नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): रवींद्रनाथ टागोर यांच्या 161व्या जयंतीनिमित्त ‘पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका शासकीय कार्यक्रमात साहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, आता अकादमीच्या निर्णयाविरोधात अनेक बंगाली साहित्यिकांनी आवाज उठवला आहे. ज्येष्ठ बंगाली लेखिका रत्ना रशीद बॅनर्जी यांनी त्याविरोधात ‘बांगला अकादमी’कडे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
’पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या ‘कविता बितान’ या काव्यसंग्रहाविषयी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, अकादमीच्या या निर्णयाचा विरोध आता बंगाली साहित्यिकांनी सुरू केला आहे. ज्येष्ठ बंगाली लेखिका आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक व संशोधक रत्ना रशिद बॅनर्जी यांनी त्यांना अकादमीतर्फे 2019 साली प्रदान करण्यात आलेला ‘अन्नद शंकर स्मारक सन्मान’ अकादमीस परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकादमीचे अध्यक्ष आणि प. बंगालची शिक्षणमंत्री ब्रात्य बासू यांना लिहिलेल्या पत्रात बॅनर्जी म्हणतात, “कवी गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मुख्यमंत्र्यांना नवीन साहित्य पुरस्कार देण्याचा अकादमीचा निर्णय पाहता हा पुरस्कार त्यांच्यासाठी ‘काटेरी मुकुट’ ठरला आहे. मुख्यमंत्र्यांना साहित्य पुरस्कार देण्याच्या निर्णयाने लेखक म्हणून मला अपमानास्पद वाटते. हे एक वाईट उदाहरण ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांचे साहित्याच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे, हे अकादमीचे वक्तव्य म्हणजे सत्याची खिल्ली उडविणारे असून त्यामुळेच आपण पुरस्कार परत करत आहोत,” असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे साहित्य अकादमीच्या (पूर्व क्षेत्र) जनरल कौन्सिलच्या सदस्य आनंदीरंजन बिस्वास यांनीदेखील बंगाली सल्लागार मंडळाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पुरस्कारल दिल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांनी 9 मे रोजी बंगाली साहित्यक्षेत्राचा मोठा अपमान झाल्याचे आणि साहित्यक्षेत्रात घराणेशाही, लहरीपणा वाढत असल्याचे सांगून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.