वरिष्ठ नागरिक ‘टीडीएस’ कसा वाचवू शकतील?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2022   
Total Views |
 
TDS
 
 
 
 
 
माहितीच्या अभावाने प्राप्तिकर पात्र उत्पन्न असलेलेही कित्येक जण त्यांच्या त्यांच्या वयानुसार ‘१५ जी’ किंवा ‘१५ एच’ फॉर्म भरतात. ७५ हून अधिक वय असलेल्या व्यक्ती ज्यांना प्राप्तिकर रिटर्न ‘फाईल’ करण्याची गरज वाटत नसेल, अशा व्यक्ती प्राप्तिकर कायद्याच्या ‘फॉर्म १२ बीबीए’ भरून त्यांच्या बँकेत सादर करू शकतात. पण, अशावेळी त्या व्यक्तीचे खाते एकाच बँकेत हवे.
 
 
 
 
दि. १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाले. प्राप्तिकराबाबतचे ‘सेल्फ डिक्लअरेशन फॉर्म्स’ आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सादर करावेत. ‘फॉर्म १५ जी’ किंवा वरिष्ठ नागरिकांनी ‘फॉर्म एच’ वर्षाच्या सुरुवातीलाच जेथे गुंतवणूक केली आहे, त्या बँकेला किंवा अन्य गुंतवणुकीच्या ठिकाणी सादर करावा. हा फॉर्म सादर केल्यानंतर गुंतवणुकीच्या व्याजदरावर मूलस्रोत (‘टॅक्स डिडक्टेल अ‍ॅट सोर्स’ - टीडीएस) प्राप्तिकर कापला जात नाही. गुंतवणूकदाराला व्याजाची पूर्ण रक्कम मिळू शकते. जितक्या रकमेपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जात नाही, त्याहून सर्व मार्गे जर उत्पन्न कमी असेल, तर अशांनीच हा फॉर्म भरावा, असा नियम आहे. पण, माहितीच्या अभावाने प्राप्तिकर पात्र उत्पन्न असलेलेही कित्येक जण त्यांच्या त्यांच्या वयानुसार ‘१५ जी’ किंवा ‘१५ एच’ फॉर्म भरतात. ७५ हून अधिक वय असलेल्या व्यक्ती ज्यांना प्राप्तिकर रिटर्न ‘फाईल’ करण्याची गरज वाटत नसेल, अशा व्यक्ती प्राप्तिकर कायद्याच्या ‘फॉर्म १२ बीबीए’ भरून त्यांच्या बँकेत सादर करू शकतात. पण, अशावेळी त्या व्यक्तीचे खाते एकाच बँकेत हवे. बर्‍याच जणांची बर्‍याच बँकांमध्ये खाती असतात. बँकांच्या ठेवींना फक्त पाच लाख रूपयांपर्यंतचे संरक्षण ‘डीआयसीजीसी’कडून मिळत असल्यामुळे गुंतवणूकदार सध्या एका बँकेत पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम ठेवायला तयार नसतात.
 
 
 
 
 
ज्या वरिष्ठ नागरिकांचे उत्पन्न फक्त पेन्शन व ठेवींवरील व्याज यातूनच आहे, असे गुंतवणूकदारच ‘१२ बीबीए’ फॉर्म भरू शकतात. याशिवाय पेन्शन व ठेवींवरील व्याज एकाच बँकेत जमा होणे गरजेचे असते. वेगळ्या बँकेत पेन्शन व वेगळ्या बँकेत ठेवींवरील व्याज जमा होत असेल, तर अशा व्यक्ती ‘१२ बीबीए’ फॉर्म सादर करू शकत नाहीत. फॉर्म ‘१२ बीबीए’मध्ये बरीच माहिती भरावी लागते. प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० सी’पासून ते ‘८० यू’पर्यंत ज्या ज्या करसवलती घेतलेल्या आहेत, त्यांचा तपशील द्यावा लागतो, तसेच प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० ए’नुसार कोणते ‘रिबेट’ घेतले आहेत, याचाही तपशील द्यावा लागतो. कर सवलती, कर रिबेट नंतर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांहून कमी असावे लागते, याशिवाय पेन्शन व मुदत ठेवींवर मिळणारे व्याज यांचाही तपशील द्यावा लागतो.
 
 
 
 
 
‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ (सीबीडीटी)च्या नियमानुसार ‘१२ बीबीए’ फॉर्म सादर झाल्यानंतर ज्या बँकेत हा सादर झाला आहे, त्या बँकेत करदात्याचे उत्पन्न त्यांनी मिळविलेल्या कर सवलती, रिबेट यांची योग्य तपासणी करावी लागते व बँकेला समजले की, या करदात्याने कर भरणे आवश्यक आहे, तर स्लॅबनुसार ती बँक कर वसूल करते, हा फॉर्म भरणे वरिष्ठ नागरिकांना सोपे व्हावे म्हणून ‘सीबीडीटी’ने बँकांना फॉर्म भरण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना मदत करावी, अशा सूचना दिली आहे. परिणामी, बँकांना वरिष्ठ करदात्यांच्यावतीने प्राप्तिकर ‘रिटर्न आयटीआय’ ही फाईल ‘१२ बीबीए’ फॉर्म भरल्यावर ‘टीडीएस’ कापला जात नाही.
 
