आजोबा, वडील यांच्या दुर्गभ्रमंतीने भारावून महाराष्ट्रातील ऐतिहासिक‘दुर्गवाटां’ची महती सर्वदूर पोहोचविणारा दुर्गसखा अथर्व माधव बेडेकर यांच्याविषयी...
ठाणे आणि बेडेकर यांचे एक अतुट नाते. सध्या ठाण्यात बेडेकरांची सहावी पिढी कार्यरत आहे. त्यातीलच एक अथर्व माधव बेडेकर या हरहुन्नरी युवकाचे दुर्गप्रेम वादातीत आहे. दि. १५ जानेवारी, १९९६ रोजी ठाण्यात जन्मलेल्या अथर्वचे बालपण इतर मुलांप्रमाणेच मौजमजा करण्यात गेले. घरातच शैक्षणिक सुबत्ता असल्याने अथर्वने प्राथमिक शिक्षण डॉ. बेडेकर विद्यामंदिर या ठाण्यातील नामांकित शाळेतून पूर्ण केले. पुढे ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयामधून संस्कृत विषयात पदवी मिळवली, तसेच,Heritage by Bhandarkar research institute’ हा व 'Introduction to Brahmi Script' हे अभ्यासक्रम पूर्ण केले, तर मुंबई विद्यापीठामधून ‘एम.ए.’ (पुरातत्व) पूर्ण करून अथर्व सध्या संस्कृत विषयात ‘एम.ए.’ करीत आहे.
’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे अथर्वलाही बालपणापासूनच गड-किल्ल्यांविषयी प्रचंड कुतूहल... घरात आजोबांपासून डोंगरयात्रा, गडकिल्ले फिरण्याची परंपरा होतीच, तीच परंपरा त्याच्या वडिलांनंतर अथर्वमध्येही रुजली. वडिलांनीच त्याला डोळसपणे दुर्ग (किल्ला) पाहायला शिकवल्याचे अथर्व सांगतो. शाळेत असल्यापासून इतिहास व भूगोलाची आवड असल्याने ऐतिहासिक घटना जेथे घडल्या, ती ठिकाणं पाहण्याची, अभ्यासण्याची उत्सुकता मनामध्ये होती. या ऐतिहासिक ठिकाणांची अनामिक ओढ अथर्वला वाटू लागली. त्यामुळे ही वारसास्थळे नुसती फिरून पाहण्यापेक्षा या स्थळांकडे अभ्यासात्मक दृष्टीने अथर्व पाहू लागला. अन् तो दुर्गसखा बनला.
दुर्गप्रेमाच्या ओढीने त्याने केलेला पहिला ट्रेक राजमाची हा होता. त्या ट्रेकची संपूर्ण आखणी अथर्वने केली होती. राजमाची सर करायला अथर्वने सोबत मित्रांनाही घेतले होते. या पहिल्याच ट्रेकला खूप धमाल केली होती. परंतु, तेथे गेल्यावर त्यांना एक हृदय पिळवटून टाकणारी घटना दिसली. दोन दिवस आधी काही अतिउत्साही मंडळी राजमाची येथे येऊन गेली होती. त्या मंडळाींनी रात्री दारू पिऊन अख्खा गड जाळून टाकला. त्यामुळे किल्ल्याची खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाली. तसेच, गुरांची वैरणसुद्धा जळून खाक झाल्याचे विचलित करणारे दृष्य राजमाचीवर पाहायला मिळाल्याचे विषण्ण मनाने अथर्व सांगतो. गड-किल्ले हा आपला जाज्वल्य वारसा आहे. तेव्हा, हा वारसा जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या अप्रिय घटना टाळायला हव्यात, यादृष्टीने जनजागृती करण्याचे कामही सुरू असल्याचे अथर्व आवर्जून सांगतो.
वाचन, दुर्गभ्रमंती, ऐतिहासिक वारसास्थळांची भ्रमंती, या सर्व गोष्टींचे ‘डिजिटल’ दस्तावेजीकरण करण्याचा छंद लागल्याने तो ‘दुर्गवाटा’ या आपल्या युट्युब चॅनेलवरून दुर्ग, गड, किल्ल्यांचे माहितीपर व्हिडिओ प्रसारित करतो. या कामात त्याला मित्रांची साथ लाभली आहे. प्रसाद शिंदे यांच्यासह त्याचा आणखी एक मित्र संकेत हुर्णेकर हादेखील दुर्ग-किल्ल्यांच्या व्हिडिओ चित्रीकरणात तसेच ‘एडिटिंग’मध्ये मदत करतो, असे अथर्व सांगतो.
कारकिर्द घडली! असं म्हणण्याइतके आपण मोठे नाही, असं मानणारा अथर्व पोटा-पाण्यासाठी मात्र नोकरी करतो व इतर गोष्टी छंद म्हणून जोपासतो. दुर्ग फिरण्याची आवड प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या साहित्यामुळे निर्माण झाली. या आवडीमुळे पुरातत्व विषयात ‘एम.ए.’ करण्याचा निर्णय घेतला. याच दृष्टिकोनातून आता दुर्ग सहलींचेही आयोजन करीत असल्याचे तो सांगतो. महाराष्ट्रातील दुर्गांना समृद्ध परंपरा लाभली आहे. गो. नी. दांडेकर यांच्यासारख्यांमुळे आज महाराष्ट्रात दुर्गभटकंतीची परंपरा निर्माण झाली आहे. याच परंपरेचे पाईक होण्याचे भाग्य लाभल्याचे अथर्व नमूद करतो. या माध्यमातून साकारलेल्या ‘दुर्गवाटा’ चॅनेलसाठी गेल्या वर्षभरात त्यांनी ३३ वेगवेगळ्या ऐतिहासिक दुर्गभ्रमंतीचे चित्रीकरण केले असून त्याचे रंजक एपिसोड अथर्व व त्याचे सहकारी प्रेक्षकांसाठी घेऊन आल्याचे सांगतात. आत्तापर्यंत त्याचे १०० हून अधिक ट्रेक पूर्ण झाले आहेत. प्रत्येक ट्रेकमध्ये अथर्व दुर्गांचे महत्त्व पटवून देतो व त्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही देतो.
अद्याप कोणत्याही पुरस्कारांचा धनी न झाल्याची कबुली देणारा अथर्व, २०१९ साली 'Horizon Centre for cultural studies' तर्फे गो.नी.दांडेकर शिष्यवृत्ती मिळाल्याचे अभिमानाने सांगतो. त्याद्वारे सध्या तो नाशिक जिल्ह्यातील हतगड या दुर्गावर संशोधन करत आहे. नवीन पिढीला संदेश देताना अथर्व सांगतो की, “आपल्या जाज्वल्यइतिहासाकडे सजगपणे व डोळसपणे बघा. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे,”असा मित्रत्वाचा उपदेश तो करतो. भविष्यात बर्याच गोष्टी करायच्या आहेत. ही फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्र व भारतातील गड-किल्ले व ऐतिहासिक वारसास्थळे, दुर्गवाटा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याची अभिलाषा बाळगणार्या अथर्व बेडेकर या दुर्गसख्याला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!