यशोगाथा प्रदूषणमुक्त बिन्दुसागाराची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2022   
Total Views |

 


B1


आज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मूलभूत प्रश्र्नांची यशस्वीरीत्या उकल करत आहोत. असेच एक जलशुद्धीकरणाचे नवतंत्रज्ञान 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी' (आयसीटी) आणि 'इंडिया ऑईल कॉर्पोरेशन' (आयओसी)च्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ओडिशा येथील भुवनेश्र्वरमधील बिन्दुसागर तलाव जलप्रदूषणमुक्त करण्यात यश आले आहे. तेव्हा, या तंत्रज्ञानाविषयी आणि अशाच पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेणाऱ्या 'ग्रीनशिफ्ट एनर्जी' या कंपनी विषयी माहिती देणारा हा लेख. 


पायाभूत सुविधा आणि विकासाच्या नावाखाली मोठमोठाली धरणे मानवाने उभी केली. मात्र, घसरती भूजल पातळी आणि जलप्रदूषणाच्या समस्यांनी कालांतराने भारतात भीषण रुप धारण केले. प्रक्रिया न केलेल्या औद्योगिक सांडपाण्यामुळे, नदी-तलावांतील कचऱ्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषणही दिवसेंदिवस वाढत गेले. एका आकडेवारीनुसार देशभरात ८६ जलस्रोत गंभीरपणे प्रदूषित आहेत. नागरी सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया हे या जलप्रदूषणाचे मुख्य स्रोत. मुंबईचा विचार करता मिठी, पोयसर, ओशिवरा नद्यांपासून ते पवई तलावही जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. पवई तलावात निळ्या-हिरव्या शेवाळ्यामुळे, तसेच 'हयासिंथ' या जलपर्णीमुळे जीवसृष्टीचे प्रचंड नुकसान होताना दिसते. तसेच पवई तलावातील नैसर्गिक परिसंस्थेचे नुकसान होऊन मासेही मृत्युमुखी पडले आहेत. यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने मगरींचा अधिवास असलेल्या पवई तलावातील 'हायसिंथ' (जलपर्णी) वर ग्लायफोसेटची फवारणीही केली होती. ही ग्लायफोसेटयुक्त तणनाशके तलावातील जलपर्णीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जातात. परंतु, 'ग्लायफोसेट'मुळे तलावातील इतर वनस्पती, जलचर आणि सूक्ष्मजीवांचे अस्तित्व धोक्याचे येते, असाही एक मतप्रवाह पर्यावरणवाद्यांमध्ये पाहायला मिळतो.

 

 
B2


 अशीच काहीशी परिस्थिती ओडिशामधील भुवनेश्वर येथील बिन्दुसागर तलावाची. शहरातील हा सर्वात मोठा तलाव प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जलप्रदूषणाच्या गर्तेत अडकला. या तलावातील जलकुंभ संरक्षित करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने या तलावाचे गटारातच रुपांतर झाले. तसेच या तलावात कचरा टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी स्थानिकांनी यापूर्वी बरेचदा प्रयत्नही केले होते. परंतु, त्याचा फारसा काही परिणाम दिसून आला नाही. स्थानिक प्रशासनाने तलावाजवळ पहारेकरी तैनात करावेत आणि जलसाठा प्रदूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी होती. कारण, या दूषित तलावामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता. शिवाय तलावाचा जल्रसोत प्रदूषित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत असणाऱ्या तलावाच्या आजूबाजूच्या विहिरीही दूषित झाल्या. परंतु, स्थानिक प्रशासनाने या तलावाच्या जलसंपदेचे गांभीर्य ओळखून त्यावर रसायनमुक्त पद्धतीने उपाययोजनेचा मार्ग अवलंबला आहे.
  
