स्वातंत्रपूर्व काळात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले. मवाळ गटाच्या मागण्या आणि आंदोलनाचे प्रकार फारच सौम्य होते. ब्रिटिशांनी घाबरून देश सोडून जावं इतकी ताकद त्यात होती का? हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. पण, जहाल गटाच्या कारवाया, त्यांची वाढती ताकद, विशेषतः ‘आझाद हिंद फौजे’चा विस्तार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जपान-इटली-जर्मनी या नाझी गटात भागीदारी, अंदमान-निकोबार इथे स्थापन झालेले निर्वासित भारत सरकार, इंफाळ-कोहिमा युद्ध या आणि अशा अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून ब्रिटिश सरकार भारतातील आपल्या सत्तेचा पुनर्विचार करू लागले, असे म्हणायला बराच वाव आहे.
ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे काँग्रेसमधून नेताजी सुभाषबाबूंना बाहेर पडायला भाग पाडले. अहिंसेच्या मार्गाने जाण्याच्या निर्णयामुळे महात्मा गांधी ब्रिटिशांना सोयीस्कर असे स्वातंत्र्ययुद्ध लढू लागले. स्वाभाविकच नेताजींच्या स्वातंत्र्याच्या उर्मीने त्यांना दुसरा रस्ता पकडायचा मार्ग दाखवला. १९३९च्या आसपास युरोपमधील नाझी मोहिमेमुळे फ्रान्स आणि डच यांच्यावरील दबाव प्रचंड वाढला होता. दक्षिणपूर्व आशियात सत्तापोकळी निर्माण झाली होती. त्यात पर्ल हार्बरवर जपानी हल्ला झाला आणि त्यानंतर संपूर्ण दक्षिण पूर्व आशियावर कब्जा करण्यासाठी आणि भारताच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वोत्तमसंधी आली होती. फेब्रुवारी १९४२ मध्ये सिंगापूर जपान्यांच्या ताब्यात गेले. नेताजींच्या फौजेची ताकद ही वेगात वाढत होती. सिंगापूर म्यानमार मार्गे ब्रिटिश सत्तेवर लष्करी हल्ला करायचा ठरल्यावर ईशान्य भारतीय राज्ये विशेषतः मणिपूर, नागालॅण्ड या भूभागाला धोरणात्मकदृष्ट्या फार महत्त्व आले. ‘आझाद हिंद फौजे’चे भारतात स्वागत होईल, भारतीय जनता ब्रिटिशांच्या विरोधात नेताजींच्या बाजूने उभी राहील, याचा अंदाज नेताजींना होता.
त्यामुळे इंफाळच्या युद्धाची पूर्वतयारी सुरू झाली. जपानी लेफ्टनंट जनरल मुटागुची हे या मोहिमेचे आणि सैन्याचे संचालन करीत होते. डिसेंबर १९४३च्या दरम्यान नेताजींचे २५० लोक आराकान आणि इंफाळ परिसरात गुप्त पद्धतीने वावरू लागले होते. ठरल्याप्रमाणे मार्च १९४४ मध्ये मणिपूरमधील उखरूलमार्गे कोहीमाकडे जाणारी ३१वी जपानी तुकडी ब्रिटिश तुकडीने अडवली. सांगशात येथे तुंबळ युद्ध झाले. अक्खी ब्रिटिश तुकडी आडवी झाली. १६० जपानी शिपाई आणि अधिकारी मारले गेले. मणिपुरी भूमीवरील हे पहिले ब्रिटिश-जपानी युद्ध.
एकदा इंफाळ घेतला की आसाम-बंगालमधील धनधान्य/रेशन युद्धफौजांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी नेताजींची अटकळ होती. जपानी सेनाधिकारी जनरल सातो यांनी दिमापुरात मुसंडी मारली असती, तर हे शक्य झालेच असते. तसेच, नागालॅण्डचे ए. झेड. फिझो आणि आसामचे नेते गोपीनाथ बार्डोलाई हेही योग्य वेळी या युद्धात नेताजींच्या फौजेला सामील होणार होते, असे लोक सांगतात. इकडे ३३व्या जपानी तुकडीने इंफाळला दक्षिण पूर्वेकडूनघेरलेच. वेगाने आक्रमण करत येणार्या या भारतीय-जपानी सैन्याला थोपवणे ब्रिटिशांना शक्य झाले नाही. शेवटी दि. १४ एप्रिल, १९४४ या पवित्र दिवशी मोइरांग या गावात ‘आझाद हिंद फौजे’चा ध्वज चढवला गेला. ‘आझाद हिंद फौजे’चे मुख्य कार्यालयही येथेच स्थापन झाले. भारतीय मणिपुरी समाज मोठ्या प्रमाणावर त्यांना विविध प्रकारची मदत करू लागला.
