नवी दिल्ली(प्रतिनिधी): विविध राज्यांतील आणि विविध पक्षांच्या नऊ खासदारांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ ऊर्जा आणि पर्यावरण या विषयावरील ज्ञान विनिमय कार्यक्रमासाठी शिकागो विद्यापीठातील अभ्यासक, विद्यार्थी आणि नेत्यांना भेट देत आहे.
शिकागो विद्यापीठातील 'एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट' (ई.पी.आय.सी) आठ ते बारा मे दरम्यान भारताच्या राजकीय नेतृत्वाची धोरणे पुढे नेण्याच्या क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. काही खासदार 7 मे रोजी तर काही 8 मे रोजी पोहोचले. त्यांचे औपचारिक कार्य सोमवारी शिकागो वेळेत सुरू झाले असे ई.पी.आय.सीच्या अधिकाऱ्याने सोमवारी दि. ९ रोजी सांगितले. भारतीय खासदार शिकागो विद्यापीठातील विद्याशाखा आणि हवामान धोरण, कार्बन मार्केट, वायू प्रदूषण आणि पाण्याची गुणवत्ता यासह विस्तृत धोरण क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधतील. शिकागो विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणांशीही ते संवाद साधतील.
खासदारांच्या कार्यक्रमाची ही तिसरी आवृत्ती आहे. या मध्ये राज्यसभा सदस्य अमर पटनायक (बिजू जनता दल), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना) आणि सी.एम. रमेश (भारतीय जनता पार्टी), आणि लोकसभा सदस्य ब्रिजेंद्र सिंग, शिवकुमार उदासी, राहुल कासवान, हीना गावित (सर्व भारतीय जनता पक्ष), कोटागिरी श्रीधर (वायएसआर काँग्रेस पार्टी), आणि रितेश पांडे (बहुजन समाज पक्ष) यांचा समावेश आहे.
"जेव्हा धोरणकर्ते प्रयोग करण्यास तयार असतात तेव्हा नाविन्यपूर्ण धोरणे कार्य करतात. भारताच्या विकासाची कहाणी आणि पर्यावरणविषयक चिंतेचा समतोल साधण्यासाठी भारतीय कायदेकर्ते अग्रेसर आहेत. हे गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार आणि इतर भारतीय राज्यांमधल्या कामांवरून दिसते. त्यामुळे, भारतीय खासदारांसोबत सर्वोत्तम पद्धती जाणून घेण्यास आणि सामायिक करण्यास आणि भारतभरातील नागरिकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यात सामील होण्यास आम्ही रोमांचित आहोत." असे ई.पी.आय.सीचे संचालक मायकेल ग्रीनस्टोन म्हणाले.