मुंबई : “एकतर पाणी येण्याची वेळ निश्चित अशी नाही. कधी सकाळी ८ वाजता, तर कधी ९ वाजता, असे आमच्या पाण्याचे नियोजन आहे. त्यातही तीन तासांसाठी येणार्या पाण्यात सुरुवातीचा एक तास अक्षरशः दूषित पाण्याचा पुरवठा आम्हा नागरिकांना होतो, ही वस्तुस्थिती आहे. मुळात पाणी व्यवस्थित येत नाही आणि आलेच, तर ते दूषित स्वरूपात येते. अशी सद्यःस्थिती आहे,” अशी हतबलता मालवणीच्या गायकवाड नगर भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मालवणीतील विविध समस्यांवर स्थानिकांनी नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
लोकप्रतिनिधी समस्यांबाबत उदासीन
या भागातील ज्या पाईपलाईन आहेत, त्या जमिनीत आठ फूट खोलीवर आहेत, त्यामुळे त्यातून होणारा पाणीपुरवठा किती वेगाने होत असेल याबाबत न बोललेलेच बरे. तसेच, या भागातील पाईपलाईन ही सुमारे २० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यातून पाण्याचा प्रवाह देखील व्यवस्थितरीत्या होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रभागाच्या काही माजी लोकप्रतिनिधींकडे याबाबत अनेकदा तक्रार करूनही कुठलेही समाधान निघालेले नाही. त्यामुळे सदरील प्रश्नी त्यांची भूमिका उदासीन आहे हे स्पष्ट होते.
- ओमप्रकाश जैस्वाल, स्थानिक रहिवासी
पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागते
आम्ही मागील ५० वर्षांपासून येथे वास्तव्यास आहोत, त्यापैकी मागील २० वर्षांपासून ही समस्या आम्हाला भेडसावते आहे. प्रशासनातर्फे केल्या जाणार्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर महिन्यात अनेक वेळा आम्हाला पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागते, अशी स्थिती आहे. या प्रकरणावर वर्षभरात मार्ग काढण्याचे केवळ आश्वासनच आम्हा नागरिकांना अनेक वेळा देण्यात आले. मात्र, अद्याप त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही, हे नक्की.
- मकबूल शेख, स्थनिक रहिवासी