अस्माकं देवा, उभयाय जन्मने,
शर्म यच्छत द्विपदे चतुष्पदे।
अदत् पिबद् ऊर्जयमानम् आशियां,
तद् अस्मे शं योर् अ रपो दधातन॥
(ऋग्वेद 10.37.11)
अन्वयार्थ
(देवा:) हे ज्ञान-गुण संपन्न सुजनहो, दिव्य मानवांनो, (अस्माकम् उभयाय जन्मने) आमच्या दोन्ही जन्माच्या कल्याणासाठी (शर्म यच्छत) सुख व आनंद देणारा उपदेश प्रदान करा. (द्विपदे चतुष्पदे) मानवांकरिता आणि पशूंकरिता (शर्म यच्छत) सुख व कल्याणाची शिकवण वितरित करा. आम्ही (अदत् )जे अण्णा भक्षण केले आहे, (पिबत्) जे पेय प्राशन केले आहे, तसेच (आशीतम्) जे भोजन इतरांना खाऊ घातले आहे, (ऊर्जयमानम्) ते ऊर्जावान, स्फूर्तिदायक व्हावे. आपण (अस्मे) आम्हांमध्ये (तत्) ते विवेकज्ञान, (दधातन) स्थापन करावे, ज्याकरवी आम्हा सर्वांना (शम्, योर्, अ-रप:) शांतता, दुःखनाश आणि मलहीनता प्राप्त होत राहील.
विवेचन
समाजात वावरणार्या थोरा-मोठ्यांची शिकवण किंवा संत-महापुरुषांचे अमृतमय उपदेश अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे ठरत. अशा संतांना ’देवमाणूस’ किंवा ‘दिव्यगुणांनी युक्त सुजन’ असेही म्हटले जाते. ते जे काही आपल्याकडे असते, त्याचे दान करतात. विशेष करून आपल्या तपस्वी व पवित्र जीवनाच्या माध्यमाने ते समाजात जणू काही आदर्शांची साक्षात प्रस्थापनाच करतात. मनसा, वाचा, कर्मणा त्यांच्यात एकरुपता असते. म्हणूनच अशा ईश्वरनिष्ठ दिव्य सत्पुरुषांविषयी संत ज्ञानेश्वरांनी
पसायदानात म्हटले आहे-
चला कल्पतरूंचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव पीयूषांचे!
म्हणजेच देवजन हे चालणारे कल्पतरूंचे बगीचे असतात. ते सजीव चिंतामणीचे गाव ठरतात आणि ते बोलणारे अमृताचे जणू काही सागरच आहेत. त्यांची वाणी सदैव परोपकाराच्या कार्यात व्यस्त असते. ते जे काही बोलतात, त्यात प्राणिमात्रांचे हित व सर्व कल्याण दडलेले असते. त्यांचे बोलणे ‘सुधामुचो वाच:!’ असते. त्यांच्या वेदप्रामाण्यवादी वाणीतून सतत अमृताचा वर्षाव होत असतो. सांसारिक मायामोहाच्या जंजाळात गुंतून पडलेल्या सर्वसामान्य अज्ञ लोकांना अशाच दिव्य महापुरुषांकडे धाव घ्यावी लागते आणि त्यांना अमृतोपम उपदेशांकरिता साकडे घालावे लागते.
