वाराणसी : "श्रीराम हेच आमचे पूर्वज असून त्यांच्याशिवाय आमचे अस्तित्व काहीच नाही" अशा शब्दांत भावना व्यक्त करत वाराणसीत मुस्लिम महिलांनी रामनवमी उत्सव साजरा करत सामाजिक, धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले. भारतातील ज्या ज्या प्रदेशांनी श्रीरामांना सोडून दिले त्यांची पुढे दुर्दशाच झाली अशी भावना मुस्लिम महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष नानजीन अन्सारी यांनी व्यक्त केली आहे.
७ मार्च २००६ साली संकटमोचन मंदिर आणि केंट स्टेशन परिसरात बॉम्बहल्ले झाले होते. त्यात पुष्कळ प्राणहानी झाली होती. तेव्हा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन संकटमोचन मंदिरात हनुमान चालिसेचा पाठ केला होता. तेव्हापासून दरवर्षी मुस्लिम महिलांकडून रामनवमीनिमित्त आरती केली जाते. या प्रसंगी मुस्लिम महिलांनी उर्दूमध्ये रामाची आरती केली. तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थनासुद्धा केली.