चित्रकार रोकडे सरांची चिरतरुण व्यक्तिचित्रणे ज्येष्ठ चित्रकार प्रा. मुरलीधर रोकडे सरांची कलाक्षेत्रातील विविध कलाप्रकारांमध्ये रोकडी हुकूमत आहे. निसर्गचित्रणातील नैसर्गिकता ते फार चपखलपणे चितारतात. ‘पोट्रेट’ म्हणजे व्यक्तिचित्रणातील भाव ते इतक्या अचूकपणे टिपतात की, समोर खरोखर संबंधित व्यक्तीच बसलेली आहे का, इतका थक्क करणारा हुबेहूबपणा ते त्यांच्या ‘कॅन्व्हास’वर साकारतात. त्यांच्या रंगातील विशुद्धता आणि आकारातील आदर्शरचनाबंध यामुळे त्यांचे ‘कम्पोझिशन’ हे निव्वळ अप्रतिम असते!
आपण आपल्या कलास्तंभात यापूर्वी विविध कलाशैली आणि तंत्राचा अवलंब करणार्या दृश्यकलाकारांच्या कलाशैलीतील कलाकृतींबाबत लिहिले आहे. त्या त्या कलाकाराच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. खूपवेळा, हा स्तंभ वाचणार्या जागृत वाचकांकडून खास फोनवरून लेख आवडल्याबद्दलचे अभिप्राय येतात. सर्वसामान्य कलारसिकाला रुचेल-आवडेल, समजेल आणि मुख्य म्हणजे वाचावेसे वाटेल अशा स्वरुपात हा स्तंभ सजलेला असतो. आमचे एक सहकारी कलाध्यापक कृष्णा पुलकुंडवार म्हणाले की, “कलाक्षेत्रातील त्यांच्या मित्रांना चिंतन वा वैचारिकतेवर आरुढ झालेले लिखाण वाचायला आवडते.” त्यांच्या दृष्टीने ते खरेही असेल. परंतु, या स्तंभाचा उद्देशच हा आहे की, सर्वसामान्य कलारसिक वाचकांना, कलेबद्दल रुची वाढावी, कलाकृतीचं रसग्रहण वाचताना रसास्वाद मिळावा, गंभीर किंवा सहज आकलन न होणारे शब्दप्रयोग जणू ‘अॅब्स्ट्रॅक’च! आजच्या लेखाचे नायक ज्येष्ठ चित्रकार प्रा. मुरलीधर संभाजी रोकडे यांची वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रणे पाहिल्यावर रंगलेपनातील प्रगल्भता विशुद्ध रंगांच्या अचूक योजना आणि रंगमिश्रणातील अनुभव थक्क करणारा आहे.
नाशिक येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य वासुदेव गोविंद कुलकर्णी यांची ‘रंगीत तालीम’ त्यांना लाभली. प्रा. वा. गो. कुलकर्णी सर हेदेखील नाशिकच्या कलासंस्कृतीतील एक ‘आयकॉन’च आहेत. त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. पुढे चित्रकार मुरलीधर संभाजी रोकडे यांनीच नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयाच्या प्राध्यापक वा प्राचार्यपदाची धुरा तब्बल 35 वर्षे सांभाळली. अध्यापन आणि अध्ययन म्हणजे चंद्र-सूर्य स्वर मानणार्या प्रा. रोकडे सरांच्या कलाप्रवासात विविध ज्येष्ठ चित्रकारांच्या ‘पॅलेट’चा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. ज्येष्ठ चित्रकार एम. आर. आचरेकर, विश्वनाथ सोलेगावकर, शंकर पळशीकर, वि. ना. ऊर्फ दादा आडारकर, माधव सातवळेकर, बाबुराव सडवेलकर, शिवाजी तुपे अशा स्वतंत्र कला इतिहास रचणार्या व्यक्तिमत्त्वांना चित्रकार रोकडे सर यांना जवळून पाहण्याचा लाभ झाला.
