अवघा रंग एकचि झाला... रंगी रंगला विठ्ठल...!!

    16-Apr-2022
Total Views |

चित्र
 
 
निसर्गदेवतेची मूर्तिमंत रुपदर्शनाची वर्णनही त्या कवितांच्या नंतर चित्रकार विठ्ठल हिरेंच्या कुंचल्यातून तशीच्या तशी प्रकटलेली भासतात. त्या कवितांची गेयता आजही अबाधित आहे, तद्वत विठ्ठल हिरे यांच्या निसर्ग कलाकृती ताज्या टवटवीत आहेत.
 
 
चित्र व शिल्पकारांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या, मुंबईच्या जहांगिर कलादालनात, कलाक्षेत्रातील साक्षात् विठ्ठलाच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन सुरू होत आहे. श्रीगणेशाच्या अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर दि. १९ एप्रिलला जहांगिरमध्ये रंगांची देवता असलेल्या श्रीगणेशाच्या शुभ तिथीला रंगांना पैलू पाडून हिर्‍यांच्या किमतीहून कुठेही कमी नसणारे ‘लॅण्डस्केप्स’ पाहण्याची पर्वणी आहे.
 
 
वय अवघे ८१... रंगाच्या फटकार्‍यांची गती पाहिली, तर विशीतल्या जिम्नॅशियमला जाणार्‍या तरुणालाही लाजवेल, अशा या रंगयोगी, व्रतस्थी कलाकाराचा जणू सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे हे प्रदर्शन होय. ज्येष्ठ चित्रकार विठ्ठल हिरे यांच्या नियमित आणि सतत सुरु असलेल्या जलरंग आणि तैलरंगांतील कलाकृती ‘जहांगिर’च्या दुसर्‍या कलादालनात पाहण्याची संधी आहे.
धोंड मास्तरांच्या जलरंगी ‘फ्लो’ने ज्यांना भुरळ घातली आणि खानदेशापासून तर दादरच्या ‘मॉडेल’पर्यंत कलाप्रवास करत रंगविषयक पुस्तकांनाच गुरुस्थानी मानून ‘निसर्गचित्रकार’ अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या चित्रकार विठ्ठल हिरे यांना भ्रमणध्वनीवरुन ऐकताना फार आश्चर्य आणि समाधानही वाटले. कलाक्षेत्रात नुकत्याच येणार्‍या एखाद्या ज्ञानपिपासू विद्यार्थ्याने जसे वागावे, बोलावे, असे ध्यानात येते, तद्वतच चित्रकार हिरे यांच्या बोलण्यातील विद्यार्थीपण जाणवत होते. खूप वर्षांनी फोनवरून का होईना, परंतु, हिरे सरांशी बोलताना अनुभव येत होता. वय हे शरीराचं वाढतं. मनाला जर तरुण ठेवायचं असेल, तर ज्येेष्ठ चित्रकार हिरेंचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावं. त्यांचं मन हे निसर्गानुसार दिनक्रम राबवितं म्हणून त्यांचं प्रत्येक ‘लॅण्डस्केप’ वा निसर्गचित्र ही एक स्मृतिप्रवण कलाकृती बनते. या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते. चित्रकार हिरे यांच्या जलरंगातील ‘लॅण्डस्केप्स’चा प्रवास हा तैलरंगातील कलाकृतीपर्यंत येऊन स्थिरावला आहे. जलरंगातील गोल आणि सपाट ब्रशच्या प्रभावातून जलरंगी ‘फ्लो पॅच’, ‘बोल्ड पॅच’ आणि रंग मिश्रणातील जादुई बदल याद्वारे शृंगारलेली प्रतिसृष्टी पाहताना होणारी रसिकमनाची दिड्.मूढता-भावसमाधी संपते न संपते तोच नाईफ आणि तैलरंगसाठीच्या कुंचल्यातून प्रकटणारे तैलरंगी मिश्रणाकार, त्यातून प्रकटणारे निसर्गदत्त सृष्टीसौंदर्य हे कवीच्या कवितेतून प्रकटलेल्या शब्दचित्रांपेक्षा कुठेही कमी नसतं.
 

चित्र ,
 
 
‘रंगरंगुल्या सान सानुल्या... गवत फुला रे गवतफुला...’ किंवा ‘पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर... वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर...’ अशी निसर्गदेवतेची मूर्तिमंत रुपदर्शनाची वर्णनही त्या कवितांच्या नंतर चित्रकार विठ्ठल हिरेंच्या कुंचल्यातून तशीच्या तशी प्रकटलेली भासतात. त्या कवितांची गेयता आजही अबाधित आहे, तद्वत विठ्ठल हिरे यांच्या निसर्ग कलाकृती ताज्या टवटवीत आहेत.त्यांच्या कलाकृतींचे शब्दांतीत वर्णन आहे. निखळ सौंदर्य हे पाहण्यात जितका आनंद मिळतो, त्यांची अनुभूती ही शब्दातील असते.
 