असाच भावाशय सदरील मंत्रात दडला आहे. सामान्य नागरिक या अशा देवपुरुषांकडे जाऊन आदर्श शिकवण देण्याची प्रार्थना करीत आहेत. या दिव्य महात्म्यांनी श्रोत्यांना चार प्रकारचा उपदेश करावा, असे आवाहन सदर मंत्रातून व्यक्त होते. अगदी प्रारंभीच म्हटले आहे-
देवा:, अस्माकम् उभयाय जन्मने शर्म यच्छत।
अहो, दिव्य महापुरुषांनो, आपण आम्हास असा उपदेश करावा की, आम्हास या जन्मी व पुढील जन्मी शर्म प्राप्त व्हावे. शर्म शब्दाचे सुख, आनंद, घर, संपत्ती किंवा इतर साधने असे अनेक अर्थ होतात. प्रस्तुत प्रसंगी ‘शर्म’ शब्दाचा प्रयोग संपत्ती या अर्थाने घ्यावयाचा आहे. संपत्ती म्हणजेच भौतिक आणि आध्यात्मिक संपदा! आपला हा जन्म सफल करावयाचा असेल, तर या दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा विकास साधावा लागेल. भौतिक संपत्तीने देह व जीवनाचे कल्याण साधते, तर अध्यात्म संपत्तीने आत्मिक जीवन यशस्वी ठरते. भौतिक संपदा मिळवताना ती धर्मपूर्वक मिळावयास हवी. ज्या धर्माचे प्रतिपादन वेदशास्त्रांनी केली आहे, अशा धर्ममार्गाने धनसंपत्तीचा विनियोग हवा. त्यासोबतच अष्टांग योगाचे अनुष्ठान, सत्संग, स्वाध्याय आत्मनिरीक्षण, परोपकार या माध्यमाने आत्मसुख वृद्धिंगत केले पाहिजे. यामुळे या जन्माचे व परजन्माचे कल्याण साधले जाते.
आजचा माणूस केवळ या जन्माचा विचार करतो, तो पाप-पुण्याचा, धर्म-अधर्माचा विचार न करता. पशूंसारखे जगणे जगू पाहतोय. यात की, सद्विचारांना व विवेकबुद्धीला स्थानच नाही. अशी अविचारी पिढी आज सर्वच क्षेत्रांत काम करीत आहे. परिणामी, संस्कारविहीन वर्ग व समाजाचा उदय होतो आहे. पुढला जन्म कोण पाहिला आहे? जेवढे काही कमावता येईल, तेवढे कोणत्याही मार्गाने कमवावे! अशा चार्वाकधार्जिण्या, सुखासीन, नास्तिकवृत्ती बाळगणार्या समूहाचा उदय होतो आहे. ‘यावत् जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्!’ हा विचार जोपासणारा व पुढील जन्माचा यत्किंचितही विचार न करणारा तथाकथित सुशिक्षित समूह प्रचंड प्रमाणात वाढतोय. म्हणूनच वेदमंत्रात देवजनांकडे केली गेलेली इह-पर जन्मांच्या हा कल्याणाची कामना खूपच दिशादर्शक ठरते.
दुसरी प्रार्थना आहे, ती मानव व पशू समूहाच्या हितासाठी व त्यांच्या सुखासाठी उपदेश करण्याची-
देवा:,अस्माकं द्विपदे चतुष्पदे शर्म यच्छत!
मानवाला वाटते की, फक्त मानव समुदायाचीच उन्नती साधावी. आरोग्य, सुख हे सर्व आम्हालाच मिळावे. पण, बुद्धिमान माणसाने कधीही चतुष्पाद म्हणजेच चार पायांच्या पशुपक्ष्यांचा कधी विचारच केला नाही. खरेतर बुद्धिमान समजल्या जाणार्या मानवाने आपल्या मनाची विशालता व व्यापकता वाढवावयास हवी. आपण केवळ आपलाच विचार न करता मुक्या व दीन-दुबळ्या प्राण्यांच्या जीवांचा ही विचार करावयास हवा. सर्व प्रकारचे पशुपक्षी व इतर जीवजंतूच्या आरोग्य व जीवनमानाची काळजी व्हायला हवी. आपल्या मांसाहारी प्रवृत्तीमुळे त्यांची जीव जाता नयेत. आपल्या वागण्यातून त्यांना थोडादेखील त्रास होता नये. ही भूतदया जेव्हा मानव अंगीकारेल, तेव्हा ‘अहिंसा परमो धर्मः!’ हे वचन सार्थक ठरेल व सर्वत्र सुखाचे वारे वाहू लागतील. त्यासाठीच आमचे आद्यकर्तव्य आहे की, आमच्या ज्ञान व बुद्धी वैभवावर आधारित त्या निर्दोष सर्व प्राण्यांना व पक्ष्यांना सुखाची प्राप्ती व्हावी, याकरिता प्रयत्न व्हावयास हवेत.
