‘पोलखोल’वरील हल्ला हे बिथरलेल्या शिवसेनेचे लक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2022   
Total Views |
 
bhatkhalkar
 
 
मुंबई : “मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर आम्ही सातत्याने लढत असून आता शिवसेनेचे एकेक घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ लागल्याने शिवसेना बिथरली असून भाजपच्या ‘पोलखोल अभियाना’साठी बनवण्यात आलेल्या रथावर झालेला हल्ला हे बिथरलेल्या शिवसेनेचे लक्षण आहे,” अशी घणाघाती टीका मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केली. ‘पोलखोल अभियाना’वर झालेला हल्ला आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर भातखळकर यांच्याशी साधलेला हा संवाद...
 
 
नुकतीच ‘पोलखोल अभियाना’ची सुरुवात भाजपकडून करण्यात आली आहे. हे अभियान नक्की कसे राबविण्यात येणार आहे?
 
 
सर्वसामान्य मराठी माणसांना बेघर करण्याची दुर्दैवी घटना जिथे घडली, त्या गोरेगावमधील पत्राचाळ परिसरात या ‘पोलखोल अभियाना’ची सुरुवात करण्यात आली आहे. रविवार, दि. १७ एप्रिल रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, हे अभियान संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात राबविले जाणार आहे. जो भ्रष्टाचार मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माध्यमातून झाला, तो जनतेसमोर मांडण्यासाठीच आम्ही हे अभियान हाती घेतले आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागापर्यंत या अभियानाची व्याप्ती असणार आहे.
 
 
राजकीय संघर्षांची परिणीती आता हिंसेत होऊ लागली आहे. भाजप विरूद्ध महाविकास आघाडीतील संघर्षांवरून हे अधिक गडदपणे अधोरेखित झाले आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसे पाहता?
 
 
अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात यापूर्वीही घडलेल्या आहेत. छगन भुजबळ हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना एका प्रकरणात त्यांच्या घरावर झालेला हल्ला शिवसेनेने केला होता, हे उघड आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेला हिंसाचार कुणी घडवून आणला होता? अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. आपल्या गैरप्रकारांना पाठीशी घालण्यासाठी जातीयवाद आणि हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्यांच्यावर झालेली टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आणि भाजप नेत्यांवर झालेली टीका म्हणजे काहीच नाही, असा दुहेरी न्याय या सरकारकडून लावला जात आहे. भाजपने कधीही कुठल्याही प्रकारच्या राजकीय हिंसेचे समर्थन केलेले नाही आणि अशा प्रकारच्या हिंसात्मक विरोधामुळे भाजप कदापि मागे हटणारदेखील नाही.
 
‘पोलखोल अभियाना’वर झालेल्या हल्ल्यामुळे या अभियानाच्या नियोजनात काही बदल होणार आहे का?
 
 
हिंसेच्या अशा कितीही घटना घडल्या, तरी भाजपवर त्याचा काहीही फरक पडणार नाही. जर, फरक पडलाच, तर आमचे हे अभियान अधिक जोमाने आणि त्वेषाने पुढे जाईल. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कुठल्याही परिस्थितीत देशासाठी आणि पक्षासाठी काम करण्यासाठी सदोदित तयार आहे. त्यामुळे असे कितीही हल्ले झाले, तरी आमच्या मनसुब्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नसून, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरूद्धची आमची लढाई, अशीच चालू राहाणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@