क्रिकेट हा खेळ जगभरातील आणखी काही देशांमध्ये खेळला जावा, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सातत्याने प्रयत्नशील आहे. क्रिकेट खेळण्यामध्ये रूची ठेवणार्या देशांमध्ये विविध प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत ‘आयसीसी’ क्रिकेटच्या प्रसारासाठी अनेक वर्षांपासून विविध प्रयोग करत आहे. परंतु, ‘आयसीसी’च्या या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे अद्याप यश आलेले नाही. कटू असले, तरी हे वास्तव आहे. मात्र, ‘आयसीसी’ने अद्याप हार मानलेली नाही. हीदेखील एक चांगली बाब असून, ‘आयसीसी’ क्रिकेटच्या प्रसारासाठी अद्यापही विविधांगी प्रयोग करत प्रयत्नशील आहे. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ अॅलार्डाईस यांनी ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशाबाबत नुकतेच एक विधान केले. २०२८ साली होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेतक्रिकेट या खेळाचाही समावेश करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ‘आयसीसी’ला महसूलवाढीसाठी प्रयत्न करणे सोपे जाणार असून, क्रिकेटचा जगभरात प्रसार होण्यासाठीदेखील मदत होणार असल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यांच्या या विधानानंतर क्रीडाविश्वात चर्चेला उधाण आले. याबाबत अनेक दिग्गजांनी मतमतांतरे व्यक्त केली. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे, ही काही वाईट गोष्ट नाही. परंतु, ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश करण्याआधी ‘आयसीसी’ने क्रिकेट खेळणार्या विद्यमान देशांच्या बोर्डांबाबत चर्चा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कारण, याआधीही अनेकदा असे प्रयत्न करण्यात आले असून, अनेक देशांनी या प्रस्तावास विरोध केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटचा काही ऑलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकलेला नाही. म्हणून ‘आयसीसी’ने सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डाचे मत याबाबत आधी जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यानंतर या खेळाचे स्वरूप कसे असणार, याबाबतही स्पष्टता करण्याची गरज असल्याचे मत क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. या बाबीमध्ये स्पष्टता झाल्यास अनेक देशांच्या बोर्डांसोबत चर्चा करणे ‘आयसीसी’ला सोपे जाणार असून त्यानंतरच याबाबत काही ठोस निर्णय होणे, अपेक्षित असल्याचे मंथन क्रीडा जाणकारांकडून करण्यात आले आहे. तेव्हाच ऑलिम्पिक आणि त्यामध्ये क्रिकेटच्या समावेशाचा वर्षानुवर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटेल.
इतिहास जुनाच!
ऑलिम्पिक या जगप्रसिद्ध क्रीडास्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश अद्यापपर्यंत झालाच नाही, असे नाही. क्रिकेट या खेळाचा एकेकाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश असल्याचा इतिहास हा शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. १९०० साली ऑलिम्पिक स्पर्धेतक्रिकेटचा इतिहासातील पहिलावहिला सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतक्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात आल्याची नोंद आहे. हा सामना ग्रेट ब्रिटन संघाने जिंकला, तर फ्रान्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. केवळ दोनच देशांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळण्यास पसंती दर्शविली होती. त्यामुळे विजेत्या ग्रेट ब्रिटनला सुवर्ण तर, फ्रान्सला रौप्यपदक मिळाल्याची नोंद आहे. १९०० साली फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेला हा सामना ऑलिम्पिक स्पर्धेतील क्रिकेटचा पहिला आणि अखेरचा सामना ठरला. त्यानंतर शेकडो वर्षे उलटली तरी आजपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा काही समावेश होऊ शकलेला नाही. १९०० सालीच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेआधी १८९६ साली ग्रीसची राजधानी अथेन्स येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खरे तर क्रिकेटच्या खेळाचा समावेश करण्यात येणार होता. परंतु, सर्व देशांमध्ये एकमत न झाल्याने हा प्रस्ताव बारगळला. १९०० साली ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स हे दोन देश क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाल्याने ऑलिम्पिकमध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले. परंतु, त्यानंतर १९०४ साली होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर शेकडो वर्षे उलटली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत नुसते चर्चेचे गुर्हाळ सुरू राहते. परंतु, प्रत्यक्षात मात्र, याबाबत काहीच होताना दिसत नाही. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलार्डाईस यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या खेळाचा समावेश करण्याबाबत विधान केले आणि पुन्हा एकदा या विषयावर मंथन सुरू झाले. शेकडो वर्षांपूर्वीही अनेक देशांमध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबत मतमतांतरे होती. ती आजही आहेत आणि उद्यादेखील असतील. परंतु, याबाबत सर्व देशांसोबत चर्चेअंती तोडगा काढून ठोस निर्णय व्हावा, हीच अपेक्षा.
- रामचंद्र नाईक