 
त्यांच्या चित्राकृतींचं वैशिष्ट्य शोधायचं ठरविलं, तर ध्यानात येईल की, त्यांच्या चित्रातील दूरवरचा अगदी क्षितिजाला गवसणी घालणारा भाग हा जलरंगांतील ‘फ्लो’प्रमाणे तैलरंगातही आढळून येतो. ते रंगकाम हिरे सर बहुधा ब्रशनेच करीत असावेत. मात्र, जवळचे चित्रघटक यांना ते नाईफने आकृतिबद्ध करतात. ‘बोल्ड’ किंवा शुद्ध-गडद रंगांच्या मदतीने अन् ‘नाईफ’च्या ‘टेक्सचर’मुळे जवळचे चित्रघटक अधिक जवळ आलेले भासतात. ही भासमानतेची क्रिया ज्या कलाकाराला साधता येते, त्याला रंगांच्या दुनियेतील ‘क्रियायोगी’च म्हणावे लागेल. मग अगदीच तपशीलात जाताना सांगावेसे वाटेल की, एखाद्या कलाकृतीतील चित्रांचा ‘केंद्रघटक’ म्हणून असलेल्या घराजवळील झाड हे त्याच्या, तपशीलवार रंगलेपनाने जसे ओळखता येते, तसेच पुढील कुठल्यातरी कलाकृतीत चित्राचा ‘केंद्रघटक’ हा बदललेला तरी असणं आणि ‘झाड’ जरी दूरवर कुठेतरी दिसत असले, तरी त्याची ‘ओळख’ मात्र चुकत नाही. जसे की, लिंबाचे, बाभळीचे झाड, आंब्याचे झाड वगैरे हे जवळच्या आणि दूरच्या ठिकाणी ओळखता येऊ शकतात. त्यांचं रंगातील रूपडं साकारणं, हे त्या चित्रकाराच्या अनुभवावर आणि कौशल्यावर अवलंबून असतं. चित्रकार हिरेंच्या कुंचल्याला आणि ‘नाईफ’ला हिरेंच्या मनाचा ठाव घेण्याची कला आत्मसात झालेली असावी म्हणून, निसर्गातील चित्रविषय आणि चित्रघटक हे त्यांच्या कलाकृतीत स्वैर-तणावरहीत संचारत असतात अन् हे सर्व सुरू असताना ‘ते’ त्यांची (चित्रघटक) ओळख विसरत नाहीत, हे विशेष!
 
 

draw
 
 
अत्यंत ग्रामीण वातावरणात जळगाव जिल्हातील नगरदेवळा या गावी दि. १ जून, १९४१ ला जन्मलेले चित्रकार विठ्ठल हिरे यांनी १९७४साली ‘जी. डी. आर्ट’ (ड्रॉईंग अ‍ॅण्ड पेंटिंग) केले असून ते ‘आर्ट मास्टर’ अर्थात ‘एएम’ हा तत्कालीन कलाशिक्षकांना पदोन्नतीसाठी ‘अट’ म्हणून घातलेला अंशकालीन अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. खरंतर विठ्ठल हिरेंसारख्या, सुमारे५५ वर्षे सतत आणि सातत्याने रंगांची उपासना करणार्‍या कलाकाराच्या साधनेतून साकारलेल्या कलाकृती या संग्रही ठेवाव्यात अशाच आहेत. सध्याचे म्हणजे गेल्या दोन वर्षांत जागतिक कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कलाकृती पाहायला मिळणं, ही कलारसिक आणि कलासंग्राहक यांना पर्वणीच आहे. प्रचलित सर्व जुन्या-नव्या आर्ट संस्था, सोसायट्या, फाऊंडेशन्स आणि स्थानिक स्तरांवरील उपक्रम राबविणार्‍या कंपन्या... या सार्‍यांच्या संग्रहात विठ्ठल हिरेंच्या कलाकृती हिर्‍याप्रमाणेच चमकत आहेत. त्यांच्या कलाकृतींनाही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
 
 
अनेक प्रदर्शनांद्वारे त्यांच्या कलाकृतींनी कलारसिक मनाचा ठाव घेतलेला आहे. खासगी संग्राहकांनी त्यांच्या कलाकृती संग्रही ठेवण्यासाठी नियमित चढाओढीने स्पर्धात्मक बोलीनुसार विजयी भूमिका घेतलेल्या आहेत. या लेखाद्वारे कल्पक रसिक, वाचक, संग्राहक अशा सार्‍यांनाच सुचवावेसे वाटते की, चित्रकार विठ्ठल हिरे यांच्या दांडग्या५५ वर्षांच्या साधनेतून निर्माण झालेल्या कलाकृती या अमूल्यच आहेत. ज्यांना साक्षात हिर्‍यांचं कोंदण लाभलंय, अशा कलाकृती या मौल्यवान तसेच मूल्यवान असणारच. त्या रूपवान-सौंदर्यवान आणि जवान आहेत. स्वत: कलाकाराने त्यांचं प्रचलित व्यावसायिक मूल्य फारच नगण्य ठेवलेले असावे. कदाचित इतक्या वर्षांची तपश्चर्या करणार्‍या या कलायोग्याला ‘व्यवहारमूल्या’चे कौतुक ते काय असणार? म्हणून या प्रदर्शनातील त्यांच्या कलाकृती अगदी सर्वसामान्य कलारसिकाला खिशाला परवडणार्‍यादेखील आहेत. ९३२३३९१८९१ आणि ९७०२२५८२१८ या क्रमांकावर त्यांना संपर्क करता येईल. ८१ वर्षांच्या या चिरतरूण कलासाधकाच्या चिरंजीव कलाकृती संग्रही असाव्यात, असे वाटणार्‍या कलारसिकांची मानसिकता जपण्यासाठी थेट कलाकाराचाच संपर्क दिलेला आहे. त्यांच्या अधिकाधिक कलाकृती या लेखाच्या शृंगारात पाहता याव्यात, यासाठी शब्दांना मर्यादा घालतो. त्यांच्या कलाजीवनात आणि कला प्रवासास सुदृढ निरोगी दीर्घायुष्य लाभावे, ही दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराची आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खानदानी घट्ट वाचकांच्यावतीने ईश्वराकडे प्रार्थना.
 
 
 - प्रा. डॉ. गजानन शेपाळे