मुंबई: परळच्या ८० वर्षीय शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची सहकुटुंब भेट घेतली. शिवसेनेसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या या आजींनी मुख्यमंत्री आल्यावर त्यांच्याकडे आपल्या नातवासाठी नोकरी आणि राहायला घर मागितले. गेले २५ वर्षे मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे, महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर आहे तरीही सामान्य मराठी माणूस नोकरी, घर या मूलभूत गरजांसाठी झगडतोय ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या आजींनीही आपल्या करून परिस्थितीचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
या घटनेतून मुंबईतील सामान्य मराठी माणसांच्या व्यथा समोर आल्या. सामान्य मराठी माणूस बेरोजगारी, हक्काचे घर या गोष्टींसाठी अजूनही झगडतोय . शिवसेनेच्या निष्ठावंत असूनही या आजींची झालेली घोर उपेक्षा या निमित्ताने तरी मुख्यमंत्र्यांच्या समोर आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्या वृद्धेची सुरु असलेली उपेक्षा आता तरी संपुष्टात येईल अशी मागणी केली. या निमित्ताने मुख्यमंत्री घराबाहेर पडले. अशीच एसटी संपाने भरडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घ्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी अशी अपेक्षा य निमित्ताने फडणवीस यांनी व्यक्त केली.