नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोव्यासाठीच्या विशेष संवाददातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे मानवाधिकारांची काळजी घेणे, त्यावर लक्ष ठेवणे, सल्ला देणे आणि त्यांचे उल्लंघन होऊ नये, यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष संवाददात्यांची नियुक्ती राज्यांसाठी केली जाते. त्यापैकी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या विशेष संवाददातापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष संवाददात्यांना गुन्हेगारी व कायदा व्यवस्था, पोलीस व पोलीस सुधारणा, दहशतवाद, जातीय दंगे, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक, मजूर व बालमजूर, अन्न, वरिष्ठ व ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, जनजाती विकास, पर्यावरण, महिला व बालके, मानवी तस्करी आणि तृतीयपंथी आदींच्या संदर्भात मानवी हक्कांविषयी जबाबदारी पार पाडावी लागते.