नवी दिल्ली : “कुतुबमिनार परिसरात असलेल्या गणेशमूर्तींना त्याच परिसरात योग्य ते स्थान मिळण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी विशिष्ट धर्मीयांच्या आक्रमकांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या कृत्यांचा सत्य इतिहासही त्या मूर्तींसोबत लावणे गरजेचे आहे,” असे परखड मत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी विचारवंत तरुण विजय यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना नुकतेच मांडले.
देशाची राजधानी दिल्लीतील कुतुबमिनार या ऐतिहासिक परिसरामध्ये हिंदू शिल्पकला असलेल्या वास्तू आहेत. तेथेच कुतुबमिनारजवळ पाषाणामध्ये कोरलेल्या गणेशाच्या दोन मूर्तीदेखील आहेत. ‘उलटा गणेश’ आणि ‘पिंजरा गणेश’ या नावाने त्या ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्या सत्य इतिहासाची माहिती तेथे नाही. त्याचप्रमाणे मूर्ती योग्य जागी नसल्याने या परिसरात येणार्या पर्यटकांच्या पायदळी या मूर्ती येत असल्याचेही दिसून आले आहे. ‘उलटा गणेश’ (डोके खाली, पाय वर) ही मूर्ती परिसरातील ‘कुव्वत उल इस्लाम’ मशिदीच्या दक्षिणेकडील भिंतीचा भाग आहे. दुसरी मूर्ती जमिनीच्या अगदी जवळ असलेल्या लोखंडी पिंजर्यात बंदिस्त आहे आणि तीही विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाचा भाग आहे. त्यामुळे या मूर्ती तेथेच चांगल्या स्थितीत ठेवण्याची मागणी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे.
त्याविषयी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा सदस्य तरुण विजय म्हणाले की, “कुतुबमिनार परिसरात गणेशमूर्ती अतिशय खराब स्थितीमध्ये आहेत. हिंदूंचा मानभंग करण्यासाठीच्या उद्देशानेच विशिष्ट धर्मीयांच्या आक्रमकांकडून या गणेशमूर्ती विपरित अवस्थेत म्हणजे एक मूर्ती उलट्या स्थितीत तर एक मूर्ती पिंजर्यामध्ये ठेवण्यात आली होती. मूर्ती उलट्या स्थितीमध्ये ठेवून हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांचा अपमान करण्याचा विशिष्ट धर्मीयांच्या आक्रमकांचा हेतू होता. त्यामुळे त्या मूर्ती कुतुबमिनार परिसरातच योग्य त्या स्थितीत ठेवण्याची आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे या मूर्तींसोबत त्यांचा इतिहास आणि विशिष्ट धर्मीयांच्या आक्रमकांनी त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही माहिती मूर्तींसोबत ठेवावी,” अशी प्राधिकरणाची मागणी असल्याचेही तरुण विजय यांनी नमूद केले.
कुतुबमिनार परिसरातील प्राचीन २७ मंदिरांची पुनर्बांधणी करण्याची विहिंपची मागणी
कुतुबमिनार परिसरातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करून, तेथे हिंदू धर्मीयांच्या विधी आणि प्रार्थना पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून नुकतीच करण्यात आली आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल याबाबत म्हणाले की, “आम्ही या परिसरातील काही प्रमुख भागांची नुकतीच पाहणी केली. येथील हिंदू धर्मीयांच्या देवी-देवतांच्या मूर्तींची अवस्था मन हेलावणारी आहे. २७ मंदिरांना उद्ध्वस्त केल्यानंतर मिळालेल्या साहित्याने ही वास्तू बनवली गेली. त्यामुळे आधी पाडलेली सर्व २७ मंदिरे पुन्हा बांधण्यात यावी आणि हिंदूंना तेथे पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. येथील शिल्पकला आणि भारतीय संस्कृती अप्रतिम आहे. पण, त्याला विकृत केले गेले, आता ते दुरुस्त करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.