ज्यू-अरब भाऊ-भाऊ, मिळून मिसळून सुखात राहू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
Untitled design



जेकब हर्झोग हा ज्यू राबी म्हणजेच धर्मगुरू हल्ली वारंवार जेरूसलेमहून सौदी राजधानी रियाधला जात असतो. तिथे तो वेगवेगळ्या अरब वस्त्यांमध्ये फिरतो. ज्यू लोकगीतं म्हणत रस्त्यातल्या लोकांबरोबर नाचतो आणि त्याच्या व्हिडिओ क्लिप्स समाजमाध्यमांवर टाकतो. त्याने स्वत:चं स्वत:ला ‘सौदी अरेबियाचा पहिला ‘ज्यूईश राबी’ असं घोषित करून टाकलं आहे. त्याला कुणीही आक्षेप घेतलेला नाही.


भारताच्या थेट पश्चिमेला यमन आणि उमान, असे दोन देश आहेत. आपण त्याचा येमेन आणि ओमान असा चुकीचा उच्चार करतो. या दोन देशांपासून पुढे अरब वंशीय लोकांचा भूप्रदेश सुरू होतो. यमन आणि उमानच्या उत्तरेला सौदी अरेबिया हा भलामोठा देश आहे. ती इस्लामची जन्मभूमी. जगभरातल्या तमाम इस्लाम धर्मीयांना सौदी अरेबिया ही आपली पुण्यभूमी वाटते. सौदी आणि उमान यांच्या वायव्येकडच्या बेचक्यात सात छोटी अरब संस्थानं किंवा राज्यं आहेत, ज्यांना अरबी भाषेत ‘अमिराती’ असं म्हणतात. अबूधाबी, अजमान, दुबई, फुजियारा, रास-अल्-खैमा, शारजा आणि उम्म-अल्-कुबाईन अशा या सात अमिरातींचे अमीर म्हणजेच राज्यप्रमुख एकत्र आले. त्यांनी आपला एक देश बनवला आणि त्याला नाव दिलं - संयुक्त अरब अमिराती, म्हणजेच युनायटेड अरब एमिरेटस् उर्फ युएई.



यमन या अरबी देशात गेली काही वर्षं जोरदार यादवी युद्ध सुरू आहे. ‘हाउथी’ नावाची अरबांचीच एक जमात यमनच्या उत्तर भागात धुमाकूळ घालते आहे. इतर अरब टोळ्या किंवा यमनचं अधिकृत सैन्य यांच्याशी लढतानाच हाउथी बंडखोर यमनमधल्या ज्यू लोकांनाही हुसकावून लावत आहेत.


इतिहास काळात, जेरूसलेम या पवित्र शहरावर ताबा मिळवण्यासाठी, ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यात कित्येक शतकं लढाया चालू होत्या. त्यांना ‘क्रुसेड युद्धं’ असं म्हणतात. कधी मुसलमानांची सरशी होई, तर कधी ख्रिश्चनांची. पण जो पक्ष जिंकेल, तो विरोधकांसकट तिथल्या ज्यू लोकांची पण कत्तल उडवणार, हे ठरलेलंच असे. ज्यू लोकांचं जेरूसलेममध्ये टिकून राहाणं दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना नकोसं असायचं.


तर तसंच हाउथी बंडखोरांनाही यमनमध्ये ज्यू नको आहेत. मग त्यांनी कुठे जावं? अर्थातच इस्रायलला! आत्तापर्यंत असंच होत होतं. १९४८ साली इस्रायल हे ज्यू लोकांचं राष्ट्र निर्माण झाल्यावर संपूर्ण जगातून ज्यू धर्मीय लोक तिथे जाऊ लागले. अरब देशांनी इजिप्तच्या नेतृत्वाखाली इस्रायलला नष्ट करण्याचा वारंवार, आटोकाट प्रयत्न केला. दरवेळी इस्रायलने त्यांना हग्या मार दिला. याचा राग ते देश आपल्या राज्यातल्या उरल्यासुरल्या ज्यूंवर काढायचे. त्यांचा छळ करायचे. त्यांचं नागरिकत्व रद्द करायचे. मग त्या ज्यूंना सर्वस्व गमावून, नेसल्या वस्त्रानिशी इस्रायलकडे धाव घेण्याशिवाय पर्यायच नसायचा.


