मुंबई : किरीट सोमय्या आणि त्यांच्या परिवारावर १०० कोटींचा घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. परंतु किरीट सोमय्या आणि त्यांच्या परिवाराविरोधात कोणत्याही प्रकारचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. मात्र आता किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांच्या विरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
"आज प्राध्यापक मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या संबंधी पुढील न्यायालयीन सुनावणी ही २६ मे रोजी होणार असून मेधा सोमय्या यांचा जबाब रेकॉर्ड करण्यात येईल. मला विश्वास आहे त्यानंतर संजय राऊत यांना समन्स केलं जाणार," असा विश्वास किरीट सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला.
त्याचबरोबर "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जानेवारी महिन्यात आमच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले. परंतु या चार महिन्यात एक पैशाचाही घोटाळा समोर आलेला नाही. मंत्री आदित्य ठाकरेंसह इतर आमदार खासदार यांनीही चैकशी मागणी केली. परंतु या सर्व माफिया सेनेनी एवढा गाजावाजा करूनही सोमय्या परिवाराचा एक पैशाचा घोटाळा बाहेर आलेला नाही," असेही सोमय्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हा संजय राऊतांविरोधातील मानहानीचा खटला हा उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.