माझे इतरांच्या जवळ पोहोचणे किंवा त्यांना भेटणे, हे गोड असावे आणि माझे त्यांच्यापासून दूर जाणे म्हणजेच विलग न होणे हेदेखील गोड असावे. किती हा सामान्य बालबोध करून देणारा उपदेश. आम्ही मानव हे समाजशील प्राणी म्हणून ओळखले जातो. मनुष्य हा कधीच एकटा राहत नाही. तो समूहात विचरतो. समाजात वावरताना त्याला एक दुसर्याशी भेटावे लागते, जवळ जावे लागते. पण, त्याचे हे जवळ जाणे कडवट नको, तर प्रेमळ हवे.
मधुमन्मे निक्रमणं मधुमन्मे परायणम्।
वाचा वदामि मधुमद् भूयासं मधुसन्दृश:॥
(अथर्ववेद-1/34/3)
अन्वयार्थ
(मे) माझे (निक्रमणम्) जवळ येणे, भेटणे हे (मधुमत् ) गोड, मधुर असावे. (मे) माझे (परा+ अयनम्) दूर जाणे, विभक्त-वेगळे होणे हे देखील (मधुमत्) माधुर्यमय म्हणजेच गोड असावे. मी (वाचा) वाणीने (मधुमत्) गोडव्याने अतिशय परिपूर्ण होऊन (वदामि) बोलतोय. तसेच मी सर्वदृष्टीने (मधु सं दृश:) सर्वत्र गोड पाहणारा, गोड नजरेचा, मधुर दृष्टीचा (भूयासम्) होईन.
विवेचन
जीवनात सर्वात अधिक महत्त्वाचा असतो तो आपला व्यवहार. आपल्या व्यवहारामुळेच तर आपला परिसर आणि हे सारे जग शत्रू किंवा मित्र बनत असते. मानवजन्माचा उद्देशच इतरांशी प्रेमाने व्यवहार करणे होय. कटुव्यवहाराने आम्ही शत्रुत्व निर्माण करतो. कडवटपणाने जवळची प्रिय माणसे दूर जातात. पण, गोड व्यवहाराने मात्र शत्रू देखील आपला मित्र, सखा व हितचिंतक बनतो. अगदी हिंस्र प्राणीदेखील आपल्या चांगल्या, प्रेमपूर्ण व्यवहाराने आपली हिंस्रवृत्ती त्यागून आपणांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतात. अगदी लहानपणापासून घरात पाळली जाणारे कुत्रा, मांजर व अन्य हिंस्र पशु हेसुद्धा आपल्या कुटुंबीयांशी किती प्रेमाने वागताना दिसतात.
प्रस्तुत मंत्रात माधुर्याचा भाव विशद केलेला आहे. भगवंताने मानवाला अनमोल असे हृदय बहाल केले आहे, हे किती आमचे मोठे भाग्य! हृदयाची भाषा ही प्रेमाची असते. म्हणूनच हृदय हे स्नेह, वात्सल्य व प्रेमाचे प्रतीक मानले जाते. माणसे जेव्हा पशूप्रमाणे अभद्र व्यवहार करू लागतात, तेव्हा आपण सहजच म्हणतो, ‘तुला काय हृदय आहे की, नाही? किंवा हृदयाला कधी पाझर फुटतो की नाही?’ खरे तर वेदांचा दृष्टिकोन हा विशाल आहे. बुद्धिमान समजला जाणारा माणूस हा कधी वाईट वागू लागेल, याचा नेम नसतो. म्हणूनच वेदांनी मानवी प्रवृत्ती सुधारण्यासाठी अशा प्रकारचा उद्देश नेहमीच केला आहे. मानवाची बहिर्मुख प्रवृत्ती ही त्याला सतत वाईटांकडे घेऊन जाते. माणूस हा कधीही अंतर्मुख होऊन विचार करायला तयार नाही. दुर्देवाने त्याची हीच प्रवृत्ती जन्मोजन्मांपासून वेगवेगळ्या देहामध्येसोबत आलेली असते. म्हणूनच मानव क्रुद्ध, रागीष्ट व हिंसक बनू लागतो. त्यामुळे तो स्वतःबरोबरच इतरांसाठीदेखील त्रासदायक होऊ लागतो.
