मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेने ’सर्वांसाठी पाणी’ या योजनेचा शुभारंभ केला. पण, ज्यांच्या जोडणी आहेत, त्यांनादेखील वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशी व्यथा मुंबईकर नागरिक मांडत आहेत. याचाच आढावा घेत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मुंबईतील प्रभाग क्र. ४१, संतोषनगर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात माहिती घेतली.
स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही येऊन गेले, त्यांनीसुद्धा काहीच नाही केले. फक्त भाषण दिले. ‘सर्वांसाठी पाणी’ योजना राबवणार केव्हा, किती दिवसात राबवणार, लोकांना किती पाणी मिळणार? आता गर्मीचे दिवस आहेत. जेव्हा पाणी पाहिजे, तेव्हाच ते नाही. नगरसेवकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आमच्या समस्या जाणून सहकार्य केले पाहिजे. आम्ही नोकरी बघणार, मुलांचे शिक्षण बघणार, की पाणी बघणार. आमच्या येथेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सर्वांसाठी पाणी’ योजनेचे उद्घाटन झाले. ते येऊन गेले आणि दुसर्या दिवशी पाणीच आले नाही.”
पाण्यासाठी भीक मागावी लागते
“आम्हाला पाण्याचा अनियमित पुरवठ्याच्या खूपच त्रास होत आहे. १२-१३ वर्षे झाली, आम्ही हा त्रास सहन करत आहोत. फक्त पावसाळ्यात आम्हाला पुरेसे पाणी मिळते. लांबून पाणी आणावे लागत असल्याने कंबर दुखते. पाण्यासाठी लोकांकडे भीक मागायला लागते,” अशी व्यथा येथील स्थानिक महिलांनी बोलून दाखवली.
महापालिका प्रशासनाचा कानाडोळा
स्थानिक महिला म्हणाल्या की, “ ‘सर्वांसाठी पाणी’ ही मुंबई महापालिकेने योजना आणली आहे. पण, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. आमच्या इथे स्वतःच्या नळ जोडण्या आहेत. पाणी आले, तरी त्याला प्रेशर नसतो. पाणी वेळेवर येते आणि वेळेवर जाते. परंतु, पाण्याला प्रेशर नसल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिकेला पत्र पाठवले. आम्ही स्वतः महिला कार्यालयात जाऊन आलो. पण कोणीच लक्ष देत नाही. आम्ही घरकाम करून मुले सांभाळायची की, हंडे घेऊन पाणी मागायला जायचे.”