कच्छच्या आखातामधून जिवंत समुद्री गायीची नोंद; मिळाला पहिलाच छायाचित्रित पुरावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022   
Total Views |
dg
 
 
मुंबई(प्रतिनिधी): कच्छच्या आखातामधून प्रथमच दुर्मीळ समुद्री गायीचे (डुगाॅंग) छायाचित्र टिपण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्लूआयआय) संशोधकांनी एरियल ड्रोनच्या माध्यमातून समुद्री गायीचे छायाचित्र टिपले. गुजरातच्या सागरी परिक्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतके दुर्मीळ समुद्री गायीचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी गुजरात वन विभाग आणि डब्लूआयआयकडून अभ्यास प्रकल्प सुरू आहे.
 
 
कच्छच्या आखातातून डुगॉंगचा नैसर्गिक अधिवासातील पहिला छायाचित्र पुरावा मिळाला आहे.
डुगाॅंग हे किनारी सागरी परिसंस्थेत मूलभूत भूमिका बजावतात. भारतीय किनारपट्टीवर अंदमान आणि निकोबार बेट, तामिळनाडू (मन्नार आणि पाल्क बेचे आखात) आणि गुजरात (कच्छचे आखात) या तीन ठिकाणी डुगाॅंगचा अधिवास आढळतो. मच्छिमारांच्या माहितीनुसार या भागात डुगॉंगच्या अस्तित्व होते. परंतु, याआधी गुजरातच्या किनार्‍यावरून जीवंत डुगॉंगचे छायाचित्रित पुरावे मिळाले नव्हते. त्यासाठी डब्लूआयआयच्या संशोधकांकडून या प्राण्याच्या संवर्धनासाठी एक अभ्यास प्रकल्प सुरू होता.
 
 
गेल्या पाच वर्षांपासून डब्लूआयआयकडून यासंबंधीचा अभ्यास सुरू आहे. मात्र, सध्या 'क्रिटिकल डुगॉन्ग मॅपिंग' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डब्लूआयआयचे डॉ. जे.ए. जाॅन्सन आणि पॉंडिचेरी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. के. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखील संशोधक समीहा पठाण, सागर राजपूरकर, शिवानी पटेल, प्राची हटकर, जेम ख्रिश्चन आणि उझैर कुरेशी हे डुगाॅंगवर संशोधनाचे काम करत होते. या कामासाठी एरियल ड्रोनचा वापर करुन डुगाॅंगच्या अस्तित्त्वाचा पुरावा नोंदवण्याचे काम सुरू होते. हे काम संशोधक सागर राजपुरकर यांच्या माध्यमातून सुरू होते. अखेरीस राजपुरकर यांना कच्छच्या आखातामधून जिवंत डुगाॅंगचे छायाचित्र टिपण्यात यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे कच्छच्या आखातामधून नोंदवलेला हा जिवंत डुगाॅंगचा पहिला छायाचित्र पुरावा आहे.
“अंदाज आणि अप्रत्यक्ष पुरावे असूनही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले छायाचित्र हे कच्छच्या आखातातील डुगाॅंगच्या अस्तित्वाची पुष्टी करतात. ही एक यशस्वी कामगिरी आहे. ज्यामुळे सागरी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाला कच्छच्या आखातातील डुगाॅंगच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल. - सेंथिल कुमारन, उपवनसंरक्षक, मरीन नॅशनल पार्क, जामनगर”
 
 

dg1 
 
डुगाॅंगविषयी
डुगाॅंग ही सिरेनिया समुद्री गायीच्या अस्तित्वात असलेल्या फक्त चार प्रजातींपैकी एक आहे. हा एकमेव तृणभक्षी सस्तन प्राणी आहे, जो केवळ समुद्रातील गवताळ अधिवासावर अवलंबून आहे. वाढत्या मासेमारीमुळे आणि इतर किनारी विकास कामांमुळे भारतातील समुद्रातील गवताळ अधिवासांचा ऱ्हास झाला आहे. यामुळे डुगाॅंगचे अस्तित्व संकटात सापडले आहे. मात्र, १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा सागरी सस्तन प्राणी प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. तसेच हा प्राणी ’कनव्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पिसीज ऑफ वाईल्ड फौना अ‍ॅण्ड फ्लोरा’(सायटिस) अंतर्गतही संरक्षित आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@