मुंबई (प्रतिनिधी): साताऱ्यातील कराड तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ही पिल्ले सोमवारी रात्री आईच्या कुशीत विसावली. साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या भोळेवाडी परिसरातील उसाच्या शेतात शनिवारी दि. १६ रोजी बिबट्याची दोन पिल्ले सापडली होती. या पिल्लांचे वय अंदाजे २५-३० दिवसांचे होते.
ते आपल्या आई पासून दुरावले होते. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उसतोडणीचा हंगाम सुरू आहे. शिवारात उसतोडणी साठी गेलेल्या कामगारांना ही पिल्ले आढळून आली. त्यांनी तत्काळ कराड वनविभागाला तसे कळवले. वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही पिल्लांना सुखरूप स्थळी नेले. मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ नये, यासाठी शनिवारी संध्याकाळीच या पिल्लांची आईशी भेट घडवून देण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरले. त्यानुसार जिथे ही पिल्ले आढळून आली होती तिथेच त्यांना 'क्रेट' मध्ये ठेवण्यात आले. हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे ही बसवण्यात आले. वनविभागाच्या कर्मचार्यांनी बराच वेळ वाट पाहिली. मात्र, मादी काही आली नाही.
वनविभागाच्या पशुवैद्य डॉ चंदन सवने यांनी या पिल्लांची तपासणी केली. या पिल्लांमध्ये एक मादी आणि एक नर होते. त्यातील नर पिल्लू हे अशक्त होते. त्याच्या शेपटीसह मागच्या एका पायाला इजा झाली होती. त्यावर उपचार करण्यात आले. उन्हाळा सुरू असल्याने उष्णतेचा त्रास होऊ नये याची विशेष खबरदारी घेतली गेली. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीनही दिवस या पिल्लांची काळजी घेतल्यानंतर सोमवारी दि. १८ एप्रिल रोजी संध्याकाळी पिल्लांची आईशी भेट घडवून देण्याचे ठरले. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या पिल्लांना घेऊन उसाच्या शिवारात पोहोचले.
शेतात असलेल्या एका नांगरलेल्या भागात विशिष्ट पद्धतीने 'क्रेट' मातीत ठेवण्यात आले. त्यामध्ये या पिल्लांना ठेवण्यात आले. तसेच मादी बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले. मादीला आपली पिल्ले शोधणे सोप्पे जावे म्हणून या क्रेटच्या आजूबाजूला सदर पिल्लांचे मुत्र शिंपडण्यात आले. त्याचबरोबर या पिल्लांमधील एका सशक्त पिल्लाला सोमवार सकाळ पासून उपाशी ठेवण्यात आले होते. यामुळे ते पिल्लू जोर जोरात आपल्या आई ला आवाज देऊ लागले. शेवटी सोमवारी रात्री ११.३७च्या दरम्यान या पिल्लांची आई आली.
त्यानंतर ती सुमारे दोन तास शिवारातच होती. त्यानंतर मध्यरात्री ती आपल्या पिल्लांना घेऊन गेली. आणि वनविभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या कारवाईमध्ये उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ चंदन सवने , वनरक्षक शीतल पाटील ,उत्तम पांढरे, भरत खटावकर तसेच वनमजूर शंभू माने, अमोल पाटील यांनी उत्तम कामगिरी बजावली आणि एका आईची तिच्या पिल्लांनसोबत भेट घडवून आणली.