पत्राचाळवासीयांच्या समस्या संपता संपेनात!

‘म्हाडा’ भाड्यावरून वाद सुरूच

    12-May-2022
Total Views |
 
 
 
 
 
mhada
 
 
 
 
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांच्या सहभागामुळे राज्यभरात गाजलेल्या गोरेगांवच्या सिद्धार्थ नगर येथील पत्राचाळीतील रहिवाशांच्या समस्या काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मुद्द्यांमुळे पूर्ततेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्यासमोर आता ’म्हाडा’च्या कृतीमुळे निर्माण झालेली समस्या उभी ठाकली असून, रहिवाशांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
 
 
 
प्रकल्पाची पूर्तता होईपर्यंत स्थानिक रहिवाशांना संबंधित प्रशासनातर्फे देण्यात येणार्‍या भाड्याच्या रकमेवरून आता ‘स्थानिक विरुद्ध म्हाडा’ असा वाद नव्याने निर्माण झाला आहे. ’म्हाडा’तर्फे स्थानिक रहिवाशांना भाड्यापोटी देण्यात येणार्‍या १८ हजार रुपयांच्या रकमेवरुन स्थानिक नाराज असून आम्हाला भाड्यापोटी 40 हजार रुपयांची रक्कम प्रतिमहिना देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
 
 
 
आमचा ‘म्हाडा’वर विश्वास नाही!
 
 
भाड्याच्या रकमेच्या संदर्भात आम्ही करत असलेली मागणी अगदी योग्य आहे. आम्हाला २०१३ पासून ४० हजार रुपये इतके भाडे देण्यात येत होते. मात्र, आता ते बंद करून केवळ १८ हजार दिले जात आहे. भाड्याच्या प्रश्नासोबतच या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेला त्रिपक्षीय करार अद्याप प्रलंबित आहे. या ’म्हाडा’कडून स्थानिक आणि संबंधित यंत्रणांमध्ये कुठलाही समन्वय साधला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या प्रकारामुळे आमचा ‘म्हाडा’वर विश्वास नसून जोपर्यंत आम्हा स्थानिकांना आमची घरे ताब्यात दिली जात नाहीत, तोवर विकासकाला ‘ओसी’ देण्यात येऊ नये.