 
 
 
 
 
प्राप्तिकर कायद्यानुसार, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीने जर एखाद्या आर्थिक वर्षात ५० हजारांहून जास्त व्याज मिळविले, तर अशांच्या दहा टक्के दराने मूलस्रोत प्राप्तिकर कापण्यात येतो. पाच टक्के आणि दहा टक्के स्लॅबमध्ये असणार्‍या करदात्याच्या जर दहा टक्के दराने ‘टीडीएस’ कापला, तर त्याचा नियमापेक्षा जास्त प्राप्तिकरही कापला जाऊ शकतो. उदाहरणच द्यायचे, तर एखाद्याच्या व्याजाचे उत्पन्न सात लाख रुपये आहे, तर त्याचा दहा टक्के दराने ७० हजार ‘टीडीएस’ कापला जाणार. जर या करदात्याने ‘१२ बीबीए’ फॉर्म सादर केला, तर त्याचा ५२ हजार, ५०० रुपये कर कापला जाणार. म्हणजे १७ हजार, ५०० रुपये अतिरिक्त कर कापला जाणार. हा कर या खातेदाराला प्राप्तिकर खात्याकडून ‘रिफंड’ मागवावा लागेल.
 
 
 
 
‘फ्रीलान्सर्स’साठी कर कायदे
 
‘फ्रीलान्सर्स’ म्हणून व्यवसाय करणार्‍यांची संख्या भारतात फार मोठी आहे. ‘फ्रीलान्स’ कामातून मिळालेले उत्पन्न नफा म्हणून गणले जाते. हे उत्पन्न स्वयंरोजगारातून मिळविले असे समजले जाते. ‘इन्कमटॅक्स रिटर्न’ भरताना ‘फ्रीलान्सर’नी ‘इन्कमटॅक्स रिटर्न’ (आयटीआर)चा ‘फॉर्म-३’ किंवा ‘फॉर्म-४’ भरावयास हवा. एखादा नोकरदार त्याच्या नोकरीशिवाय ‘फ्रीलान्सिंग’मधून काही उत्पन्न मिळवित असेल, तर त्याला धंद्यातून किंवा व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नांसाठी जो अर्ज आहे, तो त्या नोकरदाराने भरावयास हवा. ‘फ्रिलान्स’ कामे करण्यासाठी जो खर्च आला, तो मिळलेल्या उत्पन्नातून कमी करुन उरलेले करपात्र समजण्यात येेते.
 
 
 
 
 
‘फ्रीलान्स’ कामासाठी जागा भाड्याने घेतली असल्यास, त्या जागेच्या भाड्याच्या खर्च, या जागेत काही डागडुगी व दुरुस्ती केली असेल, तर त्यासाठी आलेला खर्च लॅपटॉप, वैयक्तिक संगणक जे ‘फ्रिलान्स’ कामासाठी लागतात, ते बिघडल्यावर दुरुस्तीसाठी होणारा खर्च, कार्यालयीन खर्च, प्रवास खर्च उपकरणांच्या घसार्‍याची रक्कम हे सर्व खर्च ‘फ्रीलान्सर’ त्याच्या उत्पन्नातून कमी करू शकतो व हे खर्च कमी केल्यानंतर त्याचे जे उत्पन्न उरेल ते उत्पन्न करपात्र असते. ‘फ्रीलान्स आयटीआर’ फाईल करताना ५० हजार रुपयांचा ‘स्टॅण्डर्ड डिडक्शन’फायदा घेऊ शकत नाहीत. जर नोकरी व ‘फ्रीलान्स’ दोन्हीही चालू असेल, तर नोकरीच्या उत्पन्नावर ‘स्टॅण्डर्ड डिडक्शन’ घेता येऊ शकते.
 
 
 
 
 
‘फ्रीलान्सर’ने सर्व मार्गे मिळणारे उत्पन्न एकत्र करुन, सर्व खर्च त्यातून कमी करुन निश्चित करपात्र उत्पन्न ठरवावयास हवे. ‘फ्रीलान्सर’ला पेमेंट करताना ‘टीडीएस’ कापला जातो. करपात्र उत्पन्नावर कराची रक्कम ठरविताना, ‘टीडीएस’द्वारे भरलेला कर त्यातून कमी करावा लागतो. ज्याचे निव्वळ करपात्र उत्पन्न दहा हजार रुपयांहून अधिक आहे, अशा ‘फ्रीलान्सर’ना दर तीन महिन्यांनीं ‘अ‍ॅडव्हान्स’ करभरणाही करावा लागतो. जर एकूण कर दहा हजार रुपयांहून अधिक भरावा लागत असेल, तर त्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार व्याजही भरावे लागते.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@