संयुक्त महाराष्ट्राची तळपती लेखणी!

    01-May-2022
Total Views |
 

१ मे  
 
 
गोविंदाग्रज म्हणतात तशा ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’चा साहित्यिक, कलाकार, शाहिरांनी आपल्या ज्वलंत लेखणी-वाणीने बचाव केला. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, अण्णाभाऊ साठे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असे अनेक क्रांतिकारी साहित्यिकांचे योगदान मोलाचे होते. आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांचे शब्दस्मरण...
 
 
 
साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे जे घडते, ते ते त्या साहित्यिक त्याच्या लेखणीतून व्यक्त करत जातो. त्याच्या संवेदनशील मनाला ज्या गोष्टी भावतात, ज्या दुखावतात, ज्या भडकावतात त्या तो मांडत जातो. समाजात जर दंगली पेटल्या असतील, लोकांनी जर हातात शस्त्रे घेतली असतील, तर तो साहित्यिक लेखणीला आपले शस्त्र करतो आणि शब्दांनी वार करतो. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ राजकीय घडामोडींनी भारलेला असा काळ होता. अनेक साहित्यिक हे क्रांतिकारक, तर अनेक क्रांतिकारक हे साहित्यिक झाले होते. कारण, मुळी तो काळच तसा होता. प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करणारी आणि प्रत्येकाला स्वप्न पाहायची हिंमत देणारी ‘स्वप्ननगरी’, ही नगरी कधी झोपत असेल का, असा प्रश्न पडावा एवढे अखंड, अविरत काम करणारी नगरी, हिच्या कुशीत शिरलो तर ती कधीच कुणाला उपाशी झोपू देणार नाही, अशी ही महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची शान असेलेली आर्थिक राजधानी असलेली ‘मुंबई.’ आज आपल्यासमोर तिचे जे चित्र आहे, त्याच्या अगदी विरुद्ध चित्र मुंबईचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण, बरेच प्रश्न दत्त म्हणून समोर उभे होते; त्यातलाच महत्त्वाचा प्रश्न होता भाषावार प्रांतरचनेचा.
 
 
काही ठिकाणी ‘वंदे मातरम्!’ ‘भारतमाता की जय!’ हे जयघोष ऐकू येत होते, तर दुसरीकडे ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ हे नारे ऐकू येत होते. आपल्या राज्यकारभारासाठी ब्रिटिशांनी भारताला विविध प्रांतांत विभागले. पण, ही विभागणी भाषावार केली नाही. त्यामुळे ही विभागणी भाषावार व्हावी, अशी मागणी करताच राष्ट्रीय एकात्मतेचा धोका या राजकारण्यांना वाटला आणि न्या. एस. के. दार यांनी ‘भाषावार प्रांतरचना ही देशाच्या एकात्मतेचा घात करणारी आहे’ असे आपल्या अहवालात लिहून भाषावार प्रांताच्या मूळ संकल्पनेलाच छेद दिला आणि अमराठी तसेच मुंबईतील अमहाराष्ट्रीय भांडवलदार वर्गाने मुंबई महाराष्ट्रास देण्यास कडाडून विरोध केला. परंतु, मुंबई येथे १९३८ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, अध्यक्षपदी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोरदार सावरकरांनी पहिल्यांदा मराठी राज्यासाठी ठराव मांडला. पण, खर्‍या अर्थाने ही मागणी उचलून धरली ती १९४६ साली झालेल्या साहित्य संमेलनात गं. त्र्य. माडखोलकर यांनी. परंतु, हेच माडखोलकर या लढ्यापासून शंभर मैल दूर होते, असे आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले.
 
 
 