सदरील मंत्राचा अर्थ तसा खूपच सोपा आहे. यात चार वेळा ’मधु’ शब्द आला आहे. मधु म्हणजेच मध! मधमाशा कितीतरी प्रयत्नांनी मध गोळा करतात. विविध रंगीबेरंगी फुलां-पानांवरून त्या मकरंद एकत्रित करतात. याच मधात नैसर्गिक गोडी व माधुर्याचा वास आहे. म्हणजेच फुले व पाने ही मुळातच मधु आहेत. त्यांचा गोडवा हा आजचा नाही, तो तर अनादी काळापासून ओसंडत आहे. मधमाशांनी त्या गोडव्याला फक्त अभिव्यक्त केले आणि त्याचेच बनले मध!
अथर्ववेदातील पहिल्याच कांडाच्या 34व्या अध्यायात आलेले प्रारंभीचे चार-पाच मंत्र हे ‘मधुसूक्त’ म्हणून ओळखले जातात. त्यापैकीच हा एक साधा आणि सोपा, पण मानवाचे जीवन सफल करणारा मंत्र होय. मंत्रांच्या पहिल्या ओळीचा आशय इतका सरळ की, सामान्यपणे संस्कृत न समजणार्याला सुद्धा तो समजू शकतो. माणसाच्या वाटचालीशी, म्हणजेच येण्या-जाण्याशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे.
मे निक्रमणं मधुमत्, मे परायणं मधुमत्।
म्हणजेच माझे इतरांच्या जवळ पोहोचणे किंवा त्यांना भेटणे, हे गोड असावे आणि माझे त्यांच्यापासून दूर जाणे म्हणजेच विलग न होणे हेदेखील गोड असावे. किती हा सामान्य बालबोध करून देणारा उपदेश. आम्ही मानव हे समाजशील प्राणी म्हणून ओळखले जातो. मनुष्य हा कधीच एकटा राहत नाही. तो समूहात विचरतो. समाजात वावरताना त्याला एक दुसर्याशी भेटावे लागते, जवळ जावे लागते. पण, त्याचे हे जवळ जाणे कडवट नको, तर प्रेमळ हवे. आपले पाय त्या त्या व्यक्तीकडे वळतात, तेव्हा त्या पायाच्या मुळाशी मधुरता असावयास हवी. जाण्याचाच उद्देश हा जेव्हा गोड असतो, तेव्हा बाकी सार्या गोष्टी गोड होतात. याउलट निघण्याच्या अगोदरच जर काय आपण कटुता ठेवून निघालो, तर त्याची परिणती हे शत्रुत्व वाढविण्यात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हा सर्वांचे त्या त्या व्यक्तीजवळ पोहोचणे हे गोड व माधुर्यरसाने परिपूर्ण असले पाहिजे. तसेच, परत निघताना सुद्धा आपण प्रेमपूर्वक व्यवहाराने निरोप घेतला पाहिजे. एखाद्यापासून दुरावणे म्हणजे कायमस्वरूपी पुन्हा न येणे नव्हे, तर या परायणामध्ये पुन्हा शुभागमन देखील दडलेले असावे, अशा तर्हेने प्रत्येक मानवाने आपले जाणे आणि येणे मधुरतम ठेवले, तर समोरची व्यक्ती कोण आहे? कोणत्या जाती-धर्माची? कोणत्या पंथाची किंवा कोणत्या देशाची आहे किंवा ती कोणती भाषा बोलणारी आहे? असा संकीर्णतेचा भेदभावच राहत नाही. म्हणून वेद हे अशा प्रकारचा माणुसकीचा धर्म हा सांगतात. सर्वांचे जवळ येणे हे गोड आणि दूर होणे देखील गोड! अशा या आपल्या छोट्याशा मधुर व्यवहारात केवळ व्यक्ती किंवा कुटुंबच नव्हे, तर सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक सद्व्यवहार दडलेला असतो, जो की जागतिक शांततेला बळकटी आणणारा ठरतो.
