बुद्धं शरणं गच्छामि!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2022   
Total Views |
 
 
Gautama Buddha
 
 
 
 
 
 
आज बुद्ध पौर्णिमा. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिन. बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाविषयी आपण सर्वच जाणतो. आज मात्र भगवान गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा आणि त्यांच्या मूर्तींवर असणारा तत्कालीन संस्कृतीचा प्रभाव याविषयी संक्षेपाने या लेखात जाणून घेऊया...
 
 
 
भारतीय तत्त्वज्ञानातील बौद्ध धर्माचे प्रवर्तक, यज्ञातील हिंसेला आव्हान देऊन विश्वकल्याण आणि शांती प्रस्थापित करणार्‍या गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात झाला. गौतम बुद्धांची १०० टक्के माहिती सांगणारा संस्कृत किंवा पाली ग्रंथ नाही. ‘जातककथे’तील काही कथांमध्ये गौतम बुद्धांच्या चरित्रकथनास सुरुवात झाली. नंतर लोकोत्तरवादी पंथाच्या ‘महावस्तु’, सर्वास्तिवादींच्या ‘ललितविस्तार’, अश्वघोषाच्या ‘बुद्धचरिता’त, धर्मगुप्त पंथीयांच्या ‘अमिनिष्कणसूत्रा’त बुद्धचरित्र आलेले आहे. बुद्धचरित्र हे साहित्यात विखुरलेले, कधीकधी अतिरंजित, तर कधीकधी अतिचमत्कृतीपूर्ण झालेले दिसते.
 
गौतम बुद्धांच्या चरित्राचा विचार करताना साहित्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तत्कालीन वास्तू, शिल्प, लेणी आणि मूर्तीही महत्त्वाच्या आहेत. त्यांचा अभ्यास करून बौद्धकालीन संस्कृती, इतिहास यांचा अर्थ लावता येतो. बुद्धमूर्तींचा उगम बौद्ध धर्माप्रमाणे भारतातही झाला. बुद्धाची मूर्ती अस्तित्वात येण्यास गौतम बुद्धांच्या जीवितकाळानंतर सुमारे ५०० वर्षे जावी लागली. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहीत धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते.
 
 
बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटना प्रतीकांद्वारे दर्शविल्या जातात. जन्माचे प्रतीक हत्तीच्या (श्वेत गज) रूपाने, ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र (धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रितीने हीनयान पंथाची कला प्रामुख्याने प्रतीकात्मकच राहिली. पुढे महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमा निर्माण झाल्या.
 
 
या पंथातील बुद्धभक्त अनुयायांना बुद्धाच्या अतिश्रेष्ठ गुणांबद्दल आदर वाटून त्याच्या शारीरिक व मानसिक गुणांचे उत्तम प्रदर्शन करण्याची इच्छा निर्माण झाली व त्यानुसार निरनिराळ्या कलाकारांनी आपापल्या कल्पनांनुसार बुद्धमूर्ती तयार केल्या. त्यायोगे बौद्ध मूर्तिकला व चित्रकला यांचा झपाट्याने विकास घडून आला. त्याच्या पुढच्या अवस्थेतील वज्रयान पंथामध्ये तर अनेक बौद्ध देवदेवता निर्माण झाल्या. गौतम बुद्धांच्या पूर्वकालीन व नंतरच्या ‘मैत्रेय’ बुद्धाची मालिकाच तयार झाली व तद्नुषंगाने मूर्तीचे प्रकार व संख्या यांत लक्षणीय भर पडत गेली.
 
बुद्धमूर्तीची जडणघडण निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शैलींनुसार झाल्याचे दिसून येते. ग्रीक कलाकारांनी आपल्या कल्पनेप्रमाणे इ. स. पहिल्या शतकात उपलब्ध असलेल्या मूर्तीवर आधारित धर्मोपदेश करणार्‍या बुद्धाची प्रतिमा गांधार शैलीप्रमाणे तयार केली, तर सारनाथ येथील किंवा श्रीलंकेतील अनुराधपूर येथील ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती तेथील कलाकारांनी आपापल्या कल्पनांप्रमाणे तयार केली. मथुरा शिल्पकारांच्या संकेतांप्रमाणे मूर्तीवरील पोषाख वगैरे असल्यास तो मूर्तीशी एकजीवी असतो. त्यात भावनांचा उद्रेक दिसतो. येथील कलाकारांच्या मनात ध्यानस्थ बुद्धाची प्रतिमा जास्त महत्त्वाची वाटून त्याप्रमाणे त्यांनी मूर्ती तयार केली. येथील मूर्तीच्या चेहर्‍यावरून ध्यानस्थ योग्याचीच कल्पना मनात जास्त ठसते. अनुराधपूर येथील मूर्तीत शांतता व विचारमग्नताच दिसून येते, तसेच भव्यता व निर्भयाताही वाटते.
 
