आधुनिक जगात राष्ट्राच्या सक्षम अर्थकारणात दळणवळण यंत्रणेला फार महत्व आहे. राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादन यात पर्यटन क्षेत्राचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग यापेक्षा हवाई मार्गे होणारी प्रवासी वाहतूक आता राष्ट्रीय अर्थकारणाचा खर्या अर्थाने कणा बनू पाहत आहे. त्यामुळे हवाई वाहतूक ठप्प झाल्यास अनेकार्थाने जागतिक पातळीवर त्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. कोरोना काळात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी विमान वाहतुकीवर गदा आणली गेली होती. मात्र, आता दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू झाली आहेत. यामुळे प्रवाशांनाच दिलासा मिळाला नाही, तर विमान कंपन्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अन्यथा, लोकही दोन वर्षांपासून चिंतेत होते आणि व्यवसायाअभावी विमान कंपन्यांचे संकटही गडद होत होते. परंतु, आता लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि विमान वाहतूक क्षेत्र पुन्हा उंचीवर जाईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या दोन वर्षांत मर्यादित उड्डाणांमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, विमान कंपन्यांनीही तीन ते चार वेळा प्रवासाचे दर वाढवले होते. याशिवाय, लोकांना त्यांच्या गंतव्य देशात पोहोचण्यासाठी लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने आणि भरमसाठ भाडे मोजावे लागत असल्याने लाखो लोकांनी प्रवास बराच काळ पुढे ढकलला. लोकांना परदेशात राहणार्या त्यांच्या कुटुंबीयांकडे जाता येत नव्हते किंवा तिथून भारतात परतता येत नव्हते, पण कोरोनाच्या संकटातून सावरल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सहा भारतीय आणि साठ परदेशी विमान कंपन्यांनी चाळीसहून अधिक देशांना आपली सेवा सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचा एक भाग म्हणून विमान उड्डाणे रोखणे आवश्यक होते. बंदी लागू होण्यापूर्वी विमानतळांवर इतर देशांतून येणार्या प्रवाशांची तपासणी होत नव्हती आणि अनेक देशांतील संक्रमित लोक भारतात आले होते. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील ३७ देशांशी झालेल्या करारानुसार, आपत्कालीन परिस्थितीत लोकांना ये-जा करता यावी, यासाठी हवाई वाहतुकीत एअर बबल व्यवस्थेची निर्मित करण्यात आली होती. त्यामुळे इतर देशांत जाणे अवघड होते. पण आता नियमित उड्डाणे सुरू झाल्यानंतर एअर बबल सिस्टीमही संपुष्टात आली आहे, आता हवाई प्रवासावर कोणतेही बंधन नाही.
चीनबरोबरच अजूनही हाँगकाँग, कोरिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, स्पेन, इटली यासारख्या देशांत प्रवासाची मान्यता देण्यात आलेली नाही. कारण या देशात अजूनही कोरोना संसर्गाचा धोका आहे. पण मोठी गोष्ट म्हणजे आठ वर्षांनंतर पुन्हा मुंबई ते पोलंड आणि व्हिएतनाम थेट विमानसेवा सुरू होत असून, दिल्ली ते नैरोबी थेट विमानसेवाही सुरू होणार आहे. इजिप्त, मलेशिया आणि तुर्कीसाठीही रस्ते खुले झाले आहेत. साहजिकच, अशा परिस्थितीत अधिकाधिक लोक विमानाने प्रवास करतील, यासाठी विमान कंपन्या आता स्वस्त पॅकेज आणण्याची स्पर्धा करतील.
दरम्यान, विमानाच्या महागड्या इंधनामुळे विमान कंपन्यांसमोरही नवी अडचण निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्थाही दोन वर्षांत कोलमडली. पर्यटन आणि सेवा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला. वास्तविक, अनेक प्रकारचे व्यवसाय पर्यटन उद्योगाशी निगडीत आहेत. त्यांच्यावर करोडो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्याने पर्यटन उद्योगाला चैतन्य मिळेल, अशी आशा आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक येतात. आगामी उन्हाळी हंगामासाठी पर्यटन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनीही आकर्षक पॅकेजेस देण्यास सुरुवात केली आहे. साहजिकच, प्रतीक्षा केवळ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची होती.