फक्त क्रांतिकारक, समाजसुधारकांनीच नाही, तर साहित्यिक आणि सामान्य जनतेनेदेखील या लढ्यात सक्रीय सहभाग घेतला आणि पहिल्यांदा समाजवादी, कम्युनिस्ट, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार संघटना असे सर्वच विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढू लागले. अनेकांनी शस्त्रे उचलली, तर लेखकांनी आपल्या लेखणीलाच शस्त्र केले आणि सुरु झाला तो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा. प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या मुखपत्रात प्रथमतः ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ ही घोषणा लिहिली आणि उघड्या डोळ्यांनी बघणार्‍या हजारो डोळ्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा या घोषणेला विरोध नव्हता, तरीदेखील एका ठिकाणी आपल्या भाषणात ते म्हणाले, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ठीक आहे, झाला‘च’ पाहिजे कशासाठी?” यावर अत्रेंनी देखील आपल्या भाषेत त्यांना उत्तर दिले, “तुमच्या नावातून जर ‘च’ काढला तर फक्त वहाणच उरेल.” ‘तुमची भाषणं ऐकून गुंड हिंसाचाराला प्रवृत्त होतात’ असा आरोप त्यांच्यावर जेव्हा करण्यात आला तेव्हादेखील त्यांनी असेच सडेतोड उत्तर देत म्हटले, ‘शक्यच नाही, माझा विनोद समजण्या एवढी त्या गुंडांची पातळी उंच असेल असे मला वाटत नाही,’ अशा आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखणी-वाणीने, ‘झेंडूची फुले’सारख्या आपल्या विडंबनात्मक पुस्तकातून ‘आरती हरिभाऊ नका राजीनामा देऊ’ असे ‘आरती ज्ञानराजा’ या आरतीवरून विडंबनात्मक काव्य लिहिले. त्याचबरोबर आपल्या ‘मराठा’ या मुखपत्रातून आणि आपल्या भाषणांतून ते आपले ज्वलंत विचार मांडतच होते. एवढेच नाही, तर ‘कर्‍हेचे पाणी’ या पुस्तकातून ‘संयुक्त महाराष्ट्राची घोषणा’ या प्रकरणातून अत्रेंनी या विषयावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यात आचार्य अत्रे म्हणतात, “महाराष्ट्रापुढे आज जो प्रश्न आहे, तो मराठी भाषेच्या लालनाचा आणि मंडनाचा नव्हे, तर रक्षणाचा आणि भवितव्याचा आहे. महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी झटण्याची ईर्ष्या महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये उत्पन्न करण्यासाठी, मराठी साहित्याच्या अग्रसानावरून मी ही हाक फोडतो आहे. ही हाक नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत सर्व महाराष्ट्रांत दुमदुमेल! सह्याद्रीच्या आणि सातपुड्याच्या सार्‍या दर्‍याखोर्‍यात तिचे प्रतिध्वनि उफाळून उठतील! ही महाराष्ट्र एकीकरणासाठी झटण्याची हाक मराठी लेखक आणि पत्रकार यांच्यावतीने मी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या, जातींच्या आणि धर्मांच्या कार्यकर्त्यांना देत आहे,या हाकेनुसार महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्याच्या एकीकरणासाठी झटावयाला जर खरोखरच उद्युक्त झाले, तरच आपण मला दिलेल्या या बहुमानाचे सार्थक झाले असे मी समजेन!”
 
 
 
श्रीपाद अमृत डांगे हे देखील या चळवळीतील महत्त्वाचे नाव. भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे अध्वर्यू समजल्या जाणार्‍या श्रीपाद डांगे यांना त्या पक्षाचे भीष्माचार्य समजले जात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉम्रेड डांगे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ आपल्या भाषणात देताना म्हणत, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्याची भाषा फारसी की मराठी असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा महाराष्ट्राची भाषा मराठी, कर्ता- मी मराठी, कर्म - माझे, क्रिया - माझी बाकी तुमचे! असे म्हणत महाराजांनी मराठीला राज्यभाषा केले. त्यामुळे आजही भाषेचा वाद हा मातृभाषा ठेवूनच सुटेल. कारण, हा लढा तांत्रिक नसून जीवनाचा लढा आहे! त्यामुळे शिवाजी महाराजांप्रमाणे जनतेची भाषा घेणे हेच स्वहिताचे कार्य आहे.” कामगार वर्ग एकजुटीने, मोठ्या संयमाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी होण्यामागील प्रेरणास्थान हे स्वतः कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हेच होते. धर्म, राजकारण,समाजकारण, अर्थकारण हे त्यांच्या लेखनाचे केंद्रबिंदू होते. यांच्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे, एस. एम. जोशी. एस. एम. जोशी या चळवळीशी एवढे एकरूप झाले होते, की स्वतः आचार्य विनोबा भावे म्हणाले होते, “आमच्या दृष्टीने एस.एम. म्हणजे संयुक्त महाराष्ट्रच!” असे हे श्रीधर महादेव जोशी. इतर भाषिकांना जर त्यांचे स्वतंत्र राज्य मिळत असेल, तर मराठीला का नाही? हा भाषेपेक्षा महाराष्ट्रावर अधिक अन्याय आहे; आणि हा अन्याय सहन न झाल्याने एस. एम या लढ्यात सहभागी झाले आणि हा फक्त भाषिक वाद नसून सामजिक परिवर्तनाचा देखील भाग आहे.
 
 
 
