मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याला आता जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, असा इशारा भाजप आमदार श्याम सावंत यांनी दिला. किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र समाचार भाजपच्या भांडुप येथील पोलखोल सभेत घेम्यात आला. यावेळी खासदार मनोज कोटक यांची प्रमुख उपस्थिती होती.
भांडुप पश्चिममध्ये वॉर्ड क्रमांक ११६मध्ये भाजपची पोलखोल सभा नुकतिच पडली. या सभेसाठी माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी पुढाकार घेतला होता. सदर सभेमध्ये मुंबई महापालिकेच्या विविध घोटाळे, कोव्हिड सेंटर मधील गैरव्यवहार, नालेसफाई इत्यादी महत्वाच्या विषयांवर खा. मनोज कोटक यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करताना आमदार श्याम सावंत यांनी झुंडशाही माजवणाऱ्या शिवसेनेच्या मुजोर राज्यकर्त्यांना इशारा दिला. भाजप कार्यकर्त्याला जर त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी जागृती पाटील यांनी विभागामध्ये सर्वोत्तम काम केले आणि त्याबद्दल समस्त व्यासपीठ आणि मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. सदर सभेस संजय शर्मा, प्रवीण दहितुले, साक्षी दळवी, किरण गायचोर व भांडुप भाजप पदाधिकारी उपस्थित होते.