मुंबई (अक्षय मांडवकर) - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधून दुर्मीळ ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox) नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील माळरानावरुन नुकतीच ही नोंद करण्यात आली. अशाप्रकारे ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox ) ही भारतातील पहिलीच नोंद आहे.
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. याला इंग्रजीत इंडियन फॉक्स या नावाने ओळखतात. खोकड हा राखाडी तांबूस रंगाचा प्राणी आहे. मात्र, नुकतीच सोलापूर तालुक्यामधून पांढऱ्या रंगाच्या खोकडाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरच्या 'वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन'चे सदस्य शिवानंद ब. हिरेमठ हे अक्कलकोटच्या माळरानावर निरीक्षण करत होते. यावेळी त्यांना पांढऱ्या रंगाचे खोकड दिसले. लागलीच त्यांनी या खोकडाचे छायाचित्र काढून त्याची नोंद केली. या प्रकारच्या जनुकीय बदलाच्या अवस्थेला ल्युसिस्टिक असे म्हटले जाते. या अवस्थेत काही अंशी रंगद्रव्ये शरीरावर उपस्थित असतात.
हिरेमठ यांनी नोंद केलेला ल्युसिस्टिक असलेला हा खोकड संपूर्णतः पांढरा आहे. केवळ त्यांच्या शेपटीच्या टोकास काळा रंग आहे. यापूर्वी ल्युसिस्टिक रानमांजर आणि कोल्ह्याची नोंद झाली होती. मात्र, पांढऱ्या खोकडची ही भारतातील पहिलीच नोंद आहे. खोकड हा प्रामुख्याने माळरानात, शेतात आणि खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात आढळतो. आकाराने खोकड हा कोल्ह्यापेक्षा लहान असून लांबी ५० ते ६० सेमी इतकी असते. शरीराचा रंग राखाडी तांबूस असतो. दिसायला सडपातळ आणि लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येतो. खोकड हे जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडावर बिळ करून राहतात. सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोर आणि पक्षी हे त्यांचे मुख्य खाद्य होय. तसेच उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवत असल्यामुळे खोकड हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.