परंतु, इंफाळचे हे केंद्र केवळ तीन महिने लढवता आले. पावसाळा सुरू झाला. त्यात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला. इंडो-जपानी फौजांना डायरियासारखे रोग होऊ लागले. युद्ध करणे मुश्किल होऊन बसले. या उलट ब्रिटिश सरकार बंगाली जनतेच्या तोंडचा घास हिसकावून जहाजेच्या जहाजे भरून युरोपातील आपल्या सैन्याला धान्य पाठवीत होते. इथेही ब्रिटिश सैन्याला अन्नाची कमतरता कधीच जाणवली नाही.
हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब फेकले गेले. त्यामुळे तर सगळ्या युद्धाचा, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा रंगच पालटून गेला. हळूहळू जपानी सैन्याची माघार होऊ लागली. दि. २१ ऑगस्ट, १९४४ रोजी नेताजींनी युद्धविराम घोषित केला. १७ हजार फौजेचे सैनिक युद्धकैदी म्हणून रंगून मध्ये पकडले गेले.
इंफाळचे युद्ध हे दुसर्या महायुद्धातील सर्वात भीषण युद्ध होते, असे अनेक इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. या युद्धात तीन लाख जपानी शिपाई मृत्यू पावले. १५००-तीन हजार आझाद हिंद सेनेचे सैनिक, तर सात हजार ब्रिटिश सेनेचे शिपाई व अधिकारी मारले गेले.
भौगोलिक स्थान आणि नैसर्गिकपणे आलेल्या देशभक्तीच्या उर्मी यामुळे मणिपुरी समाजाचा मोठा सहभाग या युद्धात होता. या भूमीतील हजारो पुरुष, महिला, लहान मुले, जनावरे या युद्धात मारली गेली. अनेक प्रसिद्धीच्या झोतात न आलेले, पण दैदिप्यमान कार्य केलेले देशभक्त या मातीतून निर्माण झाले. थोड्या काळापुरता का होईना, पण संपूर्ण भारतात सर्वप्रथम स्वातंत्र्याचा आस्वाद इथल्याच समाजाने घेतला. त्याचे दु:खद परिणामही त्यांनाच भोगावे लागले.
आज नागालॅण्डमधील कोहिमा आणि मणिपूरच्या मिळून ब्रिटिश तुकडीतून लढलेल्या ब्रिटिश आणि कॉमनवेल्थ सैनिकांच्या तीन सेमेटरीज म्हणजे स्मशानभूमी किंवा स्मारके आहेत. ही सगळी एकाच प्रकारची ब्रिटिश साम्राज्याचे गुणगौरव करणारी स्मारके आहेत. परंतु, भारत स्वतंत्र झाल्यावर ७५ वर्षे होऊन गेली तरी आजही सरकारद्वारे निर्माण केली गेलेली अशी ‘आझाद हिंद फौज’ किंवा जपानी लष्करातील ‘सैनिकांची स्मारके’ कुठेही नाहीत. या भूमीसाठी प्राण दिलेल्या सामान्य जनतेच्या नावाने एकही स्मरणशिल्प नाही.
पण, ही कमतरता भरून काढायचा प्रयत्न काही मणिपुरी जाणते लोक, इतिहासतज्ज्ञ, संस्था एकत्र येऊन करत आहेत. ‘आझाद हिंद फौज’ आणि जपानी आर्मीतील हुतात्म्यांसाठी एक स्मारक उभे राहते आहे. तसेच, आता मोइरांग येथे पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझाद हिंद फौजे’चे हेडक्वार्टर जिथे होते, तिथेच आता मोठे स्मारक बनत आहे. सच्च्या भारतप्रेमींसाठी या सुखदच म्हणाव्या लागतील.
अमिता आपटे
९९८७८८३८७३