आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पाणथळ प्रदेशावरील आधारित ‘‘रामसार’ अधिवेशना’चे २०२२ हे पन्नासावे वर्ष आहे. पानथळ अधिवासाचे महत्व आणि ‘रामसार’ प्रकल्पांबाबतच्या इतिहासाची उहापोह करणारा हा लेख..
आज आपल्या सभोवतालच्या पाणथळ जमिनी पूर्वीपेक्षा अधिक धोक्यात आहेत. पाणथळ प्रदेशाच्या संवर्धन व संगोपनासाठी ‘रामसर’ अधिवेशन घेण्यात आले होते. 1972 साली झालेल्या या ‘कन्व्हेन्शन’चा इतिहास आज आपण जाणून घेऊया. या आधी 1960 साली ‘डॉ. ल्यूक हॉफमन’ यांनी पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन बोलावले होते.‘रामसर कन्व्हेन्शन ऑन वेेटलॅण्ड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स’ हा पाणथळ जमिनीच्या संरक्षण आणि शाश्वत वापरासाठीचा आंतरराष्ट्रीय करार आहे. हे नाव इराणमधील ‘रामसर’ शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी 1971मध्ये या अधिवेशनावर प्रथम स्वाक्षरी करण्यात आली होती. डॉ. हॉफमन यांनी 1960 साली ही संकल्पना मांडल्यानंतर दहा वर्षांनी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’(आययुसीएन) आणि ‘युनेस्को’ने डॉ. हॉफमन यांच्याकडून आलेला प्रस्ताव मंजूर केला.
या प्रस्तावामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहयोगाची आवश्यकता मांडली गेली होती. या कार्यक्रमाचा गाभा दलदल, कांदळवनप्रदेश आणि इतर पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन होते. याला ‘प्रोजेक्ट एमएआर’ असे नाव देण्यात आले. कारण, अनेक भाषांमधील पाणथळ प्रदेशासाठी शब्दाची पहिली तीन अक्षरे ‘एम’ ‘ए’ ‘आर’ आहेत - मार्शेस मारेकॅगेस, मारिस्म्स इत्यादी.‘आययुसीएन’ने ‘इंटरनॅशनल कौन्सिल फॉर बर्ड प्रोटेक्शन’ (आयसीपीबी), ‘बर्डलाईफ इंटरनॅशनल’, तसेच ‘आयडब्ल्यूआरबी’ (आंतरराष्ट्रीय जलपक्षी आणि पाणथळ जागा संशोधन ब्युरो) यांनादेखील सहभागी होण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि डॉ. ल्यूक हॉफमन यांना समन्वयक म्हणून नियुक्त केले.
1962च्या ‘एमएआर’ परिषदेत 12 युरोपीय देश आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को आणि अमेरिकेतले सुमारे 80 तज्ज्ञ उपस्थित होते. आर्थिक, वैज्ञानिक आणि नैतिक विचारांवर जवळपास 60 शोधनिबंध सादर केले गेले. पाणथळ जागा, त्या भोवती असलेला प्रदेश आणि राखीव क्षेत्रे परिभाषित करण्यासाठीचे निकष मांडले गेले. कायदा आणि प्रशासकीय उपकरणे, पाणथळ प्रदेशांचे व्यवस्थापन, वापर आणि त्या परिसराचा जीर्णोद्धार करणे, मानवनिर्मित जलाशये, तसेच परिसरातील वनवासी यांची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली.त्यावेळच्या राजकीय वातावरणात या अधिवेशनाला व्यापकपणे स्वीकारले जाण्यासाठी तब्बल आठ वर्ष लागली. अधिवेेशनाचा मजकूर विकसित करण्यासाठी परिषद, तांत्रिक बैठका आणि पडद्यामागील चर्चा केल्या गेल्या. ‘रामसर कन्व्हेन्शन’ हे सर्वात जुने ‘बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय संवर्धन परिषद’ आहे आणि पाणथळ जमिनीसाठी निवडकपणे काम करणारी एकमेव परिषद आहे. फेब्रुवारी 1971 मध्ये इराणच्या रामसर शहरात हे आयोजित करण्यात आले होते. दि. 21 डिसेंबर, 1975 रोजी ते अंमलात आले. यावेळी फक्त सात देशांनी करार केला होता.ऑक्टोबर 2019 पर्यंत 171 करार पक्ष आणि 200 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या दोन हजार ‘रामसर’ठिकाणे नियुक्त आहेत. प्रत्येक करार करणार्या देशाकडे किमान एक ‘रामसर ठिकाण ’ आहे. सर्वाधिक ठिकाणे असलेला देश युनायटेड किंग्डम आहे. या देशात 170 ‘रामसर’ जागा आहेत.
