इंधनासाठीचे ‘क्रेडिट कार्ड’ किती उपयोगी?

    15-Apr-2022
Total Views | 82

credit
वाहनांत इंधन भरल्यानंतर पैसे रोख देण्याऐवजी ‘क्रेडिट’ किंवा ‘डेबिट कार्ड’ने देता येतात. ‘क्यूआर कोड’ने, ‘गुगल पे’ने तसेच ‘पेटीएम’ने असे पेट्रोल पंपावर पैसे भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय इंधनाचे पैसे भरण्यासाठी खास क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यांना ‘फ्यूएल बेस्ड क्रेडिट कार्ड’ असे संबोधिले जाते. त्याविषयी...
 
क्रेडिट कार्ड’ कंपन्या मग त्या ‘रुपे’ असो, ‘व्हिसा’ असो किंवा अन्य काही असोत, या कंपन्या, इंधन उत्पादक कंपन्या त्या म्हणजे ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (बीपीसीएल), ‘इंडियन ऑईल कॉर्पोेरेशन लिमिटेड’, ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एचपीसीएल) अशा कंपन्यांबरोबर ‘को-ब्रॅण्डेड’ कार्ड कार्यरत करतात. ज्या इंधन कंपनीबरोबर ‘क्रो-ब्रॅण्डेड’ कार्ड असेल त्या कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यास, कार्डधारकाला सवलती/फायदे मिळतात. या अशा प्रकारच्या बहुतेक कार्डवर, कार्डधारकांना ‘रिवॉर्ड्स’ दिले जातात. प्रत्येक वेळेस पेट्रोल भरताना, कार्डधारकाला ‘रिवॉर्ड्स’ मिळतात. असे बरेच ‘रिवॉर्ड्स’ एकत्र केल्यावर कार्डधारकाला काही लीटर इंधन मोफत मिळू शकते. उदाहरणच द्यायचे, तर ‘सिटी इंडियन ऑईल’ क्रेडिट कार्डवर, जर इंधन ‘इंडियन ऑईल’च्या पेट्रोल पंपावर भरले, तर १५० रुपयांच्या इंधन खरेदीवर चार ‘टर्बोे पॉईंट्स’ मिळतात. एक ‘टर्बो पॉईंट’ म्हणजे एक रुपया. एका ‘टर्बो पॉईंट’चे मूल्य एक रुपया. म्हणजे तुम्ही दहा हजार रुपयांचे इंधन भरले, तर तुम्हाला २६७ ‘टर्बो पॉईंट’ मिळणार. या २६७ ‘टर्बो पॉईंट’वर तुम्हाला ‘इंडियन ऑईल’च्या पेट्रोल पंपावर २६७ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार म्हणजे ३७.५ रुपयांच्या पेट्रोल खरेदीवर, एक रुपयाचे पेट्रोल/ इंधन मोफत मिळणार. याशिवाय या कार्डने तुम्ही स्वयंपाकासाठी लागणारे पदार्थ खरेदी केलेत, तसेच ’सुपर मार्केट’मध्ये खरेदी केली, तर वेगळे पॉईंट्स मिळणार.
 
