मुंबई: शांतता क्षेत्र असूनही दररोज कर्णकर्कश भोंग्यांतून होणार्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याची कैफियत कुर्ला पूर्व येथील शाळांनी मंगळवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे मांडली. कुर्ला पूर्व येथे नेहरूनगर, कसाई वाडा या दोन मोठ्या वस्त्या आहेत. एका वस्तीत खासगी आणि दुसर्या वस्तीत महानगरपालिकेची शाळा आहे. या शाळांमध्ये जाणारे बहुसंख्य मराठी भाषिक विद्यार्थी आहेत. तसेच हिंदी आणि उर्दू भाषेतून शिकणारेही विद्यार्थी या शाळांमध्ये आहेत. पण, या शाळांच्या बाजूला असणार्या विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. शाळांमुळे हा परिसर शांतता क्षेत्र आहे. तरीही, याठिकाणी कर्णकर्कश भोंग्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. याचा अनेकांना त्रास होतो. विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही लक्ष्य यामुळे विचलित होते.
कोणत्याही धर्मातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी शिकणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. मात्र, भोंग्यातून येणार्या आवाजामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. शाळा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित आहे. मात्र, या शाळांमधली शांतता भोंग्यामुळे भंग पावते, असे पालक आणि शिक्षकांचे म्हणणे आहे.
भोंग्याच्या बाबतीत कायदेशीर कारवाई व्हावी
शिकतानाच काय कोणतेही काम करताना प्रत्येक व्यक्तीसाठी एकाग्रता महत्वाची असते. पण, भोंगे असू दे किंवा इतर काही कोणत्याही सातत्यपूर्ण आणि एका मर्यादेपलीकडच्या आवाजामुळे कोणत्याही माणसाची एकाग्रता शक्ती ही कमी होते. हे सर्व धर्मीयांबाबत होते. त्यामुळे सर्वांच्याच मानसिक, शारीरीक आरोग्यासाठी भोंग्याच्या बाबतीत कायदेशीर कारवाई व्हावी.
- डॉ. हेमंत जाधव, दक्ष नागरिक, कुर्ला