मुंबई(प्रतिनिधी): आज दि. १२ रोजी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईवर ढगाळ वातावरण दिसून आले. हा असनी चक्रीवादळाचा प्रभाव असल्याचे तज्ञांनी सांगितले. भारतीय हवामान विभागानुसार, शहरात पुढील ३-४ दिवस अशीच हवामान स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
येत्या २४ तासांत मुंबईकर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील ४८ तासांसाठी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
असनी चक्रीवादळाचे अवशेष अजूनही उपग्रह निरीक्षणात दिसत आहेत, असे हवामान विभागाने सांगितले. या निरीक्षणानुसार मच्छिलिपटणम आणि आजूबाजूच्या परिसरात ढगांचा दाट भाग दिसून येत असलायचे समजते. तसेच पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा ढगाळ वातावरण आहे. यामध्ये केरळ, कर्नाटक, गोवा कोकण यासह मुंबई ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. येत्या आठवड्यात अंदमान समुद्रात पावसाची शक्यता आहे. तर, दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात येत्या दोन आठवड्यात पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.