B3
 

ओडिशा सरकारने २०२० साली जूनमध्ये या संदर्भात 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी' (आयसीटी) आणि 'इंडिया ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) यांच्याशी करार केला होता. 'आयसीटी' चे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला असून 'हायड्रो-डायनॅमिक कॅव्हिटेशन' तंत्रज्ञानाद्वारे या पवित्र तलावाची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्या अंतर्गत राज्य सरकार 'ओडिशा कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या माध्यमातून पायाभूत सुविधांची मदत केली असून 'आयसीटी' आणि 'आयओसी' तर्फे पंप बसवण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण आणि शुद्धीकरण करण्याकरिता अतिवेगवान कृत्रिम ध्वनीलहरींचा उपयोग केला जातो. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असून तलावातील पाणी टप्प्या-टप्प्याने पाईपद्वारे शोषून घेतले जाते. त्यानंतर यंत्रणेद्वारे पाण्यात पोकळ्या निर्माण करून अतिवेगवान कृत्रीम ध्वनीलहरींचा मारा केला जातो. ज्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी उपयुक्त वातावरण तयार होते, दुषितकण वेगळे होतात आणि पाणी शुद्ध होते.

  
B4
 
 

कोल्हापूर येथील रंकाळा तलावात देखील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 'आयसीटी'च्या माध्यमातून हायड्रो-डायनॅमिक कॅविटेशन' तंत्रज्ञान पूर्ण कार्यक्षमतेने वापरले गेले. 'स्वच्छ भारत' अभियानाचा तो एक उपक्रम होता. या उपक्रमाच्या परिणामांवरून असे दिसून आले की, हे मशीन दिवसातून आठ तास कार्यान्वित केल्यानंतर सुमारे तीन आठवड्यात पाण्याचा रंग हिरवट ते निळसर राखाडी झाला. 'ग्लायफोसेट' सारखे कुठलेही रासायनिक घटक न वापरता, पाण्यामधून येणारी दुर्गंधीदेखील एका आठवड्यात पूर्णपणे बंद झाल्याचे 'ग्रीनशिफ्ट एनर्जी' चे कुणाल गोडांबे सांगतात.

 
 
B5
 
'ग्रीनशिफ्ट एनर्जी' ही मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया करणारी एक कंपनी आहे. प्रभावी आणि समावेशक तंत्रज्ञान विकसित करुन कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे या कंपनीचे उद्दिष्ट. 'ग्रीनशिफ्ट एनर्जी' कंपनी असे मानते की, कचरा प्रक्रिया हे एक बहुविध कार्य आहे. त्यासाठी कचऱ्यातील वेगळे करण्याजोगे घटक ओळखण्यासाठी कचऱ्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केले जाते. कचऱ्यातील अनेक घटक वेगेळे केले, तर त्याचे बहुमोल संसाधनांमध्ये रुपांतरीत केले जाऊ शकतात. तसेच ही प्रक्रिया पर्यावरण पूरक देखील असते. उदाहरणार्थ, खाद्यान्नाच्या कचऱ्यामध्ये स्टार्च असते. ज्याचे मूल्यवर्धित रसायनांमध्ये रूपांतर करता येते. कृषी प्रक्रियेतील मळी आणि इतर जैविक टाकाऊ पदार्थ विविध नूतनीकरणीय साहित्य जसे की 'बायोमास ब्लॉकस' आणि इतर जैविक रसायनांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. खत निर्मिती दरम्यान तयार होणाऱ्या 'लीचेट' या घन-द्रव्यावर प्रक्रिया करून शेती उपयुक्त खत निर्माण केले जाऊ शकते. तसेच प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे फळे किंवा मणी तयार करता येतात. यांचा उपयोग बांधकाम क्षेत्रात भराव टाकण्याकरिता उपयोग केला जाऊ शकतो. आज आपल्याकडे विविध स्त्रोतातून आलेल्या कचऱ्यावर पर्यायी प्रक्रिया आहेत.

B7 
 
औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणार्या कचऱ्याचे योग्य विघटन करून त्याचा पुनरुपायोगावर भर दिली पाहिजे. कचरा व्यवस्थापनाच्या पलीकडे जात, कचऱ्याचे योग्य मूल्यमापन करून पुनर्वापर करण्यावर भर द्यायला हवा. असेच कचरा प्रक्रिया व जलस्रोतांच्या पुनरुज्जिवनाच्या प्रक्रियेत नवनवीन प्रयोग आणि संकल्पना घेऊन आपण महाराष्ट्रातही जलस्रोत शुद्धीकरण करू शकू, असा विश्वासही 'ग्रीनशिफ्ट एनर्जी'च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ प्रशासनानेच नाही, तर सामान्य नागरिकांनीही आपला परिसर, स्वच्छ, सुंदर राखण्याची जबाबादारी वेळीच ओळखून त्यासाठी पुढाकार घेणेही तितकेच आवश्यक आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@