वर्षाला जर तुमची कार साधारणपणे १५ हजार किलोमीटर धावत असेल आणि एक लीटर पेट्रोलवर साधारणपणे एक किलोमीटर कार धावत असेल, तर अशा ग्राहकाला १५०० लीटर पेट्रोल लागणार. सध्याचा पेट्रोलचा दर विचारात घेता १५०० लीटर पेट्रोलसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च येणार. अशा कार्डधारकाचा पेट्रोल खर्च महिन्याला १२ हजार रुपयांहून अधिक आहे. अशाला एका वर्षाला ४० लीटरपर्यंत पेट्रोल मोफत मिळू शकते. हा इंधनासाठीचे कार्ड घेण्याचा फायदा आहे. याशिवायही कार्डधारकांसाठी अन्य काही फायदे/सवलती उपलब्ध आहेत. जे वाहनांचा सतत वापर करतात किंवा स्वत:च्या वाहनानेच प्रवास करतात, अशांनी इंधनासाठीचे ‘क्रेडिट कार्ड’ घ्यायलाच हवे/वापरायला हवे. तसेच ज्या इंधन कंपनीचे ‘को-ब्रॅण्डेड कार्ड’ आहे, त्या कंपनीच्या पेट्रोल पंपावरच, पेट्रोल भरावयास हवे. याशिवाय या कार्डधारकांना ‘वेलकम बोनस’ व ‘माईल स्टोन बोेनस’ही मिळतो. इंधनावर जो ‘सरचार्ज’ आकारला जातो, तो ‘सरचार्ज’ही कार्डधारकांना भरावा लागत नाही वा न भरण्याची सवलत मिळते. काही कार्डांच्या बाबतीत महिन्याला किती सवलत दिली जाणार, याची कमाल मर्यादा ठरवितात. त्या मर्यादेपर्यंतच सवलती मिळू शकतात. हे रिवॉर्ड्स पेट्रोल पंपावरच वापरले पाहिजेत, असे नसते. अन्यत्रही कपड्याच्या दुकानात किंवा ‘डिपार्टमेंटल स्टोअर्स’मध्येही या ‘रिवॉर्ड्स’च्या सवलती घेता येऊ शकतात.
 
या कार्डासाठी भरावयाचे शुल्क फार कमी असते तसेच जर एका ठरावीक मर्यादेपर्यंत खरेदी केली, तर नूतनीकरणाच्या वेळी भरावयाच्या शुल्कात सवलत मिळू शकते. नवीन कार्ड देताना बहुधा शुल्क आकारले जात नाही. नूतनीकरणाच्या वेळी शुल्क आकारले जाते. सध्या कार असणे ही लोकांची गरज झाली आहे, तसेच या वाहनधारकांकडे इंधनासाठीचे कार्ड असणे, ही गरज निर्माण व्हावयास हवी.इंधनासाठीच्या कार्डावर इंधन खरेदीवरच ‘रिवॉर्ड्स’ मिळतात, हे कार्ड वापरून अन्यत्र खरेदी केली, तर ‘रिवॉर्ड्स’ मिळत नाहीत, ज्यांची पेट्रोल खरेदी नियमित आहे किंवा जास्त आहे, अशा ग्राहकांनी इंधनासाठीचे कार्ड घ्यावे, कोणीही कितीही कार्ड घेऊ शकतो. कार्ड बाळगण्यासाठी काही मर्यादा नाहीत. त्यामुळे इंधनासाठीचे एक व इतर खरेदीसाठीचे एक अशी दोन कार्ड बाळगावी. कधीतरी कार वापरणारे व जास्त वेळा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणार्‍यांनी इंधन वापरासाठीचे कार्ड प्रमुख कार्ड म्हणून वापरु नये. या ‘रिवॉर्ड्स’चा फायदा सर्व पेट्रोल पंपावर मिळत नाही, ज्या पेट्रोल पंपावर मिळतो, त्यांची यादी तुम्हाला माहीत हवी. जर ते पेट्रोल पंप तुमच्या रस्त्यात नसतील, तर तुम्हाला ‘रिवॉर्ड्स’चा वापर सहजपणे, योगरित्या व योग्यवेळी करता येणार नाही, ज्या कंपन्यांचे ‘रिवॉर्ड’वर सवलती देणारे पेट्रोल पंप तुमच्या नेहमीच्या रस्त्यावर आहेत, त्या कंपनीचेच कार्ड घ्या. इंधनासाठीचे ‘के्रेडिट कार्ड’ घेताना त्याचे वार्षिक शुल्क ‘रिवॉर्ड्स’चा दर, ‘रिडम्पशन’ अटी नियम, ‘को-ब्रॅण्डेड’चे फायदे व इंधनखरेदी शिवाय इतर खरेदीवर मिळणारे फायदे या सर्वांचा विचार करुन, कार्ड घ्यावे, कार्ड घेण्याचे व नूतनीकरणाचे शुल्क जास्त असेल, तर तुम्हाला मिळणार्‍या फायद्यांना काही महत्त्व राहणार नाही.
 
 
 - शशांक गुळगुळे
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121