध आहेत. पण, या नवीन येणार्यांनी एक गोष्ट मात्र करावी की, सर्वप्रथम या क्षेत्राचे शिक्षण घ्यावे. जगात तसेच भारतातही या क्षेत्राचे शिक्षण देणार्या अनेक संस्था आहेत. या संस्थांत प्रवेश घ्या, या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान मिळवा. तसेच या शिक्षण संस्थांमध्ये या प्रत्यक्ष कामाचा अनुभवसुद्धा घ्यायला मिळतो. त्यामुळे तोही अनुभव घ्या. जेणेकरून आपण या क्षेत्रात उतरत असताना पूर्ण तयारीनिशी उतरता येईल,” असे राहुल या क्षेत्रात येणार्या नवीन उद्योजकांना सांगतात. या क्षेत्रात येणार्या नवीन मुलांना या क्षेत्रात काम करण्याची खूप इच्छा आहे, तसेच ते कार्यरतही आहेत. फक्त त्याला शिक्षणाची जोड असेल तर ते अजून काहीतरी चांगले काम करू शकतात. अजून एक गोष्ट या नवीन उद्योजकांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधत राहिले पाहिजे. खूप नवीन गोष्टी येत आहेत आणि त्या आपण शिकल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत.
“प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधले तर आपल्याला प्रगती करणे आणि कालसुसंगत राहता येते,” असा संदेश देणार्या राहुल आवटी यांचा असा यशस्वी प्रवास...
-हर्षद वैद्य