लोककला जपण्यासाठी झटणारा विवेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2022   
Total Views |

vivek
 
 
ठाणे जिल्ह्यातील संपूर्णपणे लोककलेला वाहिलेल्या ‘यशराज कला मंच’ या एकमेव संस्थेचेसंस्थापक विवेक ताम्हनकर यांच्या कलाक्षेत्रातील प्रवासाविषयी आज जाणून घेऊया...
 
लोककला म्हटली की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ती फक्त लावणी. पण लोककलेतसुद्धा विविध प्रकार आहेत. सध्या लोककलेचे स्वरूप बदलत चालले असून ती तिच्या मूळ स्वरूपात सर्वांसमोर राहावी, यासाठी कायम प्रयत्नशील असणारे डोंबिवलीतील लोककलाकार विवेक विनायक ताम्हनकर यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
 
विवेक यांचा जन्म कोल्हापूरमधील कुरुंदवाड या लहानशा गावात झाला. त्यांचे संपूर्ण बालपण डोंबिवलीत गेले. त्यांचे शालेय शिक्षण सुरुवातीला डोंबिवलीतील पांडुरंग विद्यालयात झाले. तिसरीपासून त्यांनी डोंबिवलीतील टिळकनगर शाळेत प्रवेश घेतला. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी जोंधळे कनिष्ठ महाविद्यालयातून घेतले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन विषयांत पदवी घेतली. पण त्यांना इतिहासाचीही आवड होती. त्यामुळे इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी त्यांनी मुंबई विद्यापीठातून पुन्हा इतिहास या विषयात पदवी संपादन केली. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर ‘करिअर’च्या दृष्टिकोनातून त्यांनी ‘बीपीएड’चे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वडाळा येथील शारीरिक शिक्षण मंडळातून त्यांनी ‘बीपीएड’चे शिक्षण घेतले. १९९७-९८ च्या दरम्यान डोंबिवलीतील ‘चंद्रकांत पाटकर विद्यालया’त शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. सात वर्षांपूर्वी त्यांना आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी एमएचे शिक्षण पूर्ण करण्याचा विचार मनाशी पक्का केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी मराठी विषय घेऊन पदव्युत्तर पदवी संपादन केली. संत साहित्याचे आकर्षण असल्याने त्यांनी एमएसाठी मराठी विषयाची निवड केली. सध्या ते ‘पीएचडी’ करीत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासींची लोकनृत्ये : त्यांचे उपयोजन आणि प्रयोजन व आताचे सादरीकरण’ हा विषय निवडला आहे.
 
विवेक ताम्हनकर यांना ‘पद्मश्री’ शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात काम करण्याची संधी चालून आली. त्यामध्ये त्यांना संतोष पवार, भरत जाधव यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. विवेक यांनीदेखील त्या संधीचे सोनेच केले. जवळजवळ २३ ते २४ वर्षे त्यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात नृत्य व गायक कलाकार म्हणून सहभाग होता. यानिमित्ताने त्यांनी अनेक दौरे केले. अगदी मॉरिशसलादेखील आपल्या लोककलेचा झेंडा फडकवला. विवेक यांनी १९९७ ला ‘यशराज कला मंच’ या संस्थेची स्थापना केली. संपूर्णपणे लोककलेला वाहिलेली ही ठाणे जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून लोकनृत्य शिबीर घेणे, लोकसंगीत आणि लोकवाद्य शिकविणे, नृत्याबरोबरच शंख आणि तुतारीदेखील या माध्यमातून शिकविली जाते. तुतारीवादक पांडुरंग गुरव हे विद्यार्थ्यांना तुतारीचे प्रशिक्षण देतात. लोककला जीवंत राहावी, यासाठी विवेक यांच्या ‘यशराज कला मंच’च्या माध्यमातून अनेक कार्यक्रमही घेतले जातात. त्यामध्ये ‘लोकउत्सव महाराष्ट्राचा’, ‘हिंदुस्थान के लोकरंग’, ‘रंग शाहिरी’चे यांचा समावेश होतो. त्यात अनेक प्रबोधनगीतांचाही समावेश असतो. लहान मुलांसाठी ‘नृत्यांकुर’ हा कार्यक्रम घेतला जातो. जेणेकरून लहान मुलांना सादरीकरणातील बारकावे लक्षात यावेत, हा त्यामागील हेतू असतो. बालगीत, लोकगीत असे लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम होत असतात. ‘हे तर देवाघरचं देणं’ या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विवेक यांनी सांगितले.
 
विवेक ताम्हनकर चंद्रकांत पाटकर विद्यालयात मुलांना शारीरिक शिक्षणाचे धडे देत असल्याने त्यांना त्यांचे भावविश्व माहीत होते. त्यामुळे मुलांसाठी बालनाट्य बसविण्यासही त्यांनी सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी स्वतः अनेक बालनाट्ये लिहिली व दिग्दर्शित केली. त्यातीलच संस्कारक्षम बालनाट्य ‘आई-बाबा हरवले’, ‘फिनिक्स : द कॉमन मॅन’, हिंदी बालनाट्य ‘एकलव्य’ यांचा खास उल्लेख करता येईल. या नाटकांचे त्यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले आहेत. तसेच पुणे, ओडिशा, आग्रा, जयपूर याठिकाणीही नाटके स्पर्धेत सादर केली गेली आहेत. विवेक यांच्या संस्थेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज कलाक्षेत्रात चमकताना दिसतात. त्यात ‘एकापेक्षा एक’ या शोमधील स्नेहा चव्हाण, विविध मराठी मालिकांमधील अभिनेत्री शाल्मली टोळे असे अनेक कलाकार सांगता येतील. ‘नृत्यांकुर’ कार्यक्रमात स्नेहा वासुदेवाची भूमिका वठवत असे. शाल्मली वाघ्यामुरळी नृत्य करत असे. लोककला कशी आहे, ‘तारपा’ नृत्य हे म्युझिकवर करायचे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विवेक यांच्या अकादमीतून विद्यार्थ्यांना मिळतात. मंचावर लोककला आकर्षक वाटण्यासाठी त्यात काही बदल केले, तरी मुलांना तिचे मूळ स्वरूप कसे आहे, हे माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी विवेक सतत प्रयत्नशील असतात. लोककलेसाठी एखादी वास्तू तयार होण्याची गरज आहे. जेणेकरून सर्व ज्येष्ठ लोककलावंत एका ठिकाणी येतील. एखाद्या संस्थेला सभागृहाचे भाडे परवडत नाही त्यामुळे वास्तू असावी. लोककलेची पुस्तके असलेले ग्रंथालय असावे, अशी विवेक यांची इच्छा आहे.
 
लोककलावंत प्रसिद्धीपासून नेहमी लांब राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी संस्थेकडून ‘लोकगौरव पुरस्कार’ दिला जातो. अशा या हरहुन्नरी लोककलाकाराला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@