आपल्या नावाप्रमाणेच साहित्यप्रसाराची दिंडी घेऊन निघालेल्या साहित्य‘विद्या’ अर्थात विद्या मुरलीधर नाले यांच्याविषयी...
विद्या नाले यांचा जन्म खान्देशातील वरणगाव (भुसावळ तालुका) येथे त्यांच्या आजोळी दि. ६ ऑक्टोबर, १९५० रोजी झाला. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव विद्या माधवराव पाटील. वडील मामलेदार कार्यालयात काम करीत, तर आई राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होती. त्यामुळे लहानपणी ऐश्वर्यात वाढलेल्या विद्या यांंनी सामान्य परिस्थितीतील व्यक्तीशी संसार करताना शालीनता कधीच सोडली नाही. त्या अनुषंगाने आपल्या आईचाच वारसा विद्या यांनीही जपला. मंत्रालयात साहाय्यक पदावर काम करणार्या, परंतु स्वकर्तृत्वावर ‘एसएससी’नंतर नोकरी करून ‘एम.ए’ची पदवी मिळविलेल्या व्यक्तीशी विवाहाला संमती दर्शवल्यानंतर दि. ८ मे, १९६८ रोजी त्यांचा विवाह होऊन त्या विद्या मुरलीधर नाले झाल्या.
जळगावमध्ये ‘एसएससी’ झाल्यानंतर त्यांनी जळगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु, पदवी प्राप्त व्हायच्या आधीच त्यांचा विवाह झाल्याने त्या एकत्र कुटुंबात संसारात रमल्या. लग्न झाल्यावर सुरुवातीला डोंबिवलीला राहात होत्या. त्यांचे यजमान मंत्रालयात अधिकारी पदावर असल्याने त्यांच्याच प्रेरणेने त्यांनी १९७९ मध्ये ‘अनघा प्रकाशन’ या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला ‘दिवाळी अंक’ काढले. त्यासाठी त्यांना यजमानांच्या संपर्कातील मोठ्या साहित्यिकांचे साहित्य मिळण्यास मदत झाली. त्यातून वेगवेगळे विषय घेऊन दिवाळी अंक सजू लागले. नामवंत लेखक, पत्रकार, सिनेपत्रकार, नवोदित लेखक, कवी, गझलकार, शास्त्रीय लेखन करणारे अशा सर्वसमावेशक साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध होत गेले व प्रकाशनांचा आवाका वाढू लागला.
डोंबिवलीला सुरुवात केलेला दिवाळी अंक दुसर्या वर्षी स्वतःच्या मालकीच्या घरात ठाण्याला दि. १ मे, १९८० मध्ये प्रकाशित केला. वाचनाच्या जोडीला विद्या यांना गाण्याची आवड आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत त्या गेली ४० वर्षे आहेत. प्रकाशनाच्या व्यवसायात त्या उतरल्या असल्या तरी मान्यवर लेखक मधु मंगेश कर्णिक, सुरेश भट, डॉ. महेश केळुसकर, भीमराव पांचाळे, यशवंत देव आदी बर्याच छोट्या/मोठ्या साहित्यिकांशी त्यांचे घरोब्याचे नातेसंबंध. स्वतःच्या घरी त्यांचे सत्कार, सन्मान, जेवणावळी करण्यात त्यांना आनंद वाटे. यामुळे जीवन सफल झाल्याचा आनंद लाभल्याचे त्या नमूद करतात. या थोरामोठ्यांच्या सहवासाने साहित्याची गोडी निर्माण होऊन त्यात सतत भरच पडत गेली.वेगवेगळ्या क्षेत्रातील लेखकांकडून मराठी साहित्यातील सर्व वाङ्मय प्रकारची पुस्तके प्रकाशित करण्याची संधी त्यांना लाभली. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील लेखकांचे साहित्य उपलब्ध होत गेले. त्यामुळे गेल्या ४३ वर्षांत त्यांचे ‘अनघा प्रकाशन’ व ‘अनघा दिवाळी अंक’ साहित्य क्षेत्रात नावाजले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, व मध्य प्रदेशपर्यंत त्यांचा वाचकवर्ग पसरलेला असल्याने या चळवळीचे यश लक्षात घेत त्यांनी ‘उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य सभा’स्थापन केली व त्या माध्यमातून जळगावला दोन व नाशिकला एक अशी तीन साहित्य संमेलने घडवून आणली. अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक व भारत सासणे आदींनी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
डॉ. विजय पांढरीपांडे यांची बरीच पुस्तके त्यांनी आपल्या प्रकाशन संस्थेतून प्रकाशित केली. या माध्यमातून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यातील उपेक्षितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन तसेच मराठी रसिकांसाठी सुरू केलेल्या या प्रवासाच्या प्रयत्नांना बर्यापैकी यश लाभले आहे. त्यामुळे विविध साहित्यिक संस्थांकडून विविध साहित्यकृतींना विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारदेखील विद्या यांच्या प्रकाशन संस्थेला प्राप्त झाल्याचे त्या सांगतात.वेगवेगळ्या विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करण्याचा ध्यास मनी बाळगलेल्या विद्या यांनी दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करण्याचे स्वप्न मनी बाळगले आहे. ’सुलोचना’ या पुस्तकासह, यशवंत देवांच्या ’कधी बहर कधी शिशिर’ या आत्मकथनाच्याही तीन आवृत्त्या आणि बर्याच पुस्तकांच्या दोन आवृत्त्याही प्रकाशित केल्या आहेत. तसेच, त्यांच्या ’श्री स्वामी समर्थ उपासना’, ’श्री दत्त उपासना’, ’श्री देवी उपासना’ या दिवाळी अंकांना, तर दोन-तीन वेळा पुनमुद्रित करण्याचा योग आला. रौप्य महोत्सवाच्या वर्षी तर ३३ पुस्तके प्रकाशित केली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी मंत्रालयात पार पडलेल्या कार्यक्रमात ‘संपादिका, प्रकाशिका म्हणून एक स्त्री एवढे चांगले काम करू शकते, हा जागतिक विक्रम होय,’ असे कौतुकोद्गार काढल्याचे त्या सांगतात.
या क्षेत्रात प्रवेश करणार्या नवीन पिढीला उपदेश करताना, ”फुटकळ प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून काम करा... प्रसिद्धी तुमचा पाठलाग करेल” असे सांगतात. समाजाला उत्तम साहित्य देणे ही एक प्रकारची समाजसेवाच आहे, असे मानणार्या विद्या यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!