त्याचबरोबर पुढील मंत्रांश आहे.
वाचा मधुमत् वदामि।
भगवंताने आम्हाला जी वाणी दिली आहे, ते आमचे सर्वदृष्टीने अभिव्यक्तीचे साधन. बाकी सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये खूपच बलशाली व सामर्थ्य संपन्न असली तरी त्यांना अभिव्यक्त होण्याचे माध्यम जर कोणते असेल तर ते म्हणजे वाचा. ही वाणी सर्वात प्रभावी आणि सर्वोत्तम साधन मानली जाते. भर्तृहरी म्हणतात-
वाण्येका समलंकरोति पुरुषं
या संस्कृता धार्यते।
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं
वाग्भूषणं भूषणम्॥
सर्व प्रकारच्या आभूषणांचेही हा भूषण जर कोणते असेल, तर ती म्हणजे वाणी होय. कारण, सुसंस्काराने युक्त अशा प्रकारची वाणी हीच माणसाला सर्व दृष्टीने अलंकृत करते. त्याचे जीवन सर्व दृष्टीने खुलविते व सजवते. त्याचबरोबर मानवाची सर्वांगीण प्रगतीसुद्धा साधते. मुखात गोडवा नसेल, तर आमचे निक्रमण म्हणजेच जवळीकता साधणे आणि परायणम म्हणजेच दूर जाणे. या येण्या-जाण्याच्या दोन्ही क्रिया व्यर्थ ठरल्याच समजा! वाणी प्रेमळ असावी. ती लबाड, भ्रमाच्या टाकणारी असेल, तर एकूणच माणसांचा माणसावरील विश्वासच उडू लागतो. सर्व काही असो किंवा नसो, पण वाणी मात्र मधाळ असावी. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात-
अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ
त्याचे गळा माळ असो नसो!
याच मंत्रांशाचा आध्यात्मिक अर्थ काढला, तर तो असा होतो - आमचे या जगात येणे, म्हणजेच जन्माला येणे, हे गोड असावे आणि जाणे अर्थात जगातून निघून जाणे म्हणजेच मृत्यू होणे हेदेखील गोडच असावे. आपल्या जन्मामुळे जगात गोडवा निर्माण व्हावा आणि आपल्या जाण्यामुळे देखील जगाला बरीच वर्षे आपली आठवण येत राहावी. हा आध्यात्मिक अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. शेवटी म्हटले आहे माझे जाणे-येणे आणि माझी वाणी गोड असेल, तर माझ्या दृष्टीतून आणि इतकेच नव्हे, प्रत्येक इंद्रियातून पवित्रता, शुद्धता, गोडवा व मधुरता या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात. आमचे सर्वांग सुंदर व मधुर व्हावे.
आज सारे जग व जगातील लोक क्षणा-क्षणाला जवळ येत आहे आणि क्षणार्धात दुरावत आहेत. म्हणजेच या दोन्ही क्रियांमागे मधुरता दिसत नाही. स्नेहशीलता आटत चालली आहे. याउलट कटुता मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. स्वार्थ अहंकार, गर्व, मोठेपणाचा ताठा यांनी व्यक्ती, कुटुंब,समाज आणि एकूणच सार्या देशात दुःखाचे थैमान घातले आहे. मधुरतेऐवजी कटुता वाढीस लागली आहे आणि हीच कटुता सार्या जगाला हिंस्र कृत्यांकडे प्रवृत्त करीत आहे. परिणामी दुःखच दुःख आणि सर्वत्र व शांतता!
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य