मुंबई(प्रतिनिधी): आसाममधील ओरांग नॅशनल पार्कमध्ये शिकाऱ्यांनी गेंड्याचे शिंग काढण्यासाठी ट्रँक्विलायझरचा वापर केल्याचे समोर आले. सोमवारी दि. ९ मे रोजी उद्यानात तैनात कर्मचार्यांना मुवामारी परिसरात नियमित गस्त घालत असताना सुमारे आठ ते दहा वर्षाचा शिंग कापला गेलेला प्रौढ नर गेंडा आढळून आला.
गेंडा बेशुद्ध झाल्यानंतर एका तज्ञाच्या हाताने धारदार शस्त्राने शिंग कापल्याचे वनविभागाला आढळून आले. मात्र, गेंड्यावर गोळीच्या जखमा आढळल्या नाहीत. घटनेची खात्री करण्यासाठी राज्य प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय डॉक्टरांसह तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर शिकारींनी प्राण्याला बेशुद्ध केले आणि नंतर त्याचे शिंग काढले, असा निष्कर्ष काढण्यात आला. शिकारींनी लक्ष्य केलेला एक शिंगी गेंडा ही एक लुप्तप्राय प्रजाती आहे. याच्या शिंगाचा वापर चिनी पारंपारिक औषधांमध्ये केला जातो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत खूप जास्त आहे.
फक्त क्वचित प्रसंगी इतर गेंड्यांशी लढताना गेंडे शिंगे गमवतात.
“ओरांगमध्ये ट्रँक्विलायझर गन वापरून गेंड्याच्या शिंगाची शिकार करण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अशा एक-दोन घटनांची नोंद झाली होती. परंतु प्राणी जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी अशा पद्धतीने शिंग काढल्याचे आम्हाला प्रथमच आढळले आहे,” असे ओरांग व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक बरुआ यांनी सांगितले.