मुंबई : "गेल्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा भारत सरकारने इंधनाच्या किमतींवरील उत्पादन शुल्क कमी केले, तेव्हा राज्यांना कर कमी करण्याची विनंती केली होती, परंतु महाराष्ट्रासह बिगर-भाजप शासित राज्ये ही केवळ नागरिकांच्या त्रासाच्या किंमतीवर नफा मिळविण्यात व्यस्त आहेत. शेजारच्या दीव-दमणमध्ये १०३ रुपयांत पेट्रोल मिळतंय, तर महाराष्ट्रात त्याचे दर १२० रुपये का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे.", असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी (दि. २७ एप्रिल) त्यांनी केलेल्या ट्विट्सवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीस यावेळी म्हणाले की, "आरोप प्रत्यारोपाचा हा खेळ गैरकृत्य लपवण्यासाठी उपयुक्त आहे. पण अशा कृत्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने इंधनावरील एक्साईज ड्यूटी कमी केल्यानंतर देशातील राज्यांनाही तसं करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रासह बिगर-भाजप शासित राज्ये ही केवळ नागरिकांच्या त्रासाच्या किंमतीवर नफा मिळविण्यात व्यस्त आहेत. अशात सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. महाराष्ट्र सरकारकडून कर कमी न करता आतापर्यंत ३४०० कोटी रुपये कमवण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर इंधनावरील कर कमी करावेत आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा; विशेषतः मराठी माणसाला!"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मात्र विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. "संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. डायरेक्ट टॅक्स आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकावर असणारे राज्य आहे.", असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर फडणवीसांकडून चांगलेच प्रत्युत्तर देण्यात आले. ते म्हणाले, "जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळत असतो, जुनी थकबाकीसुध्दा मिळाली आहे आणि उरलेली थकबाकी देण्याची मुदत जुलै २०२२ आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का? शेजारच्या दीव-दमणमध्ये १०३ रुपयांत पेट्रोल मिळतंय, तर महाराष्ट्रात त्याचे दर १२० रुपये का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातल्या जनतेला तत्काळ दिलासा द्या."