ठाणे: कोरोना दक्षतेसाठी सज्ज झालेल्या ठाणे महानगरपालिकेला यंदा पावसाळ्यात पूरस्थितीशी लढा द्यावा लागणार आहे. तेव्हा, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, दरड कोसळणे, भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने डोंगर उतारावर आणि खाडी, नाल्यालगत वास्तव्य करणार्या रहिवाशांनी घरे रिकामी करून सुरक्षित निवासाचा पर्याय शोधावा, अशी सावधानतेची नोटीस ठाणे महानगरपालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे; अन्यथा, पावसाळ्यामध्ये एखादी दुर्घटना घडून जीवित वा वित्तहानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे ठाणे महापालिकेच्या मुंब्रा, कळवा, वर्तकनगर, वागळे इस्टेट, नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, लोकमान्यनगर आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील डोंगरउतार, खाडी किनारा आणि नाल्यालगत अनेक झोपडपट्ट्या वसल्या आहेत. कळवा-मुंब्रामधील डोंगरांवर मोठ्या प्रमाणावर झोपड्या धोकादायक स्थितीत आहेत.
मुंब्र्यात इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या घटना वारंवार घडतात. दिवा व आजूबाजूची काही गावे खाडीकिनारी असल्याने पावसाळ्यात खाडीचे पाणी घरात शिरते. अतिवृष्टीमुळे नाल्यालगत राहणार्या झोपडीधारकांचे संसार वाहून जातात. कळवा-मुंब्रा, वर्तकनगर, वागळे इस्टेट भागात डोंगरउतारावरील झोपड्यांना भूस्खलनाचा अनेकदा फटका बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर डोंगर, खाडीकिनारा, नाल्यालगत राहणार्यांनी तत्काळ आपली घरे रिकामी करून इतरत्र सुरक्षित निवारा शोधण्याचे जाहीर आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
कळवा प्रभागातील घोलाईनगर, इंदिरानगर, शिवशक्ती नगर, आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, भास्करनगर, वाघोबानगर या परिसरातील रहिवाशांना नैसर्गिक आपत्तीचा नेहमीच सामना करावा लागतो. आता येथील रहिवाशांना तातडीने सुरक्षित निवारा शोधावा लागणार आहे. मुंब्र्यातील आझादनगर, गावदेवी मंदिरालगत, केणीनगर, सैनिकनगर, कैलासनगर, बायपास, शमशादनगर, राणानगर, पंजाब कॉलनी, वागरी कॉलनी, गौतमनगर, हनुमाननगर, दत्तचौक, दत्तवाडी, दिवा या सखल भागातील नागरिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने तातडीने घरे रिकामी करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
पालिकेने जबाबदारी झटकली?
डोंगरउतार, खाडी किनारा आणि नाल्यालगत राहणार्या झोपडीधारकांना तत्काळ घरे रिक्त करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे जाहीर आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे; अन्यथा, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढून एखादी दुर्घटना वा आपत्तीमध्ये जीवित वा वित्तहानी झाल्यास ठाणे महापालिका जबाबदार नसेल, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे आता ऐनवेळी या रहिवाशांनी कुठे जायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने जबाबदारी झटकल्याचे बोलले जात आहे.