रोकडे सरांची कलाक्षेत्रातील विविध कलाप्रकारांमध्ये रोकडी हुकूमत आहे. निसर्गचित्रणातील नैसर्गिकता ते फार चपखलपणे चितारतात. ‘पोट्रेट’ म्हणजे व्यक्तिचित्रणातील भाव ते इतक्या अचूकपणे टिपतात की, समोर खरोखर संबंधित व्यक्तीच बसलेली आहे का, इतका थक्क करणारा हुबेहूबपणा ते त्यांच्या ‘कॅन्व्हास’वर साकारतात. त्यांच्या रंगातील विशु द्धता आणि आकारातील आदर्शरचनाबंध यामुळे त्यांचे ‘कम्पोझिशन’ हे निव्वळ अप्रतिम असते! या त्यांच्या द्विमितीय कला प्रकारांसह त्यांना त्रिमितीय म्हणजे शिल्पाकृती साकारण्यात अधिक रुची असल्यामुळे त्यांची प्रत्येक त्रिमित कलाकृतीदेखील सौंदर्यांभिरुचीचा मूर्तिमंत आविष्कार ठरते.
सातत्य, नियमितपणा, वक्तशीरपणा आणि सतत ते कलासाधना करीत असतात. काळ, वेळ आणि बंधनांना आदरभावाने स्थान देऊन त्यांच्या कलाकृती सजतात. त्यामुळे त्या चिरकाल स्मरणात राहतात. व्यक्तिचित्रणे ही अशी एक स्वतंत्रशैली आहे. या शैलीतील कलाकृती सर्वांनाच आवडतात, समजतात. डोक्याला वा कल्पनाशक्तीला ताण द्यावा लागत नाही. मग अनुभवी कलासाधकाने चितारलेल्या व्यक्तिचित्रणाचे रसग्रहण करायला शब्दच कमी पडतात.
बर्याचदा ‘ऑईल रंग’माध्यमातून काम करताना ‘ऑईल बेस’ आणि ‘ओपेक बेस’ अशा दोन रंगलेपन प्रकारांपैकी एका पद्धतीने काम केलले असते. यापैकी ‘ऑईल बेस’ने काम म्हणजे रंगलेपन असेल, तर चित्रकाराला रंगद्रव्यांची मिश्रणे ‘कॅन्व्हास’वर लेपायला ‘ऑईल’मुळे खूप सुलभ होते. रंगाचे स्तर/थर पार पातळ असतात. परंतु, अशा रंगलेपनामुळे कलाकृती ही अल्पायुषी ठरते. रंगाची ओळख फार काळ टिकत नाही. परंतु, ‘ओपेक बेस’ रंगलेपन शैलीत रंगद्रव्यांचे प्रमाण अधिक असते आणि ऑईलचे प्रमाण फारच अत्यल्प म्हणजे गरजेपुरते असते. अशा पद्धतीत ‘कॅन्व्हास’वर रंगलेपन करताना अक्षरश: कौशल्याचा कस लागतो. जाड स्तरांमध्ये/थरांवर थर रंगलेपन केले जात असल्यामुळे ‘कॅन्व्हास’ची जाडी वाढते. अशा पद्धतीने रंगलेपन केल्यामुळे कलाकृतीचे आयुष्य दीर्घ बनते. वर्षानुवर्षे या कलाकृती अबाधित राहतात. ‘ऑईल’चे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे म्हणजे दोन किंवा अधिक रंगद्रव्य एकमेकांत एकत्रित करताना पुरतेच ‘ऑईल’ वापरत असल्यामुळे कालौघात ‘ऑईल’ नष्ट होते. ‘कॅन्व्हास’वर केवळ रंगद्रव्यांचेच लेपन दिसते. अशा कलाकृती अनेक वर्षांनंतरही, अगदी कालपरवा चितारल्यासारख्या दिसतात. या पद्धतीची चित्रकारी रोकडे सरांची असल्यामुळे त्यांची व्यक्तिचित्रणे ही ‘फ्रेश’ भासतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणातील भाव हे जीवंत वाटतात. त्यांचे निसर्गचित्रण जीवंत वाटते.