पण, २०१९ सालापासून वारं बदलत चाललं आहे. हाउथी बंडखोरांच्या तडाख्यातून सुटलेले ज्यू इस्रायलला न जाता संयुक्त अरब अमिरातीत गेले आहेत. स्वत:च्या इच्छेने नव्हे, तर अमिरातींच्या आग्रहाच्या आमंत्रणावरून. तो पाहा युसुफ हामदी. त्याचं नाव मुसलमानी भासलं, तरी तो यमनी ज्यू आहे. अमिरातींचं नागरिकत्व अधिकृतपणे स्वीकारणारा पहिला यमनाईट ज्यू म्हणून अमिरात सरकारने त्याला मोठा पगार, मोठं घर, गाडी वगैरे देऊन दुबईमध्ये वसवलं आहे.


आता अमिरातींमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसंच दुबई हे ‘करमुक्त शहर’ असल्यामुळे तिथे पर्यटन व्यवसाय भलताच फोफावला आहे. त्यामुळे जगभरातून अनेक ज्यू लोक रोजगारासाठी आणि खुद्द इस्रायलमधून पर्यटनासाठी दुबई नि अबुधाबीकडे लोटत आहेत. तो पाहा एडविन शुकेर तो मुळचा इराकी ज्यू. इराकमधल्या अशांत वातावरणामुळे तो ब्रिटनला स्थलांतरित झाला होता. आता तो दुबईत आला आहे. तो म्हणतो, “आम्ही लोक पुन्हा मध्यपूर्वेत आलो” म्हणजे मध्यपूर्वेतल्याअरब देशात असं त्याला म्हणायचंय.


खुद्द इराकमधली स्थिती वेगळी नाही. १९४८ पूर्वी इराकची राजधानी शहर बगदाद मधल्या लोकसंख्येपैकी किमान २५ टक्के ज्यू होते. १९४८ नंतर त्यांना पळून जावं लागलं. सद्दाम हुसैनच्या राजवटीत तर ज्यू हे हाडवैरीच होते. पण, आता सर्वसामान्य इराकी अरब नागरिक इस्रायलकडे, आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या नात्याने बघतो. इराकचा कट्टर शत्रू म्हणजे इराण आणि इराणने इस्रायलचाही नायनाट करण्याचा विडा उचलला आहे. कमाल आलम नावाचा अभ्यासक म्हणतो, “अरब देशांमधल्या नव्या पिढीला, यात नव्या पिढीचे राज्यकर्तेही आलेच, इस्रायल आणि त्यांनी पॅलेस्टिनी अरबांवर केलेला कथित अन्याय इत्यादींची फारशी माहिती नाही आणि परवाही नाही. उलट तेलाचा पैसा नसतानाही हा इस्रायल देश चालतो तरी कसा, याबद्दल त्यांना फार कुतूहल वाटतं.”



पण, हे तर काहीच नाही. ज्या इजिप्तने अरब जगताचं नेतृत्व करीत इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याचा निर्धार केला होता; तोच इजिप्त आज इस्रायलचा उत्तम मित्र बनला आहे. अब्दल फतह अल् सीसी यांचं इजिप्त सरकार इस्रायलला नाना प्रकारच्या सवलती देऊन आमंत्रण करीत आहे. अलेक्झांड्रिया उर्फ इस्कंदरिया आणि कैरो उर्फ काहिरा ही इजिप्तमधली फार प्राचीन शहरं आहेत. पूर्वी तिथे मोठमोठ्या ज्यू वस्त्या होत्या.