 
कनिष्काच्या कारकिर्दीतील एका नाण्यावर बुद्धाची प्रतिमा पाहावयास मिळते. ही सुरुवातीच्या बुद्धप्रतिमांपैकी एक होय, पण ती फार लहान आकारात आहे. साधारणपणे बुद्धाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व शयन अशा अवस्थांमध्ये दिसून येतात. शिवाय थायलंडमध्ये चालण्याच्या अवस्थेतील पुतळेही आढळतात. चेहर्‍याची, विशेषतः नाकाची किंवा वेषभूषेची अथवा मुकुटाची ठेवण पाहून ही कोणत्या देशातील मूर्ती आहे, हे ओळखता येते. तसेच बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्राप्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रेच्या अवस्थेतील काही दिसतात, तर काही धर्मोपदेश करताना दिसतात. काही कल्याणावस्था दाखविणार्‍या स्वस्तिक मुद्रेत दिसतात. यालाच ‘अभयमुद्रा’ असेही नाव आहे.
 
उत्तरेकडील ग्रीक कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार पुष्कळच देशांत करता आला. काश्मीर व वायव्येकडील प्रांतात अफगाणिस्तानात, बामियान येथील व काबूलच्या संग्रहालयात असलेली बेग्रॅम येथील मूर्ती, तसेच फोंडुकिस्तानातील निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्त्रप्रावणांतील बुद्धमूर्ती गांधार शैलीचा प्रभाव दर्शवतात. मध्य आशियातील तुर्कस्तानात गांधार व भारतीय शैलींचे मिश्रण आढळते, तर चीनकडील भागातील मूर्तिशैलीवर चिनी कलाकारांचा प्रभाव दिसतो. काराशाहर, किझिल, तुर्फान, तुंगहान, चीन, कोरियामार्गे जपानपर्यंत बुद्धांच्या मूर्तीचा प्रवास झालेला दिसतो. जपानमध्ये नारा येथे ५३ फूट उंच धातूची मूर्ती भव्य व प्रेक्षणीय आहे. महायान पंथाचा उद्भव दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात झाला असला, तरी तो पंथ उत्तरेकडील पंजाब व वायव्य प्रदेशातून अफगाणिस्तान, मध्य आशिया, तिबेट, चीन, कोरिया व जपानपर्यंत गेला व त्या त्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीची उपासना सुरु झाली. चीनमधील युन-गांग येथील मूर्तीचे स्मितहास्य, डोळे बाजूला पसरलेले आणि डोक्यावर केसांची गाठ ही वैशिष्ट्येे दिसून येतात. नेपाळ व तिबेट येथील मूर्तीनिर्मितीत तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला असून तेथील मूर्तींचे वर्णन ‘साधनमाला’मध्ये आहे.
 
 
गांधार कलेच्या विरुद्ध मथुरा व सारनाथ येथील कलाकारांनी आपल्या बुद्धाच्या मूर्तींना भारतीय स्वरूप दिले. त्यांनी भारतीय ग्रंथांनी बुद्धाची विशेषतः गुप्तकाळात जी वर्णने केली, त्यांचा उपयोग मूर्तीच्या निर्मितीसाठी करून घेतला. काही बुद्धमूर्तींमध्ये ‘उष्णीष’ हे शिरोवेष्टन दाखविले आहे. उजव्या हाताने मुद्रा दाखवल्या आहेत. एका उभ्या मूर्तीत गांधार कलेचे अवशिष्ट रूप असलेल्या चुणीदार वस्त्राची उंची कमी करून ती घोट्याच्या वरपर्यंतच ठेवलेली आहे. डोक्याभोवती कलात्मक चित्रांचे मंडल काढलेले आहे.
 