‘व्यक्तिचित्रण’ या कलाप्रकाराचे सामाजिक क्षेत्रात फार महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या आदराने व्यक्तिचित्रण असलेल्या कलाकृतीचे अनावरण केले जाते, त्या आदराने, सदर कलाकृती चितारणार्या कलाकारांचा सन्मान केला गेलाच, तर तो फक्त औपचारिकता म्हणून केला जातो. ही या कला संस्कृतीची वेदना आहे. अश्वत्थाम्याच्या मस्तकावरील जखम जशी भळभळते आहे, असे महाभारतात कथन केले आहे. त्यापेक्षा वेगळी जखम या आधुनिक महाभारतातील दृश्यकलाकारीची नाही. वर्षानुवर्षे कलाकारांच्या उरातील जखम ही अव्याहतपणे भळभळत आहे.
आपल्या महाराष्ट्रापुरताच विचार करायचा झाल्यास अनेक वयोवृद्ध दृश्यकलाकार या ओल्या दुखण्याच्या जखमा घेऊन वावरत आहेत. त्यांच्या कलासाधनेचा उचित सन्मान तर सोडाच, त्यांच्या कलाकृतींनादेखील कथित राजकारणाच्या गर्ततेला सामोरे जावे लागते.
ज्येष्ठ चित्रकार रोकडे सर यांच्या प्रदीर्घ कलासाधनेचा आणि त्यांच्या अनुभवाचा उचित सन्मान ज्या प्रमाणात व्हावयास हवा होता तसा झाला नाही, ही त्यांची नव्हे, तर समस्त कलाजगताची खंत आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतींना प्रोत्साहन मिळवले, तर त्यांच्या प्रतिभाशक्तीतून आणखी अद्भुत कलाकृती जन्म घेतील.
रोकडे सरांनी चितारलेले, स्व. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चितारलेले तैलचित्र नाशिक येथील ‘भोंसला मिलिटरी स्कूल’ येथे उपलब्ध आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यावेळी रोकडे सरांचा सत्कार करण्यात आला. रोकडे सरांना विविध क्षेत्रांतील नामवंतांची ५० तैलचित्रे चितारलेली आहेत. नाशिकच्या सांस्कृतिक कला इतिहासात या ५० व्यक्तिचित्रणांचा सन्मानाने उल्लेख करावाच लागतो. कलासाधकाचा उत्साह हा पराकोटीचा असतो. खास लंडन येथे २०१० साली जाऊन त्यांनी मोनालिसाचे मूळ पेेन्टिंग पाहण्यासाठी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी विविध पाश्चात्य म्युझियम्सना भेटी दिल्या होत्या. त्यांच्या अध्यापकीय कार्याव्यतिरिक्त त्यांनी नाशिकच्या ‘गावकरी’च्या ‘रसरंग’ मासिकांत त्यांनी अनेक वर्षे ‘इलस्ट्रेटर’ (रेखांकनकार) म्हणून काम केलेले आहे.
त्यांनी चितारलेल्या व्यक्तिचित्रणांमधील काही सुप्रसिद्ध कलाकृतींपैकी पं. विष्णू नारायण भातखंडे, खाँसाहेब मनजी खान घंडी बझार, श्यामभाऊ कुरुंदगोलकर उर्फ स्वामीगंधर्व किराणा, बालकृष्णा बुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा महाले, जयपूर, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ. किराणा, खाँ. मुस्ताक हुसेन, खाँ रामपूर खाँसाहेब बडेगुलाम अलीखाँ, पं. ए. व्ही. पलुस्कर अशा अनेक नामवंतांची व्यक्तिचित्रणे रोकडे सरांनी चितारलेली आहेत. त्यांच्यासह त्यांच्या कुंचल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो. त्यांचे ‘रंगपॅलेट’ चिरतरुण राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
८१०८०४०२१३
- प्रा. डॉ.गजानन शेपाळे