वसई : अॅड. परमानंद ओझा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ वसईतील रिक्षाचालकांनी एकत्र येत होर्डींग बसवले आहेत. पालघर साधु हत्याकांड प्रकरणी निर्घृण हत्या झालेल्या साधूंच्या कुटूंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारे वकील आणि वसई तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ओझा यांच्यावर दि. १ एप्रिल रोजी अज्ञातांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. समाजमाध्यमावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत तब्बल शेकडोंच्या संख्येने एकत्र येत विशिष्ट धर्मातील धर्मांधांनी हा हल्ला केला होता.
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात परमानंद ओझा यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. परंतु, याबाबत त्यांनी न्यायालयात जाऊन जामीनदेखील मिळविला. ओझा यांना जामीन मिळालेला असतानाही काही विशिष्ट धर्मातील धर्मांधांनी शेकडोच्या संख्येने एकत्र येत रात्रीच्या वेळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
धर्मांधांनी ओझा यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ओझा यांच्यावर पुन्हा एकदा हल्ले करण्यात आले. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावर हल्ले केले जात असल्याने वसईतील कायदा सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. जामीन मिळाल्यानंतरही हल्ले करणार्यांविरोधात कोणताही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. याच पार्श्वभूमीवर आता धर्मांधांविरोधात रिक्षाचालकांनी निषेधाचे बॅनर लावले आहेत.