 
प्रबोधनकार ठाकरे. इतर लेखकांची लेखणी, शब्द हे समाजजागृतीचे, व्यक्त व्हायचे शस्त्र होते, मग प्रबोधनकार ठाकरे याला अपवाद कसे असतील? ‘मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि जगेन देखील महाराष्ट्रासाठीच,’ असे म्हणून प्रबोधनकारांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी जनांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी वेचले. उत्तम लेखक, वक्ते, संपादक, नेते असलेल्या प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीतून लोकप्रबोधन केले. महाराष्ट्र धर्माचा विचार मांडण्यासाठी त्यांनी आपली लेखणी शस्त्रासारखी वापरली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फक्त लेखन, वाणीतूनच नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी आपले महाराष्ट्रावरील प्रेम जनतेला दाखवून दिले. जनजागृतीसाठी लेखकाबरोबरच पत्रकाराची भूमिका बजावणार्‍या प्रबोधनकारांनी ‘सारथी’, ‘लोकहितवादी’ आणि ‘प्रबोधन’ या नियतकालिकांमधून आपल्या विचारांचा प्रचार केला, तर त्यांच्याच सुपुत्रांनी म्हणजेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मावळा’ या नावाने व्यंगचित्र काढून सरकारची व्यंग लोकांसमोर आणत होते. परिणामी, लोकांना किमान या उपरोधातून तरी आपल्यावर होणारा अन्याय आणि सत्ताधारी करणारे शोषण कळून आले. शाहीर अमर शेख यांनी डफावर दिलेली थाप थेट दिल्लीच्या तख्तावर ऐकू आली. समाजवादी नेते, पत्रकार, कामगार, सामान्यजनता त्यांच्यातही स्त्रिया, अबालवृद्ध सहभागी होते. साहित्यिकांबरोबर जनतेला पाठबळ दिले होते ते शाहिरांनी! महाराष्ट्राचा अभिमान असलेले हे शाहीर प्रखर राष्ट्रभक्त होता. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला साकारायचा असेल, तर आपल्याला एकता आणि समतेवर आधारित समाज उभा करायला हवा, याची जाणीव त्यांच्या पोवाड्यांतून ठायीठायी जाणवते. या अभूतपूर्व आंदोलनात आणखी सिंहाचा वाटा होता तो म्हणजे सेनापती बापट यांचा. एवढेच नाही, तर बेळगावच्या सीमाप्रश्नाच्या आंदोलनातही ते सहभागी होते. क्रांतिकारक असलेले सेनापती बापट महाराष्ट्राच्या लढ्यात देखील सरसेनापती झाले. त्यांचे महाराष्ट्रावर असलेले प्रेम व्यक्त करताना ते म्हणतात,
 
 
 
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले।
खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या भारताचा।
 
 
 
शाहीर अमर शेख यांच्याबरोबरच अण्णाभाऊ साठें यांचे कला आणि साहित्य या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपले योगदान महत्त्वाचे होते. ते कम्युनिस्ट पक्षाचे ‘कार्ड होल्डर’ असल्यामुळे पक्षाने ठरवून दिलेली कामं तर ते करायचेच, पण ते एक लेखक आणि कलाकार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या असे लिहून तसेच त्या सादर करून त्यांनी महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल आपल्यासह जनतेच्या मनात देखील पेटती ठेवली.
 
 
१९४६  साली जेव्हा शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली, तेव्हा त्यात महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या पुढार्‍यांसह आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे हे नेते होतेच. पण, कलाकारदेखील या लढ्यात सामील झाले होते. या पुढार्‍यांच्या भाषणाआधी शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे पोवाडे, गीत सादर करून जनमानसांत स्फुल्लिंग चेतवत असत. त्यामुळे या लढ्याला आणखी धार चढे. या काळात ‘माझी मुंबई’, ‘लोकमंत्र्याचा दौरा’, ‘शेटजींचे इलेक्शन’, ‘अकलेची गोष्ट’ या कलाकृती त्यांनी सादर करून लोकांची मनं जिंकली. तेव्हाच अण्णाभाऊ साठे यांचे ‘माझी मैना गावाकडे राहिली’ छक्कड विशेष गाजली. दि. १ मे, १९६०  रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. पण, या लोकचळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही. बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही. ही सल अण्णाभाऊंना सतत टोचत होती. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडूनदेखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच ’माझी मैना’ या छक्कडचा जन्म झाला. या लढ्यात बेळगाव, कारवार, निपाणी हे महाराष्ट्राशी जोडले गेले नाही म्हणून या तिघांसाठी ‘माझी मैना गावाकडं राहिली’ हे अण्णाभाऊंनी रूपक म्हणून वापरले. वरवर वाचताना- ऐकताना ही छक्कड प्रेमगीत वाटू शकते, पण हे प्रेम इथे राष्ट्रासाठीचे आहे.
 
 
 
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची, समाजसुधारकांची, बुद्धिमंतांची भूमी. कितीतरी वीर सुपुत्र या मातीने जगास दिले. कैक हजार वर्षांचा इतिहास या भूमीला आहे. जसा या मातृभूमीचा इतिहास आहे, तसाच तिच्या मातृभाषा मराठीचा ही इतिहास आहे. महाराठीपासून ते मराठीपर्यंतच तिचा प्रवास आहे आणि तिच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राचे सर्वस्व असलेल्या मुंबईसाठीकितीतरी वर्ष क्रांतिकारकांपासून ते साहित्यिक, कलकार्म सामान्य जनतेपर्यंत सर्वांना संघर्ष करावा लागला. 105 जण शहीद झाले, तर शेकडो जखमी झाले. का, कारण, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ हे एकच स्वप्न, हा एकच ध्यास सर्वांनी घेतला होता. समाजकारण, राजकारण, साहित्य, कला, विज्ञान, संस्कृती, क्रीडा या सर्वांतून मराठी माणसाने फक्त महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे नाव जगाच्या पाठीवर नेऊन ठेवले.
 
 
- वेदश्री दवणे