अनेक नामवंत ज्यू अलेक्झांड्रियातल्या प्राचीन दफनभूमीत चिरविश्रांती घेत पडले आहेत, तर संपूर्ण मध्यपूर्वेतलं सर्वात मोठं सिनेगॉग म्हणजे ज्यू मंदिर कैरोमध्ये होतं. १९४८ नंतर या सगळ्याचीच पार वाताहात झाली होती. आता इजिप्त सरकार त्या दफनभूमीचं आणि सिनेगॉगचं पुनरूज्जीवन करीत आहे. लक्षात घ्या, ज्या कैरोमध्ये ‘मुस्लीम ब्रदरहुड’ ही आत्यंतिक कट्टरवादी इस्लामी संघटना जन्मली आणि तिने ज्यू आणि ख्रिश्नन यांच्याविरूद्ध जागतिक लढा पुकारला; त्याच कैरोमध्ये चक्क एका सिनेगॉगचं पुनरूज्जीवन इजिप्शियन सरकार करतंय.


आणि सौदी सरकारने तर कमालच केलीय. सध्या सलमान बिन अब्दुल अजीझ अल् सौद हे सौदी अरेबियाचे सुलतान आहेत. पण, ते ८७ वर्षांचे आहेत. त्यामुळे खरा कारभार युवराज मुहम्मद बिन सलमान हेच पाहातात. इस्रायली गुंतवणूक आणि इस्रायली पर्यटक अधिकाधिक प्रमाणात सौदीमध्ये यावेत म्हणून युवराज नाना प्रकारच्या सवलती देत आहेत. सौदी अरेबियाच्या वायव्य किनार्‍यावर म्हणजेच इस्रायलच्या जवळ नोआम या ठिकाणी तब्बल पाच हजार कोटी डॉलर्स गुंतवून एक भव्य ‘हायटेक सिटी’ उभी करण्याचं युवराजांचं स्वप्न आहे. त्यात त्यांना इस्रायलची मदत हवी आहे. सौदीच्या वायव्येलाच, पण किनारपट्टीपासून बरंच अंतर्भागात, भर वाळवंटात अल् उला नावाचं एक प्राचीन गाव आहे. तिथे इसवी सन पूर्व काळातल्या कोरीव गुंफा सापडल्यामुळे हल्ली जगभरातून पर्यटकांचा ओघ तिकडे लोटत असतो.


आता सौदी अरेबियात इस्लामचा उदय होण्यापूर्वी ख्रिश्चन आणि ज्यू हेच धर्म होते आणि इसवी सनापूर्वीच्या गुंफा म्हणजे ज्यू कालखंडातल्या गुंफा. पण, म्हणून आचरट अफगाणांनी बामियान बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्या, तसला आततायीपणा न करता सौदी सरकारने त्या गुंफा संरक्षित केल्या आहेत. अलीकडेच एका इस्रायली कंपनीने तिथे ‘हाबितास’ नावाचं भव्य पंचतारांकित हॉटेल उभारलं आहे. या प्रकल्पाला देखील युवराजांची अनुकूलता आहे.


सगळ्यात गंमत म्हणजे, जेकब हर्झोग हा ज्यू राबी म्हणजेच धर्मगुरू हल्ली वारंवार जेरूसलेमहून सौदी राजधानी रियाधला जात असतो. तिथे तो वेगवेगळ्या अरब वस्त्यांमध्ये फिरतो. कोपर्‍यावरच्या टपर्‍यांमध्ये बसून स्थानिक अरबांसोबत गप्पा मारतो. कॉफी पितो. त्यांना अरबी भाषेतली ज्यू प्रार्थना पुस्तकं वाटतो. ज्यू लोकगीतं म्हणत रस्त्यातल्या लोकांबरोबर नाचतो आणि त्याच्या व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमांवर टाकतो. त्याने स्वत:चं स्वत:ला ‘सौदी अरेबियाचा पहिला ‘ज्यूईश राबी’ असं घोषित करून टाकलं आहे. त्याला कुणीही आक्षेप घेतलेला नाही. ज्यू पर्यटक फार मोठ्या संख्येने येत असल्यामुळे हल्ली रियाधमध्ये रस्त्यावर, बसमध्ये, कॅफेमध्ये अरेबिकप्रमाणेच हिब्रूमध्ये संवाद ऐकू येणं सर्रास झालं आहे.