 
कत्रा येथील प्रतिमेत बुद्धाने उत्तरिय वस्त्र पांघरलेले दर्शविले आहे. ही मूर्ती सुबक नसून स्थूल व अवजड आहे. त्या मूर्तीच्या बाजूला रक्षक असून डोक्यावर निरनिराळ्या प्रकारच्या नक्षी असलेल्या कमानी आहेत. सारनाथ येथे आढळलेल्या एका उभ्या भव्य मूर्तीवर कोरलेल्या लेखामध्ये कनिष्काच्या कारकिर्दीचा कालनिर्देश आढळतो. बुद्धमूर्तींचे अनुकरण केवळ श्रीलंकेमध्येच नव्हे, तर इंडो-चायनातील चंपा व सेलेबीझमधील सेम्पागा येथेही करण्यात आले. नागार्जुनकोंडा येथे सापडलेल्या मूर्तीमध्ये एक चुणीदार वस्त्र असलेली उभी मूर्ती आहे.
 
 
त्या मूर्तीचा एक खांदा अनावृत्त असून वरील चुणीदार वस्त्र ‘संघाटी’ म्हणून आहे. येथील स्तूपातील कलाकुसर सारनाथ येथील कलाकुसरीपेक्षा जास्त आहे. अनेक ठिकाणी स्तूपांतील बुद्धाची जागा रिकामी ठेवलेली आहे. इतरत्र बुद्धाच्या अनेक मूर्ती विखुरलेल्या आहेत. हे मूळचे हीनयान क्षेत्र असले, तरी महायान पंथाचा परिणाम खूप झालेला दिसतो. बुद्धाच्या मूर्तींचे डोके लहान कुरळ्या केसांच्या झुपक्यांनी आच्छादलेले व सुबक घडवलेले दिसते. येथील क्षेत्रात गांधार व मथुरा येथील शिल्पकलांचे मिश्रण पाहावयास मिळते.
 
 
गुप्तकलेच्या ऊर्जितावस्थेमध्ये भिंतीवर सर्वत्र बुद्धाच्या प्रतिमा काढलेल्या दिसून येतात. या कल्पनांना अनुसरून चीन देशातही तिसर्‍या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत मूर्ती कोरल्या गेल्या. चैत्यघरही स्वतंत्र मंदिर झाले. मंदिराची उंच उंच शिखरे अस्तित्वात येऊ लागली. बुद्धाच्या मूर्ती बौद्ध वाङ्मयात आलेल्या वर्णनाप्रमाणे घडवण्यात येऊ लागल्या. ‘उष्णीष’ व अंगावरील महापुरुषाची लक्षणे दर्शविली जाऊ लागली. बुद्धाच्या उभ्या मूर्तींना बाक देण्यात येऊन भारतीय नृत्यातील ‘त्रिभंग’ अवस्थेचे वळण त्यात दिसू लागले.
 
 
या काळातील नमुना म्हणून सारनाथ येथे असलेली, धर्मोपदेश करणार्‍या बुद्धाची मुद्रायुक्त बैठी मूर्ती उल्लेखनीय आहे. अजिंठा येथील कलाकारांनीही बुद्धचरित्रावर आधारित उत्स्फूर्त निर्मिती केली. याचा प्रभाव दक्षिणेत श्रीलंका येथे व आग्नेयेकडील देशांतही दिसतो. उभ्या मूर्तीच्या अंगावर कोरलेले वस्त्रही पारदर्शक आहे. गुप्तकलेचे क्षेत्र सारनाथ येथेही होते. श्रीलंकेत अनुराधपुरात एक ध्यानमूर्ती आहे. त्या मूर्तीत दिसणारा आंतरिक भाव, अंतस्थ शांती व भव्यता पाहणार्‍याच्या मनात आदर निर्माण करते. ब्रह्मदेशात जुन्या गुप्तकालीन मूर्तीप्रमाणे तयार केलेली मूर्तीही आढळून येते. तसेच निरनिराळ्या ठिकाणी डोक्यावरील व्यवस्थित केलेल्या चूडासकट मूर्ती आढळतात. सयाम (थायलंड) व कंबोडियामध्ये ‘दीपशिखा’ डोक्यावर असलेल्या मूर्ती आढळतात. बँकॉकच्या राजवाड्यात चक्रवर्तीप्रमाणे मधून मधून बाह्य अलंकार आणि रम्य शिरोवेष्टन असलेली रत्नजडित मूर्ती आढळते. बोरोबूदूर (जावा) येथील बुद्धाची मूर्ती भारतीय शैलीची आहे. तेथे जातककथाही शिल्पांकित केलेल्या आढळतात.
 
या सर्व मूर्ती पाहून त्यातील वैविध्य दिसून येते. गांधार प्रतिमांतील शरीरसौष्ठव व बाह्यदर्शन विस्मयकारक आहे, पण बुद्धाच्या मूर्तीत आवश्यक असणार्‍या मानसिक भावांचा त्यात अभाव दिसतो. मात्र, सारनाथ येथील मूर्तीत तसेच, अनुराधपूर येथील मूर्तीत हा भाव प्रदर्शित केलेला आहे. गुप्तकालीन भारतीय मूर्तींत हे गुण विशिष्ट रीतीने दिसतात. या भारतीय शिल्पांचेच अनुकरण आग्नेय आशिया खंडातील मूर्तीत तसेच किंवा थोडाफार फरक करून केलेले आहे. त्या दृष्टीने अनुराधपूर येथील मूर्तीला किंवा भारतातील गुप्तकालीन मूर्तीला खास वैशिष्ट्य प्राप्त झालेले आहे.
 
गौतम बुद्धांनी विविध मुद्रा, हस्तसंकेत या सर्वांतून जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे. गौतम बुद्धांच्या विविध मूर्तींचे निरीक्षण केले, तर प्रमुख दहा हस्तमुद्रा दिसून येतात. धम्मचक्र मुद्रा, ध्यान मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, वरद मुद्रा, करण मुद्रा, वज्र मुद्रा, वितर्क मुद्रा, अभय मुद्रा, उत्तरबोधी मुद्रा आणि अंजली मुद्रा.
 
धम्मचक्र मुद्रा
 
 
या मुद्रेला धम्मचक्र ज्ञानाचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.
 
 
ध्यान मुद्रा
 
 
या मुद्रेला ‘समाधी’ किंवा ‘योगमुद्रा’ म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा बुद्ध शाक्यमुनी, ज्ञानीबुद्ध आणि चिकित्सक बुद्ध इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोटे उघडून मांडीवर ठेवण्यात येतो.
 
 
भूमिस्पर्श मुद्रा
 
 
या मुद्रेला पृथ्वीला म्हणजे जमिनीला स्पर्श करणे असे दर्शवले जाते. ही मुद्रा बुद्धांची ज्ञानप्राप्ती दर्शवते. कारण, बुद्धांच्या मते, पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते.
 
 
वरद मुद्रा
 
 
वरद मुद्रा ही अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो, तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो.
 
 
करण मुद्रा
 
 
करण मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटे दुमडली जातात. ही मुद्रा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते.
 
 
वज्र मुद्रा
 
 
वज्र मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायु, जल, अग्नी, पृथ्वी आणि धातू यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मूठ करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवले जाते की, उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल.
 
 
वितर्क मुद्रा
 
 
वितर्क मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडला जातो आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते.
 
 
अभय मुद्रा
 
 
अभय मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे, जी सुरक्षा, शांती, परोपकार आणि भय दूर करणे यांचे प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहुला दुमडून हाताच्या बोटांना वर उचललेले असते.
 
 
उत्तरबोधी मुद्रा
 
 
उत्तरबोधी मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात, तर इतर बोटे ही आतल्या बाजूने दुमडलेली असतात.
 
 
अंजली मुद्रा
 
 
अंजली मुद्रेला ‘नमस्कार मुद्रा’ किंवा ‘हृदयांजली मुद्रा’देखील म्हणतात, जी अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर दुमडलेल्या स्थितीत असतात. तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात. भगवान गौतमबुद्धांचे जीवनकार्य, बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान याप्रमाणेच बुद्धमूर्ती, बुद्धमुद्रा हाही अभ्यासकांच्या संशोधनाचा व व्यासंगाचा महत्त्वाचा विषय ठरला आहे.
 
 
इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो,
पुरिसधम्मसारथि सत्त्था देव अनुस्सानं बुद्धो भगवाति॥
 
 
जीवनमुक्ती, योग्य, जागृत, विद्या व आचरण यांनी युक्त, सुगती ज्यांनी प्राप्त केली आहे असे, लोकांना जाणणारे, सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचा सारथी व आधार देणारे, देव मनुष्य व यांचा गुरू असे हे भगवान बुद्ध आहेत, अशा बुद्धांना मी शरण जातो... बुद्धं शरणं गच्छामि...!
 
 
 
 
 
 - वसुमती करंदीकर 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@