कुठल्याही ठिकाणाचे ‘रामसर’ ठिकाण बनवण्यासाठी, त्या जागेला करार करणार्या देशाने नामांकित करावे लागते. तसेच ‘रामसर’च्या नऊपैकी किमान एकतरी निकष पूर्ण करावा लागतो आणि वैज्ञानिक पुनरावलोकनदेखील पार करावे लागते. या ‘रामसर’ जागांच्या यादीत भारत मागे नाही, याचे फार कौतुक वाटते. हल्लीच म्हणजे, 2022च्या जागतिक पाणथळ दिनाच्या पूर्वसंध्येला ‘रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ने गुजरातमधील जामनगरजवळील ‘खिजाडिया पक्षी अभयारण्य’ आणि उत्तर प्रदेशातील ‘बखिरा वन्यजीव अभयारण्य’ यांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा म्हणून नियुक्त केले. भारतात आत्ताच्या घडीला 49 ‘रामसर’ ठिकाणे आहेत. त्यातील महाराष्ट्रातील दोन जागा आहेत, नांदूरमधमेश्वर आणि लोणार सरोवर. पण यात एक महत्त्वाची भर पडणार आहे, ती म्हणजे, ठाणे खाडी आणि त्यात असलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयरण्याची.
ठाणे खाडी अभयारण्याला ‘रामसर’ स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी मंजुरी मागणारा प्रस्ताव राज्य खारफुटी संवर्धन कक्षाने मांडला होता आणि त्याला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राज्य खारफुटी प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. 18 फेब्रुवारी रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून प्रस्ताव भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयास मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे.
ही घटना या वर्षी समोर येणे ही पक्षिप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. 2021 - 2022 मध्ये ‘एमएमआर’ अर्थात मुंबई महानगर क्षेत्रात असणार्या खाडी आणि पाणथळ प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात फ्लेमिंगोंची नोंद झाली आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’या भारतातील नावाजलेल्या वन्यजीव संशोधन संस्थेच्या संशोधकांनी 2018 पासून फ्लेमिंगोंचा मागोवा घेत आणि ‘टॅगिंग’ करत असताना त्यांना डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान ‘ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्या’त 54 हजार ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ आढळून आले. मागील वर्षांच्या तुलनेत ही एक मोठी वाढ आहे, विशेषत: गेल्या वर्षी (2021-2022) या क्षेत्रांत सर्वात कमी नोंद झाली होती. ठाणे खाडी परिसर हा सुमारे 65 चौरस किलोमीटर क्षेत्र असणारे ‘रामसर’ ठिकाण म्हणून ओळखले जाणार आहे. या परिसरात 17 चौरस किलोमीटर आरक्षित जंगल असून, उर्वरित 48 चौरस किलोमीटर क्षेत्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करण्यात आले होते.
‘रामसर’चा दर्जा मिळाल्यानंतर हे फ्लेमिंगो अभयारण्य पक्षिनिरीक्षणासाठी देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल. यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. शिवाय, यामुळे दलदलीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि मुंबई जागतिक पर्यटन नकाशावर येण्याबरोबरच त्याचे संरक्षण आणि संवर्धनदेखील होईल. ठाणे खाडी हे पक्ष्यांच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती, फुलपाखरे (80), कोळी (80), इतर कीटक (75 पेक्षा जास्त), सरपटणारे प्राणी (30), मासे (24+), खेकडे (12+), सस्तन प्राणी (04) यांचे अभयारण्य आहे. ही जैवविविधता वार्षिक स्थलांतरित अभ्यागतांसाठी हे ठिकाण आवडीचे आहे. हा प्रदेश मातीची धूप रोखतो आणि अचानक येणार पूर प्रतिबंधित करतो. त्याचबरोबर शेजारच्या ‘डम्पिंग ग्राऊंड’मधून 60 हजार टन कार्बन-डायऑक्साइड काढून टाकण्यास मदत करतो. ज्यामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’च्या या काळात शहराच्या पर्यावरणासाठी आणि वातावरणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हिवाळ्याच्या महिन्यात इतर स्थलांतरित पक्ष्यांसाठीदेखील हे आश्रयस्थान असते. जसे की, ‘पायड एव्होसेट्’, ‘ब्लॅक-टेलेड गॉडविट्’,सामान्य ‘रेडशँक्स’, ‘स्टिन्ट्’, ‘रेड प्लोवर’ आणि असे कित्येक पाणपक्षी इथे आश्रय घेतात. त्याचसोबत कीटक, मासे, आणि अनेक जीवजंतू या परिसराचा भाग आहेत. ठाणे खाडी परिसराला हा दर्जा मिळाल्यास, हे महाराष्ट्रातील तिसरे ‘रामसर’ ठिकाण असेल व मुंबईतील पहिले. या प्रस्तावित घोषणेनंतर ‘रामसर’ यादीत भारताचेदेखील अर्धशतक पूर्ण होईल, ही अपेक्षा.
-डॉ मयुरेश जोशी