सौदी भूप्रदेशात आणखी काही ठिकाणी अल् उलाप्रमाणेच प्राचीन ज्यू पुरातात्विक अवशेष सापडण्याची शक्यता इस्रायली पुरातत्वशास्त्रज्ञांना वाटते आहे. त्याठिकाणी उत्खनन करण्याची खुली परवानगी युवराज मुहम्मद बिन सलमान यांनी त्यांना दिली आहे. सुलतान अल् मूसा हा लेखक म्हणतो, “हल्ली आम्ही सौदी नागरिक पॅलेस्टिनी किंवा लेबनीज अरबांपेक्षा ज्यूंच्या जास्त जवळ आहोत.” या सुलतान अल् मूसाने, प्राचीन काळात ज्यू लोकांनी रोमन साम्राज्याविरूद्ध कसं बंड पुकारलं होतं, या विषयावर अरबी भाषेत एक कादंबरी लिहिली असून, सध्या ती भलतीच लोकप्रिय झाली आहे.

दिग्दर्शक रमेश तलवारच्या ‘दुनिया’ या चित्रपटात खलनायक प्राणचा एक लाडका डायलॉग आहे - ‘किस्मत जब पलटती हैं, तब यूँ पलटती हैं!’ मात्र, इस्रायलचं हे नशीब असंच योगायोगाने उघडलेलं नाही. गेल्या पाऊणशे वर्षांचे अविरत कष्ट, घाम, रक्त आणि अश्रू यांतून हा बदल घडलेला आहे. अरब देशांमध्ये ज्यूंच्या प्रेमाचा असा उमाळा आलेला असताना, खुद्द इस्रायलमधल्या मूळच्या मध्यपूर्वेतल्या ज्यूंना पण आपली अरबी संस्कृती आठवतेय. उदा. उम्म कुलथूम ही एक लोकप्रिय इजिप्शियन गायिका होती. आपल्या लताबाईंप्रमाणेच संपूर्ण अरबी भाषिक जगात तिची गाणी आजही लोक जीवाचा कान करून ऐकतात. गंमत अशी की, इजिप्त, लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, इराक, सौदी इत्यादी अरब देशांतून जे ज्यू इस्रायलला स्थलांतरित झाले, त्यांना पण उम्म कुलथूमची गाणी आवडायची. कारण, त्यांच्याही कित्येक पिढ्या अरबी भाषा, अरबी संगीत ऐकतच होत्या. मात्र, इस्रायलमध्ये आल्यावर उम्म कुलथूमची ध्वनिमुद्रिका लावण्याची त्यांची हिंमतही होत नव्हती. या मुळच्या अरबी ज्यूंना म्हणतात ‘मिझराही ज्यू.’


मिझराही ज्यूंची नवी पिढी आता खुद्द इस्रायलमध्ये उम्म कुलथूमसकट इतरही अरबी गाणी अगदी मोठ्ठा आवाज ठेवून बिनधास्तपणे ऐकते. त्यांची अशीही तक्रार आहे की, इस्रायली जीवनात युरोपीय देशांमधले ज्यू जरा जास्तच पुढे-पुढे करतात आणि आम्ही अरबी देशांमधून आलेल्या ज्यूंना चेपायला बघतात. तीन मिझराही ज्यू गायिका बहिणींनी अरबी गाण्यांचा एक अल्बम प्रसिद्ध केला. तो कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. जेरूसलेमच्या एका अध्ययन संस्थेतली विदूषी लील मेगहन म्हणते, “इस्रायली संस्कृतीचं अरबीकरण होत आहे.” किस्मत जब पलटती हैं, तब यूँ पलटती हैं!







@@AUTHORINFO_V1@@