१ टक्का वसूल करण्यासाठी मेट्रो घाईघाईने सुरु केली नाही ना !

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचा आरोप

    05-Apr-2022
Total Views | 120

metro
मुंबई : राज्य सरकारने १ एप्रिलपासून मुंबईतील सदनिकांवर १ टक्का ‘मेट्रो अधिभार ’ वसूल करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे १ टक्का वसूल करण्यासाठी मेट्रो सेवा घाईघाईने सुरु तर केली नाही ना, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे, असे आर.टी. आय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले. शनिवारी मुंबईत दोन मेट्रो मार्गिकांचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रकल्प अद्याप १०० टक्के पूर्ण नसून काही भाग सुरु करण्यात आला आहे. नव्या मेट्रोचे उदघाटन होताच गेल्या ३ दिवसांत मेट्रोचा खोळंबा झाला. सोमवारी तर यावर कडी झाली. दहिसरहून डहाणूकर वाडीकडे जाणारे कोचेस् पुढे गेल्यामुळे अनेक प्रवाश्यांना गाडीमध्ये जाता आले नाही. फलाट आणि दरवाजा उघडण्याची प्रक्रिया सुसंगत नव्हती. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. सुदैवाने दुर्घटना झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
 
अनिल अंबानी यांच्या ‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट कंपनी’ संचालित ‘मुंबई मेट्रो’ अशाप्रकारे बंद होत असे. तत्कालिन सरकारनेही त्यावेळी हात झटकले होते. त्यात सुधारणा करण्यासाठी अनेकजण पाठपुरावा करत होते. आज हीच परिस्थिती ‘महा मेट्रो’ संचालित मेट्रोमध्ये होत आहे. ‘महा मेट्रो’ खाजगी कंपनी असल्यामुळे एमएमआरडीए काही करु शकत नाही, असे मत गलगली यांनी मांडले. विद्यमान सरकारच मालक आणि चालक असल्यामुळे ही वस्तुस्थिती मुंबईकरांना कळणे आवश्यक आहे. घाईघाईने मेट्रोचे उदघाटन करण्यात आले असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही वस्तुस्थिती मांडण्यात आली नाही, असे सकृतदर्शनी दिसून येते. शनिवारी सुरु झालेली मेट्रो वारंवार का बंद होते, याची सखोल चौकशी सरकारकडून होण्यात यावी तसेच प्रवाशांना चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी गलगली यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121