पण, आजचा दुर्दैवी माणूस आपल्या सुखासाठी या प्राण्यावर क्रूरपणे शस्त्रे चालवतोय. त्यांचे जगणे असह्य करतोय. लाखो कत्तलखान्यात मुक्या गाई-बैलांच्या, शेळ्या-मेंढ्यांच्या, कोंबड्यांच्या व इतर प्राण्यांच्या होणार्या निर्घृण कत्तली कोणत्या दिशेने घेऊन चालले आहे.
तसेच आज मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रशेतीच्या नावावर पशुधन नष्ट होत चालले आहे. परिणामी, निसर्गाचे संतुलन बिघडतेय आणि पर्यावरणाचाही र्हास होतो आहे. म्हणूनच आम्हास मानव समाजासोबतच पशू समाजाचादेखील विचार करणे गरजेचे आहे.
वेदमंत्रातील तिसर्या उपदेशाविषयी म्हटले आहे-
देवा:, अस्माकं अदत्, पिबत्,
आशितम्, (तद्) ऊर्जयमानम् !
हे दिव्य महात्म्यांनो, आपण आम्हास असा उद्देश द्यावा की, आम्ही जे काही अन्नग्रहण केले आहे, जे काही पेय प्राशन केले आहे आणि इतरांनादेखील आम्ही खाऊ घातले आहे, ते सर्व शक्तिवर्धक, बलवर्धक आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरो. याचाच भाव असा की, या ज्ञानवंत देवपुरुषांनी मानव समाजाच्या आहारासाठी उपयुक्त अशी आरोग्यवर्धक शिकवण द्यावी.
आपला आहार हा सात्विक, शुद्ध व पवित्र असावा. आयुर्वेदशास्त्रात ‘हितभुक्’, ‘मितभुक्’ व ‘ऋतभुक्’ असे भोजनाचे तीन प्रकार सांगितले आहेत. आपले जेवण वात, पित्त व कफ या तीन प्रकृतीनुसार स्वास्थ्याच्या अनुकूल म्हणजेच हितकारक असावे. तसेच आहार घेत असताना आपण योग्य त्या प्रमाणात घ्यावा आणि जे अन्न ग्रहण करतो आहोत, ते ऋत् म्हणजेच सत्य मार्गाने मिळवलेले असावे. इतकी काळजी आहाराबाबत घेतली जावी. ही खबरदारी घेतली, तर म्हणजेच मंत्रात वर्णिल्याप्रमाणे आमचे जे खाल्लेले, प्यालेले आणि इतरांना खाऊ घातलेले आहे, ते निश्चितच बलवर्धक व ऊर्जा प्रदान करणारे ठरेल.
चौथी गोष्ट वर्णितांना मंत्रात म्हटले आहे-
अस्मे तत् दधातन, शम् योर् अ-रप!
म्हणजेच देव पुरुषांनी आम्हाला विवेकाचा, सद्विचारांचा उपदेश करावा. त्यांच्या वाणीतून सामान्य लोकांच्या हृदयात विवेकाची रुजवण व्हावी. कारण, विवेकशील माणूस सतत व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतो. त्याची सूक्ष्मबुद्धी नेहमीच सत्य आणि प्रामाणिकपणाचा विचार करणारी असते. विवेकामुळे काय खरे, काय खोटे, याची जाणीव होते. त्याच्या मनात ज्ञानाचा प्रकाश होतो. संकुचित विचारांपासून तो नेहमीच दूर राहतो आणि सतत व्यापक समष्टी वाचक विचार करतो. त्याच्याच विवेकातून समाजात सद्भाव, स्नेह आणि प्रेम वाढीस लागते आणि आदर्श समाजव्यवस्था उदयास येण्यास मदत मिळते. या उलट विवेकहीन लोकांमुळे समाजाची घसरण होण्यास प्रारंभ होते व सर्वत्र दु:खाचे वातावरण पसरते. यास्तव दिव्यजनांचा विवेक संवर्धनाचा सदुपदेश सर्वांच्या सुख, शांती व कल्याणाकरिता अतिशय अमृतोपम ठरतो.
वरील चारही प्रकारचे उपदेश दिव्य सुजन महापुरुषांनी सामान्य लोकांकरिता नेहमीच देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून समाज, राष्ट्र व एकूणच समग्र विश्वाची सर्वांगिण उन्नती होण्यास त्यांची ती उपदेशात्मक शिकवण मार्गदर्शक ठरेल.
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य