जळगाव : "जेम्स लेन या लेखकाने त्याच्या 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात जे लिखाण केलं, त्यासंदर्भात बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरला केलेल्या भाषणात त्याचं कौतुक केलं होतं. जेम्स लेन हा चांगला शिवअभ्यासक आहे. असे बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते.", असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) जळगाव दौर्यावर असताना एका पत्रकार परिषदेत केला. तसेच शिवजयंतीचा मुद्दाही त्यांनी समोर आणत आणखी एक दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
"पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते.", असे वक्तव्य यापूर्वी शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पाठवलेल्या पत्रामुळे शरद पवार धादांत खोटं बोलत असल्याचे उघड झाले होते. मात्र शरद पवारांनी जळगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्याचं एकप्रकारे खंडन केल्याचं दिसत आहे.
"जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांच्याविषयी चुकीचा इतिहास मांडला आहे. त्यांच्याविषयी काही गलिच्छ मजकूर यात लिहिला गेला आहे. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरला केलेल्या भाषणात याच जेम्स लेनचं कौतुक केलं होतं. जेम्स लेन हा चांगला शिवअभ्यासक आहे, असे उद्गार बाबासाहेबांनी त्यावेळी काढले होते.", असे पवार यांचे म्हणणे आहे.
शिवजयंती; तारखेप्रमाणे... तिथीप्रमाणे....
शिवजयंती ही तारखेप्रमाणे करावी असे बाबासाहेबांनी त्यांचे मत यापूर्वी शासनाला कळवले होते. मात्र कालनिर्णयच्या जयंत साळगांवकरांना शिवजयंती ही तिथीप्रमाणे करावी असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे शिवभक्तांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी माफी मागितली असल्याचा आणखी एक दावा पवारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पवारांच्या या वक्तव्यावरून राज्यात पुन्हा एकदा गदारोळ उठण्याची चिन्हं उद्भवत आहेत.