पालघर साधू हत्याकांड : सीसीटीव्हीत कैद झालेल्या 'त्या' आठ जणांचा जामीन फेटाळला

    02-Apr-2022
Total Views | 645
palghar

मुंबई : पालघर साधू हत्याकांडात घटनास्थळी आठ जणांच्या हातात शस्त्र असल्याचे किंवा हत्येला प्रवृत्त केल्याचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणातील सर्वांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला. उर्वरित १० जणांची जामीनावर सुटका करण्यात आली. पालघरमध्ये साधूंची जमावाने निर्घृण हत्या केली. यात कल्पवृक्ष गिरी (वय ७०), सुशील गिरी (वय ३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (वय ३०) या तिघांचा मृत्यू झाला होता.

न्या. डांगरे म्हणाल्या, "ज्या १० जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यांच्या हातात हत्यारे असली तरीही त्यांनी याचा वापर केला का हे पोलीस तपासात स्पष्ट होत नाही. उर्वरित आठ जण मारहाण करत होते किंवा मारहाणीसाठी प्रवृत्त करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यामुळे या आठ जणांचा जामीन अर्ज नाकारण्यात येत आहे."

या प्रकरणात राजू गुरूड, विजय पीलेना, रिशा पीलेना, दीपक गुरूड, सीताराम राठोड, विजय गुरूड, रत्ना भवर, ईश्वर निकोळे, फिरोज साठे, मोहन गावित आदींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर राजल गुरूड, महेश गुरूड, लहान्या वाळेकर, संदेश गुरूड, हवासा साठे, भाऊ साठे, रामदास राव आणि राजेश राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. राजेश आणि रामदास राव यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे पुरावे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. तसेच साक्षीदारांनीही दोघांची ओळख पटवली आहे.

"मृत साधूंवर दगडफेक केल्याच्या घटनेतून दोघांची भूमिका स्पष्ट होते की, राजेश राव याने मृत कल्पवृक्ष गिरी महाराजांवर काठ्यांनी हल्ला केल्याची नोंद पंचनाम्यात आहे. आरोपांच्या गांभीर्याचा विचार करत हा जामीन अर्ज नाकारण्यात येत आहे.", असेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, जामीन मंजूर झालेल्या सर्वांना २५ हजारांच्या जातमुचल्यावर सोडण्यात आले आहे. परंतू, या प्रकरणाचा सर्व सुनावण्यांना त्यांची उपस्थिती बंधनकारक आहे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121