पुलिंद सामंत यांची विहीप कोकण प्रांत प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती
21-Apr-2022
Total Views | 228
13
मुंबई : लेखक, संशोधक आणि स्तंभलेखक पुलिंद सामंत यांची विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतचे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. दि. १७ एप्रिल रोजी विहीपच्या प्रांतप्रमुखांच्या सर्वसाधारण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. सामंत यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६७ रोजीचा. वयाच्या १८व्या वर्षापासून दक्षिण मुंबईत ते अभाविपमध्ये सक्रीय झाले. बी.कॉमचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी 'कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थे'तून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९९० नंतर सलग २७ वर्षे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ते कार्यरत होते. वयाच्या पन्नाशीनंतर पुन्हा राष्ट्रसेवा कार्यात उतरावे म्हणून निवृत्ती स्वीकारली.
दै.'मुंबई तरुण भारत'सह अन्य मुख्य वर्तमान पत्र व मासिकांमध्ये स्तंभलेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. सा.'विवेक'मध्ये त्यांनी 'रामायण ते राजनयन' ही त्यांची १८ व्हीडिओजची शृंखला प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडोस्फिअर, इंडिक परिवार या भारताच्या ऐतिहासिक तसेच भविष्यदृष्ट्या महत्वाच्या संज्ञांची ओळख प्रेक्षकांना यानिमित्ताने त्यांनी करुन दिली. २०१९ पासून ते मुंबई विद्यापीठातून ते 'पीएचडी'साठी 'भारत आग्नेय आशियातील धार्मिक संस्कृतिक अनुबंध या विषयावर संशोधन करत आहेत. 'इंडोस्फीअर रिव्हायव्हल : स्ट्रॅटेजीज् टू मीट सिनिक चॅलेंज' हे त्यांचे 'कींडल एडीशन' पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. नोएडा येथे होणाऱ्या विहीपच्या पुढील बैठकीत सांमत प्रांत प्रचार प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारणार आहेत.