नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयु) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आयोजित श्रीराम नवमी कार्यक्रमावर डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी हल्ला केल्याचा आरोप अभाविपतर्फे सोमवारी करण्यात आला. यामध्ये अभाविपचे कार्यकर्ते जखमी झाले. त्याविषयी ‘जेएनयु’ अभाविपतर्फे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. अभाविपच्या ‘जेएनयु’ शाखेचे अध्यक्ष रोहित कुमार म्हणाले की, “कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्रीराम नवमीनिमित्त पूजेचे आयोजन केले होते.
मात्र, त्यास डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध करण्यास प्रारंभ केला होता. पूजेचे आयोजन रद्द करण्यात आल्याची खोटी नोटीस ‘वॉर्डन’च्या नावे लावण्यात आली होती. त्यानंतरही अभाविपने सायंकाळी 5 वाजता पूजेचे आयोजन केले. वसतिगृहाच्या बाहेर पूजा सुरू होती आणि आतमध्ये ‘इफ्तार पार्टी’ सुरू होती. यानंतर पूजा आटोपताच बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांना मारहाण सुरू झाली. मग डाव्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बचावात खानावळीतील मांसाहारी जेवणाचा मुद्दा आपल्या हिंसक कारवायांना लपविण्यासाठी करण्यात आला.
‘कावेरी’व्यतिरिक्त अन्य 18 वसतिगृहांमध्येही मांसाहारी जेवण बनविण्यात आले होते. त्यामुळे अभाविपने मांसाहारी जेवणास विरोध केल्याचा डाव्यांचा दावा निखालस खोटा आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी अभाविपवर हिंसक हल्ला केल्यानंतर कांगावा करत मोर्चा काढला,” असेेही रोहित कुमार यांनी यावेळी सांगितले.