अकोले : “नदीविषयीची श्रद्धा गढूळ झाली तेव्हा नदीचे पात्रदेखील गढूळ होत गेले. बालपणात पाहिलेले नदीचे काठ आणि आज पाहत असलेले नदीचे काठ यात अंतर पडले असून आपणच नदीच्या केलेल्या या अवस्थेचा विचार होणे आवश्यक आहे. नदी भारतीय संस्कृतीचा स्वर आहे. नद्यांनी भावनिक व मानसिकदृष्ट्या मानवाला समृद्ध केले आहे. त्यामुळे प्रवरा परिक्रमा निश्चितच नदी महात्म्याचे उत्थान करणारा उत्सव आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे यांनी केले. त्या अकोले येथे ‘आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट’, अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रवरा प्रकल्पपूर्ती’ तथा ‘प्रवरा परिक्रमा ग्रंथ प्रकाशन सोहळा’ व ‘अगस्त्य’ या कादंबरीच्या हिंदी अनुवाद ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारचे गजानन डांगे, ‘मोरया प्रकाशन’चे दिलीप महाजन, ‘लिज्जत पापड’चे मुख्य व्यवस्थपक सुरेश कोते, ‘अगस्त्य’ या हिंदी कादंबरीचे अनुवादक विनायक पवळे, ‘आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष तथा ‘अगस्त्य’ कादंबरीचे लेखक प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अरुणाताई ढेरे यावेळी म्हणाल्या की, “नदीच्या संदर्भात होणारा भाव बंधात्मक उठाव नक्कीच कौतुकास्पद आहे. यासाठी होणारे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. तेलाचा थेंब, कस्तुरीचा सुगंध याप्रमाणेच समाजात होणारे चांगले काम समाजमनात संक्रमित होत आहे,” असे त्यांनी यावेळी संस्कृत सुभाषिताचा अर्थ उलगडताना सांगितले.
“नदी माणसाला मिळालेले वरदान आहे. समुद्र जरी मोठा असला, तरी मानवाची तहान नदीच भागवत असते. नदी अखंड प्रवाही आहे. त्यामुळे ती चैतन्यरूपी आहे. नदी माता असून त्यामुळे तिच्या काठचे उत्सव केवळ पर्यटन न राहता त्यात भावार्थ येणेदेखील आवश्यक आहे,” असे डॉ. ढेरे यावेळी म्हणाल्या.
“प्रवरा नदीने व्यापारीदृष्ट्यादेखील मोठे योगदान आहे,” हे सांगतानाच अरुणाताई ढेरे यांनी यावेळी प्रवरा नदीचा इतिहासकालीन मागोवा घेतला. यावेळी त्यांनी प्रवरा नदीचे पौराणिक महत्त्व विशद केले. जिच्यामधून प्रवर रस प्रवाहित होतो ती श्रेष्ठ प्रवरा असल्याचे डॉ. ढेरे यांनी यावेळी सांगितले. प्रवरा नदीचे महात्म्य हे इतिहासकालीन व पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रवरा परिक्रमेबाबत आपण सर्वांनीच या बाबी लक्षात घेऊन नदी भारतीय संस्कृतीचा स्वर : डॉ. अरुणाताई ढेरे त्यांची चिकित्सा होणे आवश्यक आहे. यासाठी नवसंशोधकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. ढेरे यांनी यावेळी प्रतिपादित केले.
‘भावार्थदीपिका’ सांगण्याचा चमत्कार हा प्रवरेच्या काठीच घडल्याचे सांगत डॉ. ढेरे यांनी यांनी ज्ञानेश्वरी व तिचे महत्त्व यावेळी समर्पक भाषेत व्यक्त केले. प्रवरा नदीची सांस्कृतिक समृद्धी अगस्ती ऋषींपासून प्राप्त झाल्याचे डॉ. ढेरे यावेळी म्हणाल्या. त्यामुळे प्रवरा नदी प्रदूषणमुक्त होणे आवश्यक असल्याचे सांगताना समाजातील सर्वच घटकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. नदीच्या संस्कृतीत मानवी संस्कृतीची रहस्यही दडलेली आहेत, याची जाणीव कायम ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. ढेरे यांनी यावेळी प्रतिपादित केले.
परिक्रमेत आध्यात्मिक भावनांचा आग्रह नक्कीच आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी प्रवरा परिक्रमा ही नदीची नसून सांस्कृतिक संचितांची आहे, याची जाणीव आपण ठेवणे आवश्यक असल्याचे मत डॉ. ढेरे यांनी यावेळी व्यक्त केले.
अॅड. के. डी. धुमाळ यावेळी म्हणाले की, “सहस्त्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली प्रवरा नदी परिक्रमा निश्चितच महत्वाची आहे. अगस्ती महाराजांचे कार्य विशद करण्याचे मोठे कार्य सहस्रबुद्धे यांनी केले आहे,” असे धुमाळ यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रवरा नदी परिक्रमेत ‘अगस्ती देवस्थान ट्रस्ट’ची भूमिका त्यांनी विशद केली.
कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना डॉ. सहस्रबुद्धे यांनी प्रवरा नदी परिक्रमेबाबत सविस्तर मांडणी करत अगस्ती ऋषी व प्रवरा नदी यांचे महात्म्य विशद केले. यावेळी त्यांनी अगस्ती आश्रम व अकोले येथे प्रभू रामचंद्र यांच्या वास्तव्याची सोदाहरण मांडणी करताना प्रवरा परिक्रमा पुस्तकाबाबत माहिती विशद केली. याप्रसंगी सुरेश कोते, विनायक पवळे, गजानन